नवी दिल्ली : पंजाबमध्ये दि.१८ मार्चपासून इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद आहे. तसेच २१ मार्चपर्यत दुपारी १२ वाजेपर्यत पंजाबमधील इंटरनेट आणि एसएमएस बंद ठेवण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. दरम्यान, कट्टरपंथी प्रचारक आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचा शोध सुरू आहे. तसेच अमृतपालला लवकरच अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान अमृतपालला अटक केल्याचे वृत्त पसरल्याने जालंधर , अमृतसर ,मोहाली येथे अमृतपाल सिंगच्या समर्थकांनी दहशत माजविली त्यामुळेच पंजाबमध्ये तणाव वाढला आणि जमावबंदीचे आदेश जारी करत इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्यात आली.
कट्टरपंथी प्रचारक आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचा शोध सुरू आहे. जालंधरचे पोलीस आयुक्त कुलदीप सिंग चहल दि. १८ रोजी जालंधरमध्ये म्हणाले की, अमृतपाल फरार आहे आणि आम्ही त्याचा शोध घेत आहोत. त्याला लवकरच अटक करण्यात येईल. तसेच अमृतपालसोबत सहा ते सात बंदूकधारींना अटक करण्यात येईल. तसेच पोलिसांनी अमृतपालच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या ७८ सदस्यांना अटक केली आहे. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.
रविवारी अतिरिक्त मुख्य सचिवांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटले आहे की, सर्व मोबाइल इंटरनेट सेवा (२G/३G/४५/५G/CDMA/GPRS), सर्व एसएमएस सेवा (बँकिंग आणि मोबाइल रिचार्ज वगळता) आणि व्हॉईस वगळता मोबाइल नेटवर्कवर प्रदान केलेल्या सर्व सेवा. हिंसा भडकवण्यासाठी आणि शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी १९ मार्चला दुपारी १२ ते २० मार्च दुपारी १२ पर्यत निलंबित केले. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार २१ मार्चपर्यत दुपारी १२ हा सेवा निलंबन कालावधी वाढवण्यात आला आहे. पंरतू बँकिंग सुविधा, रुग्णालय सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवा उपलब्ध राहण्यासाठी ब्रॉडबँड सेवा बंद करण्यात येत नसल्याचे आदेशात म्हटले आहे.