बाराव्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानाच्या माध्यमातून सर्व विश्वाच्या कल्याणासाठी विठ्ठलाला साकडं घातले. त्याच पसायदानाचा आदर्श ठेवून ‘याज्ञवल्क्य’ संस्था ज्ञातिबांधवांसहित सर्व कल्याणकरांच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी गेली ६७ वर्षे कार्यरत आहे. या संस्थेविषयी जाणून घेऊया.
१९५७ साली सुहास शाईवाले, वि. म. पांडे, पां. स. उपासनी आदी मंडळींनी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर याज्ञवल्क्य संस्थेची स्थापना केली. सुरुवातीचा काही काळ सामुदायिक व्रतबंध, श्रावणी असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात होते. हळूहळू काळाच्या ओघात संस्थेच्या कार्याचा विस्तार होत गेला. सुरुवातीला अ. ना. कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्यालयास विनामूल्य उपलब्ध करून दिली. १९७२ साली पुण्याचे मोटे वकील यांनी ‘दातार ब्लॉक’जवळील जागा संस्थेस नाममात्र भाड्याने दिली. आता उद्दिष्ट होते ते म्हणजे, संस्थेची इमारत उभी करणो. वि. म. पांडे, पां.स. उपासनी, भगवानराव कुलकर्णी यांची विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आली. संस्थेची इमारत बांधण्यासाठी कल्याण शहरातील अनेक दानशूर व्यक्तींनी संस्थेस सढळ हस्ते मदत केली. कल्याण शहरातील ज्येष्ठ जनरल प्रॅक्टीशिनर डॉ. सुरेश एकलहरे यांनी इतर विश्वस्तांच्या मदतीने निधी संकलनाच्या कामात पुढाकार घेतला व अल्पावधीतच संस्थेची वास्तू उभारण्याचे स्वप्न साकार झाले. ‘याज्ञवल्क्य’ संस्थेचे आधारस्तंभ, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून कार्यकारी विश्वस्त असलेल्या डॉ. सुरेश एकलहरे यांची ओळख आहे.१९८९ साली मुंबईचे तत्कालीन महापौर शरद आचार्य यांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.
संगीत, नृत्य, वादन, कीर्तन महोत्सव, व्याख्यानमाला व गरजूंसाठी मोफत वैद्यकीय आरोग्य शिबीर आदी उपक्रम समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी होत असतात. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय सेवा, प्रबोधनपर व्याख्यानमाला, कीर्तन महोत्सव असे अनेक विविध कार्यक्रम संस्था साजरे करू लागलीण डॉ. सुरेश एकलहरे, प्रा. राम कापसे, प्रा. चंद्रकांत चावरे, रमेश वाडेकर, श्रीपाद सराफ, चंद्रकांत पुराणिक आदी आपल्या कार्याने समाजाच्या आदरास प्राप्त असलेल्या विश्वस्त मंडळीमुळे संस्थेला दैदिप्यमान परंपरा लाभली. या सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या हितासाठी अहोरात्र झटणारे अध्यक्ष अ. ना. कुलकर्णी, वसंतराव कुलकर्णी, रमेश वाडेकर, राजीव जोशी, सुभाष काळे, चंद्रकांत वैद्य, राधाकृष्ण पाठक आदींनी कर्तव्यतत्परेने संस्थेचे नाव नावाजण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. नावारूपाला आलेल्या संस्थेच्या भविष्याची धुरा संस्थेच्या तरूण तडफदार विश्वस्त मिलिंद कुलकर्णी, राजीव जोशी, राधाकृष्ण पाठक व धनंजय पाठक यांनी खांद्यावर घेतली. यातून संस्थेच्या माध्यमातून होणारे ‘याज्ञवल्क्य पुरस्कार’, कीर्तन महोत्सव, स्वामी स्वरूपानंद सरस्वतीची प्रवचने, विद्यार्थी गुणगौरव समारंभ इ. कार्यक्रम अत्यंत आकर्षक पद्धतीने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बहुसंख्य कल्याणकरांपर्यंत पोहोचवण्यास संस्था यशस्वी झाली.
वश्वस्त मिलिंद कुलकर्णी यांनी घेतलेल्या अनेक क्रांतिकारक आणि कठोर निर्णयांमुळे संस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम झाली. संस्थेच्या इतिहासातील आजची कार्यकारिणी, अध्यक्ष, कार्यवाह व इतर पदाधिकारी हे विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कार्यक्षमतेने कार्य करीत आहे हे सांगताना अत्यंत आनंद होत असल्याचे डॉ. एकलहरे यांनी सांगितले.संस्थेचे अध्यक्ष अ. वा. जोशी, कार्यवाह प्रसन्न कापसे, कोषाध्यक्षा प्रिया कवठेकर आणि लेखापाल गणेश गाडगीळ या चार ही आधारस्तंभाच्या माध्यमातून संस्था आर्थिक चौकटीत राहून समाजकार्यात एक पाऊल पुढे टाकत आहे. सामाजिक बांधलिकी जपत संस्थेने कल्याण शहरातील इतर संस्थांच्या मदतीने डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांचा जाहीर सत्कार करून त्यांच्या ‘लोकबिरदारी’साठी १४ लाख रूपयांचा मदतनिधी सुपूर्द करण्यात आला होता. संस्थेच्या कार्याची केवळ कल्याणातच नाही, तर मुंबई, ठाण्यात ही दखल घेतली गेली. म्हणूनच मराठी वृत्तपत्र लेखक संस्था, परळ यांनी परिचय मासिक काढून महाराष्ट्रातील सहा संस्थांचा सत्कार केला. अशा विविध उपक्रमांसाठी प्रा. राम शेवाळकर, डॉ. यु. म. पठाण, माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख, नारायण सुर्वे, केशव मेश्राम, सरोजिनी वैद्य, मधु मंगेश कर्णिक, धर्मवीर आनंद दिघे, करवीरपीठाचे शंकराचार्य, माजी मुख्यमंत्री व लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्र महाजन अशा अनेक मान्यवरांनी संस्थेत उपस्थिती लावली आहे.
संस्थेने १९९९ पासून कल्याण व परिसरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य केलेल्या कल्याणकरांना आणि कल्याणच्या नावलौकिकात भर घालणार्या व्यक्तींना ‘याज्ञवल्क्य पुरस्कार’ देण्यास सुरूवात केली. आजतागायत संस्थेने दहा पुरस्कार दिले असून पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा ही सन्मान व्हावा म्हणून महिलांसाठी डॉ. सुरेश एकलहरे यांनी मातोश्रींच्या नावे ‘सुशीलाबाई एकलहरे पुरस्कार’ देण्यास सुरूवात केली.संस्थेने आजवर प्रसिद्ध उद्योजक जयकुमार पाठारे, प्रा. अशोक प्रधान, माजी आमदार प्रभाकर संत, उद्योजक मोहम्मद मुल्ला, माजी राज्यपाल प्रा. राम कापसे, उद्योजक श्रीकांत परळीकर, शिल्पकार भाऊ साठे, माजी नगराध्यक्ष भगवानराव जोशी, ‘ग्रंथसखा’चे श्याम जोशी या मान्यवरांना ‘याज्ञवल्क्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कालिंदीबाई जोशी, प्रतिभा भालेराव, अन्नपूर्णाबाई जोशी, माजी महापौर वैजयंती घोलप, प्रा. स्मिता कापसे या महिलांना ‘सुशीलाबाई एकलहरे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे.
संस्था ‘कोविड’च्या आपत्तीतही समाजकार्यासाठी मागे हटली नाही. संस्थेच्यावतीने गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे.समाजकार्यात महत्त्वाचे योगदान देणार्या व कल्याणच्या नावलौकिकात भर घालणार्या पुरूष सन्मानार्थींना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व २१ हजार रू. रोख प्रदान करण्यात येतात. ‘अनुबंध संस्थे’च्यावतीने कचरावेचक मुलांसाठी अखंडपणे ’ज्ञानयज्ञ’ चालू ठेवणार्या प्रा. मीनल सोहोनी यांना प्रदान यंदाच्या वर्षी प्रदान करण्यात आला. ’कोविड योद्धा’ म्हणून डॉ. विद्या ठाकूर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘याज्ञवल्क्य पुरस्कार’ दि. कल्याण जनता सहकारी बँकेचा पाया रचला व स्त्रीशिक्षणातून मंडळांच्या माध्यमातून कल्याणच्या शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले, अशा वामनराव साठे यांना तसेच ’ऑल इंडिया केमिस्ट अॅड ड्रगिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.