ठाणे शहराचा विकास झपाट्याने होत असून शहरातील बदल नागरिकांना दिसायला सुरुवात झाली आहे. ठाणे बदलत आहे. ठाण्यात विविध सेवासुविधा प्राप्त होत आहेत. शहराच्या स्वच्छतेत ठाणेकरांचे महत्त्वाचे योगदान असून स्वच्छतेमुळेच शहराची वाटचाल आरोग्यदायी शहराकडे होत आहे. स्वच्छ व आरोग्यदायी ठाणे शहर निर्माण होणार असल्याचे दस्तरखुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच एका जाहीर कार्यक्रमात नमूद केले होते. या अनुषंगाने ठाणे महापालिकेचा आरोग्य विभागही कात टाकत असून त्याचा प्रत्यय आरोग्य विभागाच्या विविध उपक्रम आणि कामकाजातून दिसत आहे.
सागरी, नागरी, डोंगरी अशा विस्तारलेल्या ठाणे शहरात येऊर, पानखंडा हा डोंगरी, तर गायमुख, बाळकुम, कोलशेत, कोपरी हा खाडी किनारी आणि उर्वरित जुने ठाणे हा नागरी परिसर आहे. अशा भल्या मोठ्या शहरासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, लोकमान्य कोरस रुग्णालय, पार्किंग प्लाझा रुग्णालय, कौसा रुग्णालय तसेच सहा प्रसूतिगृहे आणि किसननगर आरोग्य केंद्र, मानपाडा आरोग्य केंद्र, शिळ आरोग्य केंद्र, सी. आर. वाडिया आरोग्य केंद्र, रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र, कोपरी आरोग्य केंद्र अशी एकूण 28 आरोग्य केंद्रे रुग्णसेवा पुरवतात. यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्यसुविधा निर्माण करण्यात आल्या असून जागतिक दर्जाचे धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्राचे लोकार्पण 2021 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले आहे. ‘प्लॅटिनम हॉस्पिटल’ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या या केंद्रात 100 बेड्स उपलब्ध असून गोरगरीब रुग्णांना अत्यल्प दरामध्ये सुविधा पुरवल्या जातात.
सर्वसामान्य रुग्णांसाठी हृदयासंबंधीच्या सर्व सुविधा ‘महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजने’च्या अधीन राहून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘टू डी इको’पासून ते ‘अॅन्जिओग्राफी’, ‘अॅन्जिओप्लास्टी’, ‘स्टेंट’ टाकणे, याशिवाय बायपास शस्त्रक्रियेसह तदनुषंगिक विविध उपचार विनामूल्य दिले जातात. त्यामुळे गेली दोन वर्षे ‘महात्मा फुले योजना’ ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच, केंद्र सरकारच्या ‘आईडीएसपी’ (खपींशसीरींशव ऊळीशरीश र्र्डीीींशळश्रश्ररपलश झीेक्षशलीं) योजनेंतर्गत बहुतांश वेळा महाराष्ट्रात सर्वप्रथम क्रमांकाचे रिपोर्टिंग ठाणे मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे. कळवा रुग्णालयात दररोज 1500 हून अधिक रुग्णांना आरोग्यसेवा दिली जात असून अद्ययावत अतिदक्षता विभाग 20 खाटांवरून 40 खाटांचे, तर ‘एनआयसीयु’ विभाग 20 खाटांवरून 30 खाटांचे करण्यात येत आहे. दिव्यांग दाखले देण्याची अतिशीघ्र यंत्रणा राबवण्यात येत असून दिव्यांगांची आठवड्यातून तीन दिवस तपासणी केली जात आहे. कळवा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तात्पुरत्या निवार्याची सुविधा पुरवण्याबरोबरच सकाळची न्याहरी, दुपारचे व रात्रीचे भोजन देण्याची सुविधा ‘अक्षय चैतन्य योजने’तून सुरु केले जात आहे. राज्य शासनाचा ’बाल आधार’ कार्यक्रम सुरू करून तब्बल 500 हून अधिक नवजात शिशूंना आधारकार्डचे वाटप ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
कोविड काळात ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने अभूतपूर्व कामगिरी बजावली. ठाणे मनपा क्षेत्रात ‘ग्लोबल’सारखे भव्य कोविड रुग्णालय तसेच अन्य ठिकाणी ‘कोविड’ केंद्रे उभारून तब्बल 15 हजार गंभीर ‘कोविड’ रुग्णांना जीवनदान दिले. यासाठी अद्ययावत ‘मायक्रोमायकोसिस’ बाह्यरुग्ण विभाग व उपचार केंद्र उपलब्ध करून 225 खाटांचे अद्ययावत अतिदक्षता विभाग सज्ज ठेवला होता. लसीकरणातही ठाणे पालिकेने आघाडी घेत तब्बल एक लाख लाभार्थ्यांना ‘कोविड’ लसीकरण केले.
लखलखते ’ठाणे’
वीजबचतीच्या उपाययोजना राबविण्यात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने मुख्यमंत्र्यांचे ’ठाणे’ विविधारंगी तसेच राष्ट्राभिमान जागवणार्या तिरंगा रंगातील विद्युत रोषणाई करून लखलखते ’ठाणे’ बनवले आहे. ‘सोडियम व्हेपर’ऐवजी ’एलईडी’ दिवे लावल्याने चंदेरी प्रकाशात ठाणे शहर न्हाऊन गेले आहे. यामुळे वीज बचत झाली असून कोट्यवधी रुपयांच्या वीजबिलाचीही बचत झाली आहे.
ठाणे महापालिका विद्युतसंवर्धन करण्यासाठी कायम अग्रेसर राहिली असून त्याकरिता महापालिकेस विविध राज्यस्तरीय, तसेच राष्ट्रीय पुरस्कारांनी वेळोवेळी गौरविण्यात आले आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून गेल्या वर्षांपासून ठाणे रस्त्यांवरील पथदीपांसाठी ’सोडियम व्हेपर’च्या दिव्यांऐवजी ऊर्जा कार्यक्षम ’एलईडी’ दिव्यांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक रस्ते चंदेरी प्रकाशाने उजळले असून सदर दिव्यांच्या वापराने वीजवितरण क्षमता कमी होऊन वीजबिलात मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण 43 हजार ‘सोडियम व्हेपर’ दिव्यांपैकी तब्बल 40 हजार ‘एलईडी’ पथदिवे लावण्यात आले आहेत. यासाठी कुठलाही भांडवली किंवा महसुली खर्च आलेला नाही. यामुळे दहा लक्ष युनिटची वीज बचत दरमहा होत असून त्यासाठी वार्षिक सुमारे दहा कोटींपेक्षा जास्त वीजबिलाची बचत होत आहे.
ठाणे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून ठाणे शहर सौंदर्यीकरणाच्या कामात विद्युत विभागाचे भरीव योगदान आहे. विद्युत विभागाने ठामपा मुख्यालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, राम गणेश गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह तसेच ठाणे न्यायालय आदी वास्तूंना तिरंगा रोषणाईने झळाळून टाकले असल्याने रात्रीच्या वेळेस ’ठाणे’ मनोहारी भासते. याशिवाय शहरातील चौक ‘एलईडी’ बल्ब स्टोनने सुशोभित केले असून सात ते आठ पादचारी पूल आणि सर्व उड्डाणपुलांना त्या त्या आर्च तसेच आकारमानानुसार मोटीफ पद्धतीने मोराच्या चित्रांना ‘एलईडी’ रोषणाई करण्यात आली आहे. उड्डाणपुलाच्या ‘रूफ टॉप’लाही दिवे बसवले असल्याने खालून चालणार्या पादचार्यांना नयनरम्य देखावा दिसतो. शहरांच्या आठ ते नऊ प्रवेशद्वारांवरही तिरंगा स्ट्रीप लावल्याने ठाण्यात रात्रीच्या वेळेत प्रवेश करताना शहराचे विलोभनीय दृश्य दिसते. शहरातील खाडी किनारी रस्ते, रेल्वे मार्गाखालील सब-वे रोषणाईने उजळून निघाल्याने रात्री शहरात फेरफटका मारताना जणु परदेशी वारी केल्याची अनुभूती मिळत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात.