मुंबई (प्रतिनिधी) : मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून आणलेल्या चित्त्यांपैकी दोन चित्ते हे नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर २४ तासांच्या आत 'ओबान' आणि 'आशा' यांनी आपली पहिली शिकार केली आहे.
या शिकारीच्या बातमीमुळे नैसर्गिक अधिवासाशी जुळवून घेण्याचा पहिला टप्पा यशस्वी झाल्याचे लक्षात येते. येत्या काही काळात या १२ चित्त्यांच्या ताफ्यातले आणखी चित्ते नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येतील.
जगातील पहिल्या आंतरखंडीय हस्तांतरणाचा भाग म्हणून सप्टेंबर २०२२ मध्ये नामीबियातून भारतात आणलेल्या आठ चित्त्याच्या ताफ्यात दक्षिण आफ्रिकेतील १२ चित्ते दि. १८ फेब्रुवारीला भारतात आणले गेले. २०२२ मध्ये मान्यता प्राप्त झालेल्या 'प्रोजेक्ट चित्ता' अंतर्गत पुढील आठ ते दहा वर्षांसाठी दरवर्षी आणखी १२ चित्त्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
काय आहे ’प्रोजेक्ट चित्ता ?
’प्रोजेक्ट चित्ता’ला अधिकृतपणे भारतातील चित्ता परिचयाची कृती योजना म्हणून ओळखले जाते. या प्रकल्पाचे उद्दिष्ट विलुप्त झालेल्या चित्त्याला परत नैसर्गिक अधिवासात परिचित करणे हे आहे. सर्वाधिक शिकार आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे चित्ता भारतातून १९५२ मध्ये नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. गेल्या महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेने भारतात चित्ते पाठवण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. करारानुसार, १२ चित्त्यांची प्रारंभिक तुकडी दि. १८ फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात पाठवली गेली आहे. याच बरोबर पुढील आठ ते दहा वर्षांसाठी दरवर्षी आणखी १२ चे स्थलांतर करण्यात येणार आहे.