जगभरातून इतके चित्रपट, लघुपट, गाणी आणि कथा रोज तयार होत असतात, या सर्वांचे लक्ष कुठे ना कुठे अकॅडेमी अवॉर्ड्स म्हणजेच ऑस्कर अवॉर्ड्सच्या नामांकनावर लागलेले असते. आज १५ वर्षानंतर भारतीय गाण्याला नाटु नाटु गाण्याला ऑस्कर मिळाला. त्याचबरोबर द एलिफंट व्हिस्परर्स या लघुपटाला. या दोघांमध्ये सामान धागा काय? तर अस्सल मजकूर. यानिमित्ताने एकंदर मजकुराची केलेली चिकित्सा आणि लघुपटाचे रसग्रहण.
गोष्ट केरळमधली आहे. हत्ती स्थलांतर करताना घोळक्यात फिरतात. अन्नाच्या शोधात त्यांचा सतत प्रवास सुरु असतो. पिल्लं आपल्या आयांसोबत फिरतात. कळप पुढे निघून गेल्यावर काहीवेळा ही काही महिन्यांची पिल्लं मागे राहतात. त्यांना आपलं अन्न मिळवता येत नाही. अशावेळी एका माणसावर अशाच एका पिल्लाला सांभाळण्याची जबाबदारी येते. त्याच्या मदतीला एक मध्यमवयीन महिला असते जिला यापूर्वी हत्तींचा सांभाळ करण्याचा काहीही अनुभव नसतो. अशी दोन पिल्लं, अम्मू आणि रघु आणि बेली आणि बम्मन अशा ४ जणांचं कुटुंब. त्यांची कथा या लघुपटात सांगितलेली आहे.
हत्ती आणि माणसांची भावविश्व् कशी एकत्र येतात, आपली मुलगी गमावलेली स्त्री हत्तीला पाळताना कशी त्याच्यात गुंतत जाते आणि मग भावनिक नातं दृढ होत असतानाच बम्मनशी केव्हा लग्न करते, तेव्हा इथली लोकसंस्कृती, लोकगीतं, विवाह पद्धती, सोहळे, आणि खाद्यसंस्कृतीही आपल्याला दिसत असते. मानवी वस्ती आणि जंगली प्राणी यांच्यात होणारे संघर्ष याबाबत अनेक बातम्या आज आपल्याला पाहायला मिळतात. पण या दोहोंमध्ये कसा सुसंवाद आहे ही सकारात्मक बाजू या लघुपटातून स्पष्ट होते.
कार्तिकी गोन्साल्विसच्या या लघुपटाचे चित्रीकरण उत्तम. हत्तींसोबतच वाघ, माकडं, हरणं, शेकरू, पक्षी, अनेक वन्य जीवांचे उत्कृष्ट चित्रण झालंय. हरणाची भीतीयुक्त सावध नजर, वाघाची बेदरकार चाल आणि वेधक नजर, पक्षांचे जंगलावर लक्ष ठेवणारे डोळे आणि हत्तीचं मस्तीत चालणं, अगदी छोट्या छोट्या शॉट्स मधून अधोरेखित होतं. नेमकं काय दाखवायचं हे कॅमेरामॅनला उत्तम समजलंय. कथानकांबद्दल वेगळं सांगायला लागू नये कारण आपण गुंतत जातो त्यात. वाहवत जातो. लहान मूळ जेव्हा हत्तीशी दोस्ती करू पाहतात, तेव्हाचाची त्यांची उत्सुकता मग त्यातून आलेली भीती, मग हसू आणि मग निखळ मेट्रो. आणि या सर्व भावनांशी रघु हत्ती कसा एकरूप होत जातो हे सर्व चित्रण उत्कृष्ट झालंय.
संजना जेव्हा या दोघांसोबत राहायला येते, तेव्हा बेली तिला पिढ्या न पिढ्या चालत आलेल्या गोष्टी सांगते. मौखिक शिक्षण. आपल्याला बालपणी परंपरागत मिळत ते, त्यातल्या कथा, प्रदेशानुरूप वेगळेपण आणि मूल्यशिक्षण. ही भारताची ओळख आहे, संस्कृतीच्या वैविध्यामुळे जातक कथा आणि आजीच्या गोष्टीतून आपल्याला ही प्रादेशिक संस्कृती वाहती ठेवता येते. मजकुराची अस्सलता इथेच असते. इतका अस्सल मजकूर आपल्याकडे सहज उपलब्ध असताना आज बॉलिवूडच्या जमान्यात आपण स्टीरीओटाइप्सचे बळी पडतोय. कल्पनाविश्वात रमतोय फक्त, लोकांना काय हवंय ते दाखवण्यासाठी खेळतोय त्यांच्या भावनांशी.. तोच तो साचा.. त्याच त्या पद्धती, चे छोटे कपडे घातलेल्या स्त्रिया, हिरोगिरी करणारे पुरुष, संपत्ती आणि सत्तेचे भांडवलीकरण. यापेक्षा वेगळे काही दिसले की आपणही गढून जातो ते पाहताना, अनुभवताना. गरज मजकुराची आहे, तो जेवढा युनिक तेवढी त्याला मागणी. हे स्वाभाविक आहे.
नेटफ्लिक्स वर हा लघुपट उपलब्ध आहे. ज्यांनी पहिला नसेल त्यांनी जरूर पहा.
मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.