इस्तंबूल : तुर्कस्तानला गेल्या २४ तासांत पाच वेळा भूकंपाचा धक्का बसला असून, त्यात सहा हजारांवर नागरिकांचा मृत्यू झाला, तर ढिगार्यांखाली अडकलेल्यांची संख्या हजारोंवर असल्याने मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपाचे गेल्या दोन दिवसांत ५ धक्के बसले आहेत. यात ५ हजार २०० जणांचा मृत्यू झाला असून २० हजाराच्यावर जखमी आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने मृतांची संख्या २० हजारांपेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
भारताकडून मदतीचा ओघ
तुर्कीमध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या पाच भूकंपामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. तुर्की सरकारच्या मदतीने भारताने वैद्यकीय पथकासह ‘एनडीआरएफ’चे पथक भूकंपग्रस्त भागात पाठवले आहेत. भारतातून तेथे दोन बचावपथके पाठवण्यात आली आहेत. या बचाव पथकांसोबत एक डॉक्टरांची टीमदेखील आहे.
पाकिस्तानची आगळीक सुरूच
स्वतःला तुर्कस्तानचा जवळचा मित्र म्हणवून घेणार्या पाकिस्ताने तुर्कीच्या मदतीसाठी भारताने पाठवलेल्या विमानाला एअर स्पेस वापरण्याची परवानगी दिली नाही. मदतकार्यासाठी तुर्कस्तानला जाणार्या भारतीय विमानाला हवाई क्षेत्र देण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे. पाकिस्तानच्या या असंवेदनशीलतेवर टीका केली जात आहे.
पंतप्रधान मोदी झाले भावूक
तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे तेथे मोठा विध्वंस झाला आहे. या भूकंपाबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले असून या भूकंपानंतर त्यांना गुजरातमधल्या भूजमध्ये झालेल्या भूकंपाची आठवण झाली. या भूकंपातही हजारो लोकांचे बळी गेले होते. भाजप खासदारांच्या बैठकीत मोदी त्यांनी २००१ च्या भूज भूकंपाची आठवण काढली. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते.