नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे गुरुवारी ‘जी २०’ राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हे युग यद्धाचे नाही’, हीच भूमिका भारत मांडणार असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी बुधवारी केले.राष्ट्रपती भवन कल्चरल सेंटरमध्ये (आरबीसीसी) ‘जी २०’ राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दिवसभर बैठक होणार आहे. त्याविषयी परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी पत्रकारांशी विशेष संवाद साधला.
ते म्हणाले, “रशिया-युक्रेन संघर्षावर ‘हे युद्धाचे युग नाही’, संवाद आणि मुत्सद्दीपणा हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे; अशी अतिशय स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली असून तीच भारताची अधिकृत भूमिका आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत याच अजेंड्यावर चर्चा होणार आहे. रशिया-युक्रेन संघर्षाचा जगावर होणारा परिणाम, आर्थिक परिणाम आणि विकासावर परिणाम या मुद्द्यांवरही बैठकीत लक्ष केंद्रित केले जाईल,” असे क्वात्रा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “जगभरातील देशांचे परराष्ट्र मंत्री एकत्र भेटत असताना रशिया-युक्रेन संघर्षांच्या सद्यस्थितीवरही चर्चा होईल.
भारताच्या कायद्यांचे पालन करावेच लागेल!
भारतात काम करणार्या प्रत्येक परदेशी कंपन्यांनी भारतीय कायद्यांचे पालन करावेच लागले, अशी रोखठोक भूमिका परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बीबीसीप्रकरणी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेवरली यांच्यासोबतच्या चर्चेत मांडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.देशाची राजधानी दिल्ली येथे बुधवारपासून जी२० राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीस प्रारंभ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेवरली यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी क्वेवरली यांनी विशिष्ट अजेंडा चालविणार्या बीबीसी या ब्रिटीश माध्यमसमुहाच्या भारतातील कार्यालयांमध्ये प्राप्तीकर विभागाने सर्वेक्षण केल्याचा मुद्दा उपस्थित केला.
त्यास परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रोखठोक उत्तर दिल्याचे समजते. परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, परदेशी कंपन्या आणि संस्था यांना भारतात काम करण्यास कोणतीही आडकाठी नाही. भारताने त्याविषयी कायमच अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, भारतात काम करताना भारताच्या सर्व कायद्यांचे आणि नियमांचे पूर्णपणे पालन करणे बंधनकारक आहे. त्याविषयी भारताची ठाम भूमिका असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.
रशियन परराष्ट्र मंत्र्यासोबतही युक्रेनसह अन्य विषयावर चर्चा
जी२० परराष्ट्र मंत्री बैठकीच्या पार्श्वभूमीवर एस. जयशंकर यांनी रशियाने परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय सहकार्य, युक्रेन संघर्ष आणि जी२० या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. सर्गेई लावरोव्ह यांच्या भारत भेटीच्या निमित्ताने रशियन परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, रशिया जी२० ला जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रतिष्ठित मंच मानतो, तेथे सर्वांच्या हितासाठी संतुलित आणि सहमतीने निर्णय घेणे अपेक्षित आहे.