१९९१ साली सोव्हिएत साम्राज्य कोसळल्यावर युक्रेन स्वतंत्र झाला. २०१० साली युक्रेनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर युशचेन्को यांनी बांदेराला मरणोत्तर ‘हिरो ऑफ युक्रेन’ असा किताब दिला. याविरूद्ध युरोपभर काहूर माजलं. कारण, बांदेराने हजारो निरपराध ज्यूंना ठार मारलं होतं. अखेर २०११ मध्ये युक्रेन सरकारला तो किताब रद्द करावा लागला.
एक शाळकरी पोरगा हातात एक कपभर दूध घेऊन येतो. त्याचा थोरला भाऊ टेबलाशी बसून दूधच पीत असतो. हा पोरगा दादाच्या जवळ उभा राहून म्हणतो, ‘मै तुमसे बडा.’ दादा हातातला कप संपवून उठून उभा राहिल्यावर आपल्या लक्षात येतं की, तो चांगला ताडमाड उंच आहे. तेवढ्यात तो दादा हसत-हसत आपल्या धाकट्या भावाला म्हणतो, ‘अभी नही, मै तुमसे बडा.’ का, तर मी रोज दुधातून अमुक तमुक ते शक्तिवर्धक औषध घेतो, म्हणून. मग निवेदक आपल्याला सांगतो. मुलांची अशी छान झपाटेबंद वाढ व्हायला हवी असेल, तर आमचं अमुक ते औषध रोज मुलांना दूधातून प्यायला द्या, वगैरे. अतिशय सुंदर प्रभावी अशी ती जाहिरात होती. अशा तर्हेच्या आणखीनही जाहिराती होत्या नि आहेत.
‘भला उस की कमीज मेरी कमीज से ज्यादा सफेद क्यूं?’ ही अशीच एक प्रभावी जाहिरात.अशा प्रकारच्या जाहिराती आपल्याला आवडतात, प्रभाव पडतात. कारण, मानवी स्वभावाच्या एका सनातन वैशिष्ट्यावरच त्या आधारलेल्या असतात. ते वैशिष्ट्य म्हणजे मोठेपणाची हौस. मी मोठा आहे एवढीच भावना मला आनंद द्यायला पुरत नाही, तर मी अमक्या-तमक्यापेक्षा मोठा आहे, असं सिद्घ करायला मला आवडतं. दुसर्या शब्दांत सांगायचं तर, मी मोठा आहेच, पण माझ्या बरोबरीचे, माझ्या नात्यातले, माझ्या व्यवसायातले, नोकरीतले, शेजारपाजारचे लोक माझ्यापेक्षा छोटे आहेत. हे सिद्घ करून दाखवून मिरवायला मला जास्त आवडतं. हा मनुष्यस्वभाव आहे. हिंदू मानसशास्त्रज्ञ म्हणजेच ऋषी-मुनी-संत हे या स्वभाव विशेषाला ‘मत्सर’ असं नाव देतात.तर हा मत्सर विविध प्रकारे आपल्या आजूबाजूला सतत दिसत असतो.
संपूर्ण विसावं शतक ज्या एका तत्वज्ञानाने झाकोळून टाकलं, ते साम्यवादी तत्वज्ञान मत्सरावरच तर आधारलेलं आहे. हे लोकाचं भांडवलदार, सरंजामदार, जमीनदार वगैरे सगळे बूर्झ्वा (साम्यवाद्यांची खास शिवी) श्रमिकांचं, कष्टकर्यांचं शोषण करून गबर झालेत. त्यांना खेचा खाली आणि श्रमिकांचं राज्य आणा. पुढे जगाने हे अनुभवलं की बूर्झ्वा वर्गाला खाली खेचून स्वत: सत्ताधारी बनलेल्या श्रमिकांनी इतर श्रमिकांची जास्तच ससेहोलपट केली, छळ केला आणि ते स्वत:च नवे बूर्झ्वा बनले. झार राजांची हुकूमशाही ही अखेर हुकूमशाहीच होती. ती अनियंत्रित आणि सर्वंकष होती. पण, आपण राजा आहोत म्हणजे आपल्या प्रजेचे पालक आहोत, पिता आहोत, ही जाणीव क्षीण प्रमाणात का होईना झार राजांच्या मनात होती. नव्या श्रमिक सत्ताधार्यांमध्ये अशा भावनेचा लवलेशही नव्हता.
असो. तर युक्रेन-रशिया युद्घ एक वर्ष पूर्ण करून कुंथत चालू आहे. कोणत्याच पक्षाला निर्णायक अशी चाल करता येत नाही, असं निदान भासतं तरी आहे. मग आता राजकीय, बौद्घिक, ऐतिहासिक उखाळ्या-पाखाळ्या काढायला सुरुवात झाली आहे. त्यातून ‘मत्सर’ या स्वभावविशेषाचं भरपूर दर्शन घडतं आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना म्हणे कुणा युक्रेनियन नागरिकाने ई-मेलद्वारे अशी विनंती केली की, ‘आपण (म्हणजे युक्रेनने) यापुढे रशिया या देशाचा उल्लेख अधिकृतरित्या ‘मस्कोव्हिया’ असा करावा. कारण, रशिया या नावावर तो एकटाच काय म्हणून हक्क सांगणार? मूळ ‘कीव्ह रुस’ या राज्यातून आजचे रशिया, बेलारुस आणि युक्रेन हे देश निर्माण झालेले आहेत. तेव्हा, रशिया या नावावर आमचा पण हक्क आहे. उलट एकेकाळच्या मस्मवा नदीकाठच्या मॉस्कोमधल्या ‘ग्रँड डची ऑफ मस्कोव्हिया’ या जहागिरी किंवा जमीनदारी राज्यातून आजचा रशिया देश निर्माण झालेला आहे. तेव्हा ते भले स्वतःला रशिया म्हणवून घेवोत, आपण त्यांना ‘मस्कोव्हिया’ म्हणावं.
झेलेन्स्की या प्रस्तावावर भलतेच खूश झाले. त्यांनी आपल्या संबंधित मंत्रालयाला सूचना दिल्या आहेत की, खरोखरच असं करता येईल का, याबाबत सखोल विचार करून ‘नोट पूट अप करा.’आता ही बातमी रशियात पोहोचल्यावर साहजिकच त्यांचा भडका उडाला. माजी रशियन राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदबेदेव जे वर्तमान राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यांनी झेलेन्स्कींच्या प्रस्तावाची टर उडवित प्रतिक्रिया व्यक्त केली. मग आम्ही तुमच्या देशाला गद्दार स्टीफन बांदेरा देश म्हणू.युक्रेन आणि रशिया यांच्यातील या शाब्दिक चकमकीचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या इतिहासात शिरावं लागेल. आजचा रशिया, युक्रेन, बेलारूस, बल्गेरीया, रूमेनिया, पोलंड, हंगेरी थोडक्यात पूर्व युरोपीय देशांमधले नागरिक हे वंशाने स्लाव्ह समजले जातात. आपण भारतीयांना ज्यांचा जास्त परिचय आहेत ते ब्रिटिश लोक वंशाने अँग्लो-सॅक्सन समजले जातात, तर जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामधले लोक हे जर्मेनिक वंशाचे समजले जातात. अलीकडे आपल्याला इटली या देशाचा जरा जास्तच परिचय झालाय. हे इटालियन लोक स्वतःला रोमन वंशाचे म्हणवतात, तर बाकी सगळे त्यांची खिल्ली उडवत म्हणतात, ते प्राचीन रोमन लोक केवढे पराक्रमी होते. त्यांचं साम्राज्य रोमपासून पर्शियापर्यंत पसरलं होतं आणि तुम्ही शेंदाड शिपाई आहात.
दुसर्या महायुद्धात तुमचे सैनिक म्हणजे तुमचा मित्र हिटलर याच्या गळ्यातलं लोढणं झालेलं होतं. तुम्हाला कुठे लपवावं असा प्रश्न जर्मन सेनापतींना पडत होता. ते असो. तर डॉन, जीपर, डविना अशा मोठमोठ्या नद्यांच्या खोर्यांमध्ये स्लाव्ह लोकांच्या असंख्य टोळ्या होत्या. त्यांच्या आपसात सतत मारामार्या चालू असायच्या, तेव्हा इसवी सनाच्या आठव्या-नवव्या शतकात स्लाव्ह टोळ्यांमधल्या काही वयोवृद्ध शहाण्या लोकांनी आपल्या स्वीडन देशातून रुरिक नावाच्या एका राजाला बोलावून आणलं आणि ते त्याला म्हणाले, “आमच्या या संपन्न भूमीचा नाश होत आहे. तेव्हा तू न्यायाने आमच्यावर राज्य करून आमचं संरक्षण, पालन आणि संवर्धन कर.” तेव्हा नॉर्डिक वंशाच्या रुरिकन त्यांचं म्हणणे मान्य केलं. पुढे रुरिकच्या वंशजांंनी कीव्ह या नगराची स्थापना केली. त्यालाच ‘कीव्ह रुस’ राज्य म्हणतात. नंतर स्लाव्ह लोकांची अशी अनेक राज्य निर्माण होत गेली. पुढच्या शतकांमध्ये यापैकी ‘ग्रँड डची ऑफ मस्कोव्हिया’ हे मस्कवा नदीच्या खोर्यातल्या मॉस्को या नगरातलं राज्य हळूहळू जास्त प्रबळ होत गेलं. त्याचा राजा स्वतःला ‘झार’ म्हणजेच ‘सीझर’ किंवा ‘सम्राट’ म्हणवून घेऊ लागला.
झार सम्राटांनी आपलं साम्राज्य पूर्वेला पॅसिफिक महासागरापासून पश्चिमेला बाल्टिक आणि काळ्या समुद्रापर्यंत वाढवलं. १६५४ साली त्यांनी किव्ह या राजधानीसह युक्रेन देशही जिंकून आपल्या साम्राज्यात आणला. आता कीव्ह ही राजधानी आणि तिथलं कीव्ह रुस राज्य हे मॉस्कोतल्या मस्कोव्हियापेक्षा जुनं आहे. म्हणून रुस या नावावर आमचाही हक्क आहे नि सध्याच्या रशियाला आपण ‘मस्कोव्हिया’ म्हणावं, या प्रस्तावामागे ही पोटदुखी आहे.आता, रशियन झारच्या साम्राज्यात असलेला युक्रेन, १९१७ सालच्या सोव्हिएत राज्यक्रांतीमुळे आपोआपच सोव्हिएत रशियाचा एक प्रांत बनला. युक्रेन हा स्वतंत्र देश असावा, अशी भावना असणार्या लोकांचा झारशाहीप्रमाणेच सोव्हिएत राज्यकर्त्यांनाही विरोधच होता. अशा बंडखोर लोकांपैकी एक ठळक नाव म्हणजे स्टीफन बांदेरा. जून १९४१ मध्ये हिटलरने सोव्हिएत रशियावर आकस्मिक झंजावती आक्रमण केलं. याचा वेगवेगळ्या कारणांनी आनंद झाला. त्यात युक्रेनियन स्वातंत्र्य आंदोलन नेता स्टीफन बांदेरा आणि त्याची संघटना हेही होतेच. त्यांनी युक्रेनियन सोव्हिएत प्रदेशात घुसलेल्या जर्मन फौजांच सहर्ष स्वागत केलं आणि त्यांना पडेल ती मदत केली.
सोव्हिएत रशियाचा संपूर्ण पराभव केल्यावर जर्मनी म्हणजे हिटलरने युक्रेनला स्वातंत्र्य द्यावं, अशी अर्थातच बांदेरा आणि त्याच्या पक्षाची मागणी होती. बांदेराने नाझी सेनापतींना सोव्हिएत सेना स्थानिक साम्यावादी राजकीय नेते आणि युक्रेनियन ज्यू यांची कत्तल उडवण्यात भरघोस मदत केली.पण, संपूर्ण युरोप खंडाचं धान्य कोठार असं ज्याचं वर्णन केलं जातं, तो युक्रेन देश स्वतंत्र करण्याएवढा हिटलर उदार वगैरे नव्हता. आपला मतलब साध्य झाल्यावर त्याने बांदेरा आणि त्याच्या मदतनीसांना सरळ अटक केली आणि बर्लिनच्या तुरूंगात डांबून ठेवलं.पुढे हिटलरचा पराभव झाला. पण, बांदेराची स्थिती फारच अडचणीची झाली. आता तो सोव्हिएत रशियाचा शत्रू तर होताच, पण ज्यूंच्या कत्तलीत सहभागी असल्यामुळे अँग्लो-अमेरिकनांनाही नकोसा होता. अखेर बर्याच भानगडीनंतर अमेरिका नियंत्रित पश्चिम जर्मनीमध्ये त्याला राजकीय आश्रय मिळाला. पण, १९४८ साली इस्रायल हे ज्यू लोकांचं नवं राष्ट्र निर्माण झालं होतं.
ज्यू कत्तलीमध्ये सहभागी असणार्या प्रत्येकाला नाहीसा करण्याचा इस्रायली गुप्तेहर संघटना ‘मोसाद’ हिने चंगच बांधला होता. म्हणजे आता स्टीफन बांदेराला उडवायला रशियन गुप्तेहर संघटना ‘केजीबी’ साम्यवादी पूर्व जर्मनीची गुप्तेहर संघटना ‘स्तासी’ आणि इस्रायली गुप्तेहर संघटना ‘मोसाद’ या सगळ्याच टपल्या होत्या. अखेर १९५९ साली ‘केजीबी’ने डाव साधला. म्युनिक शहरात पोटॅशियम सायनाईड या अतिविषारी रसायनाचा फवारा मारून त्यांनी बांदेराला उडवलाच.१९९१ साली सोव्हिएत साम्राज्य कोसळल्यावर युक्रेन स्वतंत्र झाला. २०१० साली युक्रेनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर युशचेन्को यांनी बांदेराला मरणोत्तर ‘हिरो ऑफ युक्रेन’ असा किताब दिला. याविरूद्ध युरोपभर काहूर माजलं. कारण, बांदेराने हजारो निरपराध ज्यूंना ठार मारलं होतं. अखेर २०११ मध्ये युक्रेन सरकारला तो किताब रद्द करावा लागला. दिमित्री मेदवेदेव यांच्या बोलण्यामागे एवढी भीषण कहाणी आहे.