मान ना मान, मै तेरा मेहमान!

    09-Feb-2023   
Total Views | 116
Turkey refuses to host Pakistan PM Shehbaz Sharif as leadership busy in earthquake relief work


तुर्कस्तान आणि सीरियात झालेल्या अत्यंत भीषण आणि विनाशकारी भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला. या भीषण भूकंपात तब्बल १६हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. जगभरातील देशांनी एकजुटतेचे दर्शन घडवत सीरिया आणि तुर्कीला मदत पाठवण्यास सुरूवात केली आहे. जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाल्यानंतर तुर्कीचा मित्र पाकिस्तान तरी मागे कसा राहील म्हणा. परंतु, पाकिस्तानने नेहमीप्रमाणे माती खात या संकटकाळातही संधी शोधण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली.

तुर्की आणि सीरिया भूकंपाने उद्ध्वस्त झाले असून आता त्यांना जगभरातील देशांकडून मदतीची आस आहे. अनेक देशांकडून तुर्कीला बचाव पथके, आवश्यक साहित्य आणि मदत पोहोचवली जात आहे. ’ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारताकडूनही तुर्की आणि सीरियाला मदत पोहोचवली जात आहे. मात्र, इकडे मदत करायची सोडून पाकने भलतेच टुमणे काढले आणि त्याचा परिपाक घोर अपमानात झाला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मित्रदेश तुर्कीसोबत आपली एकजुटता दर्शविण्यासाठी राजधानी अंकाराला भेट देणार असल्याची घोषणा केली. परंतु, भूकंपग्रस्त तुर्कीने शरीफ यांना हा दौरा न करण्यास सांगत परवानगी नाकारली. तसेच, भूकंपासारख्या आपत्तीच्या काळात तुर्कीने स्पष्ट शब्दांत शरीफ यांना दौरा न करण्यास सांगितले असून पाहुणचार करण्यासही नकार दिला आहे. मित्रदेश तुर्कीनेच पाक पंतप्रधानांना अशाप्रकारे पाहुणचार करण्यास ना म्हटल्याने पाकिस्तानची उरलीसुरली इज्जतही धुळीस मिळाली.

तुर्कीच्या या निर्णयाने पाकला आंतरराष्ट्रीय आणि राजनैतिक पातळीवर मोठा धक्का बसला असून यानंतर पंतप्रधान शरीफ यांच्यावर तुर्कस्तानचा दौरा पुढे ढकलण्याची नामुष्की ओढावली आहे. दरम्यान, विनाशकारी भूकंपाच्या एका दिवसानंतर, पाकिस्तानच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी ट्विट करत पंतप्रधान शरीफ तुर्कस्तानला भेट देण्यासाठी अंकाराला रवाना होतील. ते राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांची भेट घेत भूकंपाबाबत माहिती घेतील. याच कारणास्तव गुरुवारी बोलावलेली एपीसी बैठक पुढे ढकलण्यात येत आहे. मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतर नवीन तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती दिली. मात्र, त्यांच्या ट्विटनंतर काही तासांनीच तुर्कीच्या पंतप्रधानांचे माजी विशेष साहाय्यक आझम जमील यांनी ट्विट करून शरीफ यांचा पाहुणाचार करण्यास नकार देत तुर्कीला देशातील नागरिकांची संकटकाळात काळजी आहे. त्यामुळे केवळ मदत आणि मनुष्यबळ पाठवण्याची मागणी त्यांनी केली.

दौर्‍याला नकार दिल्यानंतर अपमान पचवतानाही पाकची चांगलीच दमछाक झाली. भूकंपानंतर सुरू असलेले मदतकार्य आणि खराब हवामानामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे मंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले. तसेच, मित्रदेश तुर्कीला मदतनिधी उभा करण्यासाठी पंतप्रधान मदत निधी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंत्रिमंडळाने एक महिन्याचा पगारही मदत निधीला देण्याची घोषणा केली. तसेच शरीफ यांनी बंधू देश तुर्कीला उदारपणे मदत करण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानने तुर्कीला मदत केली खरी परंतु त्या मदतीच्या नावाखाली आपला कुटील डाव खेळण्याची संधी काही दवडली नाही. परंतु, तुर्कीने हा डाव वेळीच हाणून पाडला. विशेष म्हणजे, पाक आणि तुर्की हे मित्रदेश मानले जातात. दोन्ही देशांमधील संबंध मजबूत असून दोन्ही देश संरक्षण आणि व्यापार क्षेत्रात एकत्र काम करत आहेत.

तुर्कस्तानने संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला पाठिंबा दिला. एर्दोगान आणि तुर्कीचे परराष्ट्रमंत्री यांनीही काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात अनेकदा मांडला आहे. त्यामुळे तुर्की हा भारताचा विरोधक असूनही भारताने संकटकाळात त्याचा विचार न करता सर्वात आधी मदतीचा हात पुढे केला. परंतु, इकडे पाकिस्तानने भारताच्या मदत पोहोचवणार्‍या विमानांना एअर स्पेस देण्यासही नकार दिला.विनाशकारी भूकंपानंतर आणि बदलत्या जागतिक परिस्थितीनंतर तुर्कीला शहाणपण सुचले आहे. कारण, पाकिस्तानचे खायचे वांदे असताना तो आपल्याला काय वाचवणार आणि कितपत मदत करणार हा प्रश्नच आहे. परंतु, आता भारतासारख्या देशांसोबत चांगले संबंध ठेवले, तर ते तुर्कीसाठी आर्थिकदृष्ट्या हिताचे आहे. कारण, कंगाल आणि बदनाम राष्ट्राशी मैत्री ठेवून वाटोळे करून घेण्यापेक्षा अडचणीत मदतीला धावणारा आणि वैर न ठेवणारा भारत कधीही बरा याची खात्री तुर्कीला झाली असेल.


पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121