निर्गुंतवणूक धोरण - काळाची गरज

    02-Mar-2023   
Total Views |
Disinvestment Policy


देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी निर्गुंतवणूक योजना जेवढ्या धडाक्यात राबवावयास हव्यात, तेवढ्या ताकदीने केंद्र सरकार त्या राबवित नसल्याचे चित्र आहे. या प्रस्तावांना कामगार संघटना विरोध करतात, पण अर्थव्यवस्था मोकळी झाल्यानंतर देशात कामगार संघटना नावाला उरल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला निर्गुंतवणूक योजना राबविण्यासाठी परिस्थिती पूर्णतः अनुकूल असताना, केंद्र सरकारची याबाबत उदासीनता का, हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.


आपल्या देशाला विकास साधायचा आहे. विकास प्रक्रियेमुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो, हा एक मुद्दा आहे. पण, देशाच्या प्रगतीसाठी विकास योजना या राबवावयासच हव्यात. पर्यावरणाचा कमीत कमी र्‍हास होईल, अशी काळजी घेऊन विकासयोजना राबविणे गरजेचे आहे. मुंबईचाच विचार केला, तर किती विकासयोजना कार्यरत आहेत. सागरी किनारा मार्ग, मेट्रोचे मार्ग निर्माण करणे, बुलेट ट्रेन, मुंबई-नागपूर वेगवान मार्ग वगैरे वगैरे. विकासाची कामे फक्त मुंबई व जवळपासच सुरू नसून, संपूर्ण भारतभर सुरू आहेत. विकासासाठी पैसा लागतो. फार मोठ्या प्रमाणावर निधी लागतो. तो कुठून उभारायचा? अर्थसंकल्पातून विकास कामांवर खर्चाची तरतूद करणे शक्य नसते. अर्थसंकल्पात उत्पन्नाचा विचार होतो, तो करआकारणी करुन. आपण भारतीय अगोदरच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर भरत आहोत की, यापुढे शासनाला करआकारणी करणे शक्य नाही व देशाच्या नेहमीच्या खर्चाच्या बाबी वाढतच असतात. त्यांचा खर्च वाढतच असतो. त्यामुळे विकासयोजनांवर अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करता येत नाही. यासाठी निधी उभा करायचा मार्ग म्हणजे निर्गुंतवणूक!

 
देश स्वतंत्र झाला तेव्हा काही वर्षे आपली रशियाशी जवळीक होती व आपण समाजवादी तत्त्वांचा अंगीकार करत होतो. त्यामुळे बहुतेक उद्योग हे सरकारी मालकीने सुरू करण्यात आले व त्यावेळची ती गरज होती. कारण, उद्योग सुरू करण्यासाठी जे कसब, कौशल्य लागते, ते त्यावेळच्या भारतीयांकडे तितकेसे नव्हते. पण अर्थव्यवस्था मोकळी झाल्यानंतर व आपल्या देशाने समाजवादी तत्त्वांशी बरीचशी फारकत घेतल्यानंतर सरकारी कंपन्यांतील मालकी कमी करुन किंवा त्या कंपन्या पूर्ण विकून, त्यातून जो निधी उभा राहील, तो विकास योजनांसाठी वापरायचा, असा आपल्या देशाचा अग्रक्रम ठरला. सरकारी पूर्ण मालकी विकणे याचे उदाहरण म्हणजे ‘एअर इंडिया.’ अंशतः मालकी हिस्सा कमी करणे याचे उदाहरण म्हणजे सार्वजनिक उद्योगातील बँका.

२०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील केंद्र सरकारने ५१ हजार कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. २०२२-२०२३ या वर्षासाठी सुरुवातीस निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट ६५ हजार कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते, ते नंतर कमी करुन रु. ५० हजार कोटी रुपये करण्यात आले. निर्गुंतवणुकीचं यश हे त्या-त्या वेळच्या बाजारांच्या परिस्थितीवर व अन्य काही कारणांवर अवलंबून असते. त्यामुळे वाजवी व साध्य होऊ शकणारेच उद्दिष्ट निश्चित करावे लागते. केंद्र शासनाच्या म्हणण्याप्रमाणे निर्गुंतवणुकीकडे फक्त भांडवल उभारणी म्हणून पाहू नये, तर आर्थिक सुधारणा व रोजगार निर्मिती म्हणूनही पाहावे. उदाहरणच द्यायचे, तर ‘एअर इंडिया’ भारत सरकारकडून ‘टाटा समूहा’च्या ताब्यात आल्यानंतर, ती कंपनी प्रचंड प्रमाणावर विमान खरेदी करणार आहे. परिणामी, फार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. जर केंद्रीय अर्थमंत्रालयाला फार मोठ्या रकमेचा तुटीचा अर्थसंकल्प नको असेल, तर निर्गुंतवणुकीला पर्याय नाही. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे महागाईला निमंत्रण. तेही कोणत्याही शासनाला नको असणार. सध्याचा महागाईचा दरच प्रचंड आहे. निर्गुंतवणुकीच्या निधीतून भांडवली गुंतवणूक व सामाजिक क्षेत्रांवर खर्च करणे शक्य होऊ शकते. आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये ’कोविड’मुळे आपली अर्थव्यवस्था जवळजवळ ठप्प झाली होती. परिणामी, त्यावर्षी निर्गुंतवणुकीतून फक्त १,३६,२९० कोटी रुपये इतका निधी जमा झाला.

केंद्र सरकारच्या ‘डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड पब्लिक असेट मॅनेजमेंट’च्या आकडेवारीनुसार, दि. १ फेब्रुवारीपर्यंत ३१ हजार, १०६ कोटी रुपये निर्गुंतवणुकीतून जमा झाले होते. यापैकी २० हजार, ५१६ कोटी रुपये ‘एलआयसी’च्या निर्गुंतवणुकीतून जमा झाले होते. ‘एलआयसी’चे साडेतीन टक्के शेअर विक्रीस काढले होते. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षासाठी जे ६५ हजार कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, त्यापैकी ४८ टक्के उद्दिष्ट १८ जानेवारीपर्यंत पूर्ण झाले होते, अशी माहिती संसदेत आर्थिक सर्व्हे सादर करताना देण्यात आली होती. २०२२ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात सार्वजनिक उद्योगातील दोन बँकांचे व सर्वसाधारण विमा उद्योगातील एका कंपनीचे १०० टक्के खासगीकरण करणार, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता, पण आर्थिक वर्ष संपायला फक्त २८ दिवस राहिले असून, सध्या तरी केंद्र सरकारने हा प्रस्ताव मार्गी न लावण्याचे ठरविले असावेे. कारण, दि. १ फेब्रुवारी रोजी जो २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, त्यात याचा उल्लेखही करण्यात आला नाही. कदाचित या व्यवहारांसाठी सध्याचा बाजार अनुकूल नाही, असे केंद्र सरकारला वाटत असेल.

‘आयडीबीआय बँक’, ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’, ‘बीईएमएल’ व ‘कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ यांची मालकी केंद्र शासनाला विकायची आहे, असे प्रस्ताव केंद्र सरकारपुढे आहेत. या विक्रीतून शासनाला या कंपन्यांवरील व्यवस्थापकीय नियंत्रण कमी करावयाचे आहे. शासनाला ‘भारत पेट्रोलियम’ (बीपीसीएल) या कंपनीतील मालकी हिस्सा ही कमी करावयाचा होता, पण केंद्र सरकार हा प्रस्तावही मार्गी लावण्याबाबत प्रयत्नशील वाटत नाही. या निर्गुंतवणुकीतून केंद्र सरकारला ५० हजार ते ६० हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. ‘एचएलएल लाईफ केअर लिमिटेड’ व ‘प्रोजेक्ट्स अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड’ या दोन कंपन्यांची निर्गुंतवणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.‘सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ या कंपनीची निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. ’पवनहंस’ या कंपनीची निर्गुंतवणूकही अडचणीत आली आहे. ज्याने ही कंपनी ताब्यात घेण्याबाबतचा निर्णय घेतला, त्याच्या विरुद्ध न्यायालयात प्रकरण गेलं आहे.

देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी निर्गुंतवणूक योजना जेवढ्या धडाक्यात राबवावयास हव्यात, तेवढ्या ताकदीने केंद्र सरकार त्या राबवित नसल्याचे चित्र आहे. या प्रस्तावांना कामगार संघटना विरोध करतात, पण अर्थव्यवस्था मोकळी झाल्यानंतर देशात कामगार संघटना नावाला उरल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला निर्गुंतवणूक योजना राबविण्यासाठी परिस्थिती पूर्णतः अनुकूल असताना, केंद्र सरकारची याबाबत उदासीनता का, हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. कंपन्या सरकारी मालकीच्या असल्याची, बहुतेक कंपन्या सुस्तावलेल्या असतात. कर्मचार्‍यांची उत्पादकता वाढते. कंपन्या तोट्यातून नफ्यात येतात, हे निर्गुंतवणुकीचे बरेच फायदे आहेत.केंद्र सरकारने ज्या कंपन्यांची निर्गुंतवणूक प्रस्तावित केली आहे, ज्या कंपन्या ‘पाईपलाईन’मध्ये आहे, त्यांची निर्गुंतवणूक २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात मार्गी लावावी. जरी याबाबतचे प्रस्ताव अर्थसंकल्पात नसले, तरी हे अगोदरचे प्रस्ताव आहेत. त्यामुळे हे निर्गुंतवणूक प्रस्ताव या आर्थिक वर्षांत पूर्ण करावेत व यांची या आर्थिक वर्षात परिपूर्ती झाल्यानंतर २०२४-२०२५च्या अर्थसंकल्पात नवीन कंपन्यांची घोषणा करावी.देशातल्या सर्व विकासकामांना परदेशातून मदत मिळत नाही. परदेशातून मदत मिळण्यासाठीचे प्रस्ताव फार खास असावे लागतात व त्यासाठींच्या अटीही फार असतात. बहुतेक विकास प्रकल्प हे आपले आपल्यालाच राबवावे लागतात. यासाठी अर्थसंकल्पातून पैसा देणे शक्य होत नाही. परिणामी, निर्गुंतवणुकीतून पैसा उभारुन विकासकामे पूर्ण करणे, हाच पर्याय शासनापुढे असतो!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.