नामविश्वास

    01-Mar-2023   
Total Views |
Namwasis

 
रामाचे ध्यान करून भगवान शंकर आपला रामाविषयी आदर व्यक्त करतात असे नव्हे, तर आपल्या ध्यानमूर्ती रामाचे गुण अत्यंत आदराने ते आपल्या पत्नीला उमेला सांगतात. आपल्याला आनंद देणारे सत्य आपल्या अर्धांगिनीला सांगावे, हा स्वभावधर्म आहे. महादेव जेव्हा आपल्या अर्धांगिनीसमोर रामाचे, रामनामाचे गुणवान करतात, तेव्हा त्यांनी ते किती मनापासून केले असले पाहिजे, हे सांगण्याचा स्वामी प्रयत्न करतात.



महाराष्ट्रात शिवपूजनाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. भारतातीलमहादेवाच्या प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाच महाराष्ट्रात आहेत, हे आपण यापूर्वी पाहिले आहे. यावरून महाराष्ट्रातील महादेवाच्या उपासनेचेमहत्त्व स्पष्ट होते. भगवान शंकरांचा नामावर विश्वास आहे, असे सांगून स्वामी त्याआधारे रामनामाचे महत्त्व पुढील श्लोकात सांगत आहेत-

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो।
उमेसी अती आदरें गूण गातो।
बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें।
परी अंतरीं नामविश्वास तेथें॥(८३)

यापूर्वीच्या श्लोकातून स्वामींनी भगवान शंकरांनी हलाहल विषाचादाह शमविण्यासाठी रामनामाचा आश्रय घेतला, हे सांगितले आहे. आता त्या महादेवाचे सामर्थ्य स्वामी या श्लोकात स्पष्ट करीत आहेत. अशा सामर्थ्यवान शंकरांनी रामानामाची महती व रामाचे गुण आदरपूर्वक आपल्या पत्नीला उमेला सांगितले, असे स्वामी या श्लोकात म्हणतात.आपल्या भक्तांचे मनोगत पुरवणारा महादेव, भक्तांसाठी भोळासांब असला तरी प्रसंगी क्रोधित झाल्यावर त्यांच्यासमोर कोणीही टिकू शकत नाही, अशी त्यांची ख्याती आहे. पुराणात शंकरांना ‘त्रिनेत्रधारी’ म्हटले आहे. त्यांच्या ठिकाणी तिसरा नेत्र आहे. महादेवाची आपला तिसरा डोळा उघडला, तर त्यातील तेजाच्या प्रभावाने समोरील वस्तू भस्मसात होते, असे वर्णन पुराणात आहे. तथापि, शंकर आपलातिसरा नेत्र क्वचितच उघडतात. या शंकरांनी एकदा कामदेवाला नेत्रज्वाळांनी भस्मसात केले होते, अशी कथा पुराणात आहे. या घटनेचा संदर्भ स्वामींनी या श्लोकांच्या पहिल्या ओळीत दिला आहे. तो प्रसंग असा होता.



मदन ही कामक्रिडेची देवता मानली जाते. पुरुषांच्या कामक्रियेचे अधिपत्य मदन करीत असतो, तर स्त्रियांमधील कामाचे नियोजन जी देवता करते तिला ‘रती’ असे म्हणतात. ही रतीमदनाची जोडी विश्वातील लोकांची कामभावना, प्रेमभावना निर्माण करीत असते. ते त्यांचे विहितकर्म आहे. त्यामुळे जीवसृष्टी टिकून आहे व ती विस्तार पावत आहे. या मदनाने एकदा पार्वतीमातेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भगवान शंकरांनी पुष्प बाणांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वैराग्यशील शंकर क्रोधायमान झाले आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला. क्षणार्धात त्या नेत्रातील तेजप्रभावाने महादेवांनी मदनाला जाळूनटाकले, अशी कथा पुराणात आहे. समर्थांनी महादेवाचे अफाट सामर्थ्य दाखवण्यासाठी, ‘जेणे जाळिला काम’ असा शंकरांचा उल्लेख येथे केला आहे. असा सामर्थ्यवान शंकरही रामाचे ध्यान करतो, असे स्वामी सांगतात. रामाचे ध्यान करून भगवान शंकर आपला रामाविषयी आदर व्यक्त करतात असे नव्हे, तर आपल्या ध्यानमूर्ती रामाचे गुण अत्यंत आदराने ते आपल्या पत्नीला उमेला सांगतात. आपल्याला आनंद देणारे सत्य आपल्या अर्धांगिनीला सांगावे, हा स्वभावधर्म आहे. महादेव जेव्हा आपल्या अर्धांगिनीसमोर रामाचे, रामनामाचे गुणवान करतात, तेव्हा त्यांनी ते किती मनापासून केले असले पाहिजे, हे सांगण्याचा स्वामी प्रयत्न करतात.


भगवान शंकरांची योग्यता असामान्य आहे, हे सांगण्यासाठी शंकरांचे यथातथ्य वर्णन स्वामी या श्लोकाच्या तिसर्‍या ओळीत देत आहेत. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य या तीन गोष्टी महादेवांच्या ठिकाणी एकवटल्या आहेत. ज्ञान हा बुद्घीचा विषय आहे. सृष्टीज्ञान तसेच ब्रह्मज्ञान आत्मसात करण्यासाठी बुद्घीची आवश्यकता असते. ऐेहिक तसेच पारमार्थिक बाबतच्या सर्व ज्ञानाचे अध्वर्यु भगवान शंकर आहेत. परमार्थ साधनेतील ध्यान, समाधी अवस्था, तप:साधना या सार्‍यांचे मूळ महादेव आहेत. तेथूनच या क्रिया सुरू झाल्या असे मानण्यात येते. सर्व योग्यांच्या, तपस्वींच्या गुरूस्थानी भगवान शंकर आहेत. असे असूनही आपल्या योग्यतेचा, ज्ञानीपणाचा यत्किंचितही गर्व महादेवांना कधीही होत नाही. याला कारण म्हणजे त्यांच्या अंगी असलेली वैराग्यशीलता. भगवान शंकरांच्या ठिकाणी जाज्वल्य वैराग्यवृत्ती असल्याने त्यांनी आणखी काही मिळवण्याची कामना नाही. निरिच्छ व वैराग्यशीलतेमुळे शंकरांना स्मशानात राहणेही आवडते. पूर्वीच्या काळी, पुराणानुसार इंद्रपद प्राप्त करून घेण्यासाठी देव ध्यान धारणा, तप करीत असत. या तपस्व्यांचे आदिपुरुष असूनही महादेवांच्या ठिकाणी कसल्याही प्राप्तीची इच्छा नाही. त्यांच्याअंगी खरे वैराग्य, ज्ञानसंपन्नता आणि अफाट प्राप्तीची इच्छा नाही. त्यांच्या अंगी सामर्थ्यांची अनेक उदाहरणे पुराणात सांगितली आहेत. त्यापैकी एक सांगतो. रावण महापराक्रमी व बलाढ्य शक्तिमान असा शिवभक्त होता.

एकदा पूजेसाठी मूळ कैलास पर्वतावरील शिवलिंग मिळवण्यासाठी त्याने कैलासपर्वत उचलला होता. त्यामुळे कैलासपर्वतवरील सर्वजण भयभीत झाले. त्यावेळी भागवन शिव ध्यानस्त होते. तशा स्थितीत त्यांनी कैलासपर्वत हलवणार्‍या रावणाला आपल्या पायाच्या अंगठ्याने तेथेच दाबून टाकले व सर्वांना संकटमुक्त केले. शंकर जितके सामर्थ्यवान तितके उदार म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या औदार्याने शंकरांनी कुबेराला धनवान केल्याची कथा पुराणात आहे, असे हे ज्ञानी उदार सामर्थ्यवान महादेव रामनाम गातात आणि रामनामावर त्यांचा दृढविश्वास आहे.तेव्हा आपण रामनामाचा स्वीकार केला पाहिजे, त्यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे.महाराष्ट्र समन्वयवादी असल्याने शैव आणि वैष्णव यांच्यात झगडे झाले नाहीत. राम श्रेष्ठ की शिव महान, अशा स्वरूपाच्या विचारांना येथे स्थान नव्हते. परमार्थ क्षेत्रातील भक्तिपंथ निवडण्याचे येथे प्रत्येकाला स्वातंत्र्य होते. महाराष्ट्रात अनेक भक्तिपंथ उदयाला आले. त्यात प्रामुख्याने मोठा पंथ विठ्ठल भक्तीचा आहे. तो भगवंत पंथ किंवा वारकरी पंथ म्हणूनही ओळखला जातो. या पंथात बहुजन समाजाचा फार मोठा वर्ग सहभागी आहे. या संप्रादायाला ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम व इतर अनेक संत लाभले. त्यांनी संस्कृती समृद्ध केली. त्यामुळे रामदासस्वामींनाही ‘विठोबा’ या अत्यंत प्रिय दैवताचा संदर्भ मनाच्या श्लोकात द्यावा लागेल. तो संदर्भ या पुढील ८४व्या श्लोकात आला आहे.

 
मनाच्या श्लोकात बहुतेक सर्वत्र रामनामाचे महत्त्व विशद केले आहे. भगवान शंकर मोठ्या आदराने रामाचे, रामनामाचे गुणगान करतात, म्हणून महादेवांचे उल्लेख काही श्लोकांतून स्वामी करीत असतात. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या डोक्यावर शिवालिंग कोरलेले आहे. विठोबा हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय दैवत आहे. त्याच्या आधारे स्वामींनी रामनामाचा विश्वास दाखवला आहे. सर्वांना प्रिय अशा विठोबाने आदराने शिवाला मस्तकी धारण केले. महादेवाचा ते सन्मान करतात, असा तपस्वी महादेव विष निवारणासाठी रामनाम घेतो. म्हणून आपणही रामनामावर विश्वास ठेवावा. तो पुढील श्लोक क्रमांक ८4 विषय असल्याने नंतर सविस्तरपणे पाहता येईल.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..