राज्य सरकारी कर्मचार्यांचा संप सुरू झाल्यावर त्याबाबत आजकाल समाजमाध्यमांवर ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत, त्यावरून समाज जाणिवांचा कल लक्षात यावा. हा संप आगामी काळात दीर्घकाळ चालेल किंवा मिटेलदेखील कदाचित, मात्र त्यावर एकूणच सामाजिक भावनांचा सोशल मीडियावरील अनुकूल-प्रतिकूल दृष्टिकोन बघितला तर समाजात होत असलेला हा सजग राहण्याचा बदल एकूणच आपल्या सामाजिक व्यवस्थेची दिशादर्शक वाटचाल ठरविण्यासाठी उपयुक्त ठरेल किंवा नाही, यावर मंथन करण्याची वेळ आली आहे. या सोशल मीडियावरील मतांबाबत अजूनही फारशी स्पष्टता किंवा त्यास अधिकृत मान्यता वगैरे गोष्टींवर अनेक मतांतरे असू शकतात. मात्र, तरीही हा ओघ न थांबणारा आहे, हे मान्य करावे लागेल. मुद्दा केवळ संपावर व्यक्त होऊ लागलेल्या मतांचाच नाही, तर एकूणच समाजाचा आपल्या सभोवतीच्या घटना-घडामोडींवर व्यक्त होणारा दृष्टिकोनही लक्षात येतो. एखाद्या घटना, प्रसंग अथवा कृती, निर्णयावर लोकांचे व्यक्त होणे आणि मग ती प्रथा, परंपरा किंवा दृष्टिकोन, विचार लागू होणे, हे सर्व आपल्या एकूणच सामाजिक व्यवस्थेसाठी, भविष्यकालीन परिणामांसाठी कितपत योग्य आहे, हे समजून घेण्याची वेळ आली आहे. अन्यथा सामाजिक विचारांची ही तुटक तुटक रुढ होऊ पाहणारी व्यवस्था उद्या सामाजिक असंतोष निर्माण करण्यास कारणीभूत ठरू लागली, तर या तंटा निवारणासाठी वेगळी व्यवस्था निर्माण करण्याची वेळ येईल. त्यातून वाईट अथवा नको ते घडण्यापेक्षा याचा उत्तम उपयोग कसा करता येईल, यातून भविष्याला पोषक मंथन कसे करता येईल, यावर आतापासूनच निर्णय प्रक्रिया सुरू व्हायला हवी.कारण, माणसाच्या जीवन-मरणाशी एकरूप होऊ पाहणारे हे माध्यम आव्हान म्हणून उभे ठाकले, तर आणखी एका समस्येची भर पडेल. व्यक्त होण्याच्या मर्यादा नाहीत. मात्र, कोणत्याही सवयीचा अतिरेक नक्कीच प्रश्न निर्माण करतो. समाजमाध्यमांतून व्यक्त होण्याच्या सवयीतून न सुटणारे कठीण प्रश्न निर्माण होता कामा नयेत. त्यासाठी या माध्यमाचा नेमका वापर, सदुपयोग याविषयी अधिकाधिक चर्चा, समुपदेशन यांसारख्या पर्यायांचा विचार फायदेशीर ठरावा.
सोपी उत्तरं
समाजात प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्याची उत्तरंदेखील शोधली जातात. ही निरंतर प्रक्रिया आहे. आजकाल एका अशाच प्रश्न-उत्तरांची चर्चा सुरू आहे. परीक्षा कालावधी जसा जसा जवळ येतो, तेव्हा ही प्रश्नोत्तरे डोके वर काढतात. आधी दहावी-बारावी परीक्षा आली की कॉपीबहाद्दरांचा संदर्भ या प्रश्नपत्रिकेशी जोडला जात असे. आजकाल सगळ्याच परीक्षा या विचित्र समस्येत अडकल्या आहेत. आधी विद्यार्थी परीक्षेत गैरप्रकार करतात, म्हणून दोषी ठरविले जात असत. आता तर खुद्द काही शिक्षक आणि या परीक्षा घेणार्या व्यवस्थेतील लोकदेखील या गैरप्रकारात सहभागी असल्याचे दुर्दैवी चित्र बघायले मिळते. प्रश्न निर्माण करणार्या आणि उत्तरे मागविणार्या परीक्षा आता स्वतःचे अस्तित्व गमावून बसल्या आहेत. तेव्हा तर या प्रक्रियेचे महत्त्व आहे की नाही? हा प्रश्न निर्माण होतो. दहावी-बारावी परीक्षेत अगदी काल-परवा जे गैरप्रकार निदर्शनात आले, ते मानवी नैतिकतेला कलंक लावणारे आहेत.पुण्यातील बिबवेवाडीतील एका महाविद्यालयात चक्क परीक्षेआधीच दहावीची गणिताची प्रश्नपत्रिकाच मोबाईलमध्ये आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्या आधीदेखील असे अनेक प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी या परीक्षा त्यांच्या भवितव्यासाठी महत्त्वाच्या असल्या तरी समाजात आणि व्यवस्थेत त्या परीक्षेचे होत चाललेले अवमूल्यन गंभीर प्रश्न निर्माण करीत आहे, हे मान्य करावेच लागेल.येथे देखील पुन्हा सोशल मीडियाच्या गैरवापराचा मुद्दा अधोरेखित होतो. समाजात जी सहज उपलब्ध करून देण्याची किंवा होण्याची वृत्ती-प्रवृत्ती बळावत चालली आहे, सोपी आयती उत्तरं मिळवण्याचे प्रकार चालले आहेत, त्याने समाज घडण्यापेक्षा बिघडत चालला आहे की काय, अशी शंका उपस्थित करायला वाव मिळतो.विशेष म्हणजे, यावर्षी शिक्षण मंडळाने कॉपी प्रकार होऊ नयेत म्हणून नवनवीन उपक्रमही राबविले. ’कॉपीमुक्त अभियाना’चा मोठा गाजावाजाही करण्यात आला. मात्र, त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वीच जे काही सहज उपलब्ध होते, असे मानणार्या प्रवृत्ती आहेत, त्यांनी यावर पाणी फेरले, एवढे मात्र खरे!
-अतुल तांदळीकर