सामाजिक संस्थांना आर्थिकबाबतीत ‘आत्मनिर्भर’ करण्याचा मानस बाळगणारे आणि आपल्या शिक्षणाचा फायदा तळागाळातील लोकांना व्हावा, यासाठी प्रयत्नरत डॉ. राहुल अनंत भांडारकर यांच्या समाजसेवेचा प्रवास...
डॉ. राहुल अनंत भांडारकर यांचा जन्म डोंबिवलीच्या मराठमोळ्या कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव हे उडुपी, मंगळुरू. परंतु, कामानिमित्त त्यांचे कुटुंब सुरूवातीला डोंबिवली आणि नंतर वसई येथे स्थायिक झाले. त्यांचे वडील वसई येथील एका हॉटेलमध्ये सुरुवातीला ‘हेल्पर’ म्हणून काम करायचे. डॉ. राहुल भांडारकर यांचे प्राथमिक शिक्षण डोंबिवलीमधील ’सेंट मेरी स्कूल’ या शाळेत झाले. तसेच माध्यमिक शिक्षण वसई येथील ’कोलिवाडा कॉन्व्हेंट सेंट एन्थनीज’ या शाळेतून, तर महाविद्यालयीन शिक्षण अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर ‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मधून शिष्यवृत्ती मिळवून ’मार्केटिंग’ या विषयात एमबीएचे शिक्षणही त्यांनी पूर्ण केले. तसेच भांडारकर यांनी ’कन्झ्युमर बिहेविअर’ या विषयात पीएच.डी प्राप्त केली आहे.
मुळात डॉ. राहुल भांडारकर यांच्या वडिलांनी कन्नड माध्यमातून जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्यासाठी भांडारकरांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. मग कुटुंबीयांना घरगुती पापड, साबण बनवणे या कामातून त्यांनी मदत करत आपले शिक्षण पूर्ण केले. तसेच मामा अरूण पै यांनी डॉ. राहुल भांडारकर यांना शिक्षणासाठी मदत केली होती. त्यांचे ते कायम ऋणी असल्याचे भांडारकर सांगतात. लहानपणी रा. स्व. संघाच्या डोंबिवली शाखेत पेंडसे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पहिले पाऊल टाकले आणि इथेच समाजसेवेचे बाळकडू त्यांना मिळाले. “आयुष्यात रा. स्व. संघामुळे परिवर्तन घडून आले आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली,” असे डॉ. राहुल भांडारकर अगदी अभिमानाने सांगतात. आज स्वा. सावरकर यांचे भाषाशुद्धीचे कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानविषयक कार्य, छत्रपती शिवाजी महाराजांची ‘मॅनेजमेंट स्ट्रेटेजी’ यांसारख्या विषयांवर ते व्याख्याने देतात.
आपल्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी करावा, म्हणूनच डॉ. राहुल भांडारकर समाजसेवेकडे वळले. तसेच समाजजागृतीसाठी सावरकर स्मारकाने प्रकाशित केलेल्या ‘अपरिचित सावरकर’ या सावरकरांवर होणार्या आक्षेपांचे खंडन करणार्या एक हजार पुस्तिकेचं वाटप स्वखर्चातून डॉ. भांडारकर यांनी वसई परिसरात केले. त्यावेळी त्यांना बराच विरोधसुद्धा झाला. परंतु, त्यांनी विरोधाला न जुमानता पुस्तिकेचे वाटप केले. तसेच ‘वसईचा राजा’ गणेश उत्सवाच्या माध्यमातून २००० साली त्यांनी समाजकार्याचा श्रीगणेशा केला. प्रारंभी फक्त गणेशोत्सव साजरा करणारी संस्था म्हणून या संस्थेचे स्वरूप होते. मात्र, तरुणांच्या सहभागाने या संस्थेच्या माध्यमातून वर्षभर आता वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.
‘कोविड’ काळात वसईचा राजा आणि ‘एलटीजी’ (लाईव्ह टू गिव्ह ग्रुप) संस्थेंतर्गत वैयक्तिक पातळीवर ४० लाख रुपयांची मदत संस्थेला डॉ. राहुल भांडारकर यांनी मिळवून दिली. त्या पैशांतून ‘कोविड’ काळात शालेय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरणे, वसईजवळ असणार्या दुर्गम भागात तीन महिने मोफत घरगुती किराणा सामान देणे, तसेच डायलिसिस रुग्णांना मोफत प्रवासाची सुविधा उपल्बध करून देण्यात आली होती. ‘कृपा फाऊंडेशन, वसई’च्या ‘अॅडव्हायझरी बोर्ड’चे सदस्य म्हणूनदेखील डॉ. राहुल भांडारकर काम करतात. ही संस्था व्यसनमुक्ती आणि ‘एचआयव्ही’ रुग्णांसाठी काम करते. या संस्थेलादेखील त्यांनी आर्थिक मदत पुरवली आहे. ’सेवा विवेक’ संस्थेत डॉ. राहुल भांडारकर हे ‘बांबू सेवक’ म्हणून कार्यरत आहेत. तसेच स्वामी विवेकानंद केंद्राद्वारे गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून देणे, विद्यार्थ्यांच्या वाचनाची आवड वाढावी, यासाठी सावरकर स्मारकाच्या आणि स्वखर्चातून डॉ. भांडारकर यांनी पापडी येथील गोवर्धन जिल्हा परिषद शाळेला ४० पुस्तके दिली आहेत. तसेच नालासोपारा येथील पंचमुखी नागेश्वर मंदिरात २५० इंग्रजी, मराठी, हिंदी पुस्तके आणि ब्रेल लिपीतील ५० दुर्मीळ पुस्तके त्यांनी ‘वसईचा राजा’ संस्थेच्या माध्यमातून दिली आहेत. ‘सेवा हेच समर्पण’ हे आपल्या कामाचे ब्रीदवाक्य असल्याचे ते सांगतात.
‘मैत्री फाऊंडेशन’तर्फे ‘डॉ. बी. आर. आंबेडकर सेवारत्न पुरस्कार’, ‘लखनौ वेलनेस फाऊंडेशन’तर्फे ’समाजरत्न पुरस्कार’, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बांबूसेवक, ‘नेशन्स प्राईड बुक ऑफ रेकॉर्ड्स, दिल्ली’ द्वारा ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय रत्न पुरस्कार’, राष्ट्रीय भजुआ विकास संघटनेतर्फे ’महात्मा जोतिबा फुले देवरत्न पुरस्कार’, ‘प्रतीक्षा फाऊंडेशन’तर्फे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ‘सेवासन्मान २०२३’, ’हिंदवी स्वराज संघटने’तर्फे ‘सेवाव्रत सन्मान’ यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
अर्थशास्त्र हा त्यांचा आवडता विषय असल्यामुळे आपल्या शिक्षणाचा फायदा करून सामाजिक काम करणार्या संस्थांना आर्थिक बाबतीत ‘आत्मनिर्भर’ कसे बनवता येईल, त्यासाठी त्यांना भविष्यात कार्य करायचे आहे. “ ‘सेवा विवेक’ अशी एकमेव संस्था आहे, जी समाजापुढे आर्थिक गोष्टीसाठी हात न पसरता आपले उत्पादन विकत घेण्याचे आवाहन करते,” असेही डॉ. राहुल भांडारकर सांगतात. त्यामुळे भविष्यात ‘सेवा विवेक’ संस्था देश पातळीवर कशी ओळखली जाईल आणि जगभरात बांबू उत्पादनासाठी भालिवली हे ठिकाण कसे ओळखले जाईल, यासाठी काम करण्याचा डॉ. राहुल भांडारकर यांचा मानस आहे. त्यांना आगामी वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा....!
-सुप्रिम मस्कर