सुशांत रिसबूडचे बालपण कोकणातील हर्णे गावातच गेले. समुद्रकिनारी वसलेल्या या गावात नारळ-पोफळीच्या बागांमध्ये बागडण्यासोबतच गावातील विविध लोककला प्रकारांचा सुशांतवर संस्कार झाला. ग्रामीण भागातील पारंपरिक गोष्टी बघून, त्यात विविध प्रकारे प्रत्यक्ष सहभाग घेतल्यामुळे सुशांतच्या अंगी सभाधीटपणा आला. शाळेत असताना त्याने अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्येही भाग घेतला. त्यात बक्षिसेदेखील प्राप्त झाली. यातूनही त्याचा आत्मविश्वास अधिकच दुणावला. एकेदिवशी शाळेतील एका शिक्षकाने सुशांतला “तू चांगला अभिनय करू शकतोस,” असे सांगितले आणि मग काय सुशांतची पावलं आपसुकच अभिनयाकडे वळली. शालेय वयातच एकांकिका, एकपात्री नाट्यप्रयोग अशा विविध स्पर्धांमध्ये सुशांत अगदी आघाडीवर होता.
या लहानमोठ्या अनुभवांतूनच अभिनयाचे बाळकडू मिळाल्याचे सुशांत अभिमानाने सांगतो. या स्पर्धांची तालीम सुरु असतानाच ‘छडी लागे छम छम’ या चित्रपटात कामाची संधी सुशांतकडे चालून आली. या चित्रपटाच्या निमित्ताने सुशांतला मोहन जोशी, स्मिता तळवलकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस अशा मोठ्या कलाकारांसोबत काम करायला मिळाले. एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करताना मनात साहजिकच सुशांतच्या मनात भीती होती, पण तेवढीच उत्सुकताही होती. या दिग्गज मंडळींच्या सहवासात राहून, अभिनय क्षेत्रात काही कमवायचे असेल, तर वाचनाची आवड जोपासणे महत्त्वाचे, हे सुशांतला समजले. त्यानंतर त्याला ‘आव्हान’ हा दुसरा चित्रपटही मिळाला. या चित्रपटात सचिन खेडेकर, अमृता खानविलकर, सुबोध भावे या मंडळींसोबत काम करण्याची संधी सुशांतला मिळाली.
त्यानंतर सुधीर भट यांच्या ‘सुयोग’ निर्मिती संस्थेच्या ‘सारे प्रवासी घडीचे’ या नाटकाचे प्रयोगही सुशांतने केले. पुढे सुशांतने रुईया महाविद्यालयातून जनसंपर्क व संज्ञापनाचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन जीवनात विविध ‘फेस्ट’साठी टी-शर्ट प्रिंट करून ‘पॉकेटमनी’ मिळवल्याचेही सुशांत सांगतो. ‘रुईया कट्ट्या’वर विराजमान होणार्या ‘विद्यार्थ्यांचा राजा’ या सार्वजनिक गणपती मंडपातील देखावे साकारण्यात सुशांतचे विविध अंगी कलागुण अधोरेखित झाले. यातून मिळालेल्या अनुभवांतून सुशांत साहाय्यक म्हणून कला दिग्दर्शनाकडे वळला. रुईया महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विख्यात कलादिग्दर्शक श्रीनिवास परब आणि सलोनी धात्रक यांच्या सान्निध्यात सुशांतने कलादिग्दर्शनाचे धडे गिरवले.
चित्रपटनिर्मितीत कलादिग्दर्शकाचा वाटा मोठा असतो. चित्रपट दिग्दर्शकाच्या कल्पनेला साहाय्यक कलादिग्दर्शक सत्यात उतरवतो. विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेली ‘लव्ह पर स्क्वेअर फीट’, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या प्रोमोवर त्याने साहाय्यक कलादिग्दर्शक म्हणून काम केले. तसेच ‘दिल बफरिंग’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘द टेनंट’ यांसारख्या चित्रपट आणि वेब मालिकांचे साहाय्यक कलादिग्दर्शन करण्याची संधी सुशांतला मिळाली. त्याने कलादिग्दर्शनासोबतच दिग्दर्शक म्हणून जाहिरात क्षेत्रातही काम केले. टीव्ही आणि युट्यूबसाठीच्या काही जाहिरातींचे दिग्दर्शनही सुशांतने केले. यामध्ये ‘सनफिस्ट’, ‘आयसीआयसीआय बँक’, ‘सदाबहार’ या कंपन्यांच्या जाहिरातींचा समावेश आहे. त्याचबरोबर सुप्रसिद्ध संगीतकार ‘बादशाह’च्या ‘हार्टलेस’ या ‘म्युझिक व्हिडिओ’चेदेखील सुशांतने साहाय्यक कलादिग्दर्शन केले. याबरोबर ‘सावंतांचं घर हेच का?’, तसेच ‘बाकी’ या लघुपटावर साहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्याने काम केले. विशेष म्हणजे, ‘सावंतांचं घर हेच का?’ या लघुपटात स्पृहा जोशीने अभिनय केला. याव्यतिरिक्त विविध राजकीय प्रचार अभियानांसाठीही सुशांतने आपले कौशल्य आजमावले. सुशांतने भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी त्यांच्या मतदारसंघात केलेल्या बहुविध विकासकामांची माहिती देणारे लघुपट या माध्यमातून बनवले आहेत. ‘ओप्पो’च्या टीव्हीसाठीच्या जाहिरातीकरिता त्याने काम केले. त्याच्या ‘द रेमनंट’ या लघुपटाचे ‘लॉस एँजेलिस लिफ्ट ऑफ फिल्म फेस्टिवल मार्च 2020’ साठी निवड झाली होती. कॅमेरात कैद होणारी ‘फ्रेम’ सजवण्यासोबतच सुशांतला आवड आहे ती चित्रकलेची. लहानपणापासून रंगकाम, गणपतीच्या मूर्ती बनविणे यात सुशांतला रस.
भाजप नागालॅण्ड, ‘बॅग इट’, ‘आयसीआयसीआय बँक’, ‘सनफिस्ट’, ‘हाइर ख्रिस्मस’, ’केळकर एव्ही’, या आणि अशा अनेक ब्रॅण्डसाठी त्याने दिग्दर्शन केले आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील ‘युवा कुंभ’वर आधारित माहितीपट, तसेच ‘पोलो’ या खेळाचा भारतीय उगम उलगडणारा ‘पोनी टेल्स’ हा माहितीपटाचा विशेष उल्लेखनीय कामांमध्ये सुशांत करतो. ईशान्य भारतात काम करणार्या ‘अमेझिंग नमस्ते’ या संस्थेसोबत विविध कामे केली. ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत 75 मोटरसायकलस्वारांना घेऊन ईशान्य भारताचे दर्शन घडवले. ‘नॉर्थ इस्ट ऑन व्हील्स’ या अभियानाला मोठे यश प्राप्त झाले. अशा या बहुरंगी-बहुढंगी कलाकाराला त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!