वर्धा : संमेलन स्थळी एकूण 286 पुस्तकांची व इतर वस्तूंची दुकाने थाटली होती. दिवसभर सर्वच दुकानांतून खरेदी करणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. पुस्तकांसोबतच इतरही वस्तूंची विक्री होत आहे. स्टोरीटेल मराठी, मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठीची मराठी मंडळे आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहोचावे म्हणून वैशिष्ट्यपूर्ण रीतीने धरणे धरून बसली होती. ३ दिवसांच्या संमेलनात २ कोटी ८९ लक्ष रुपयांची एकूण पुस्तके विक्रीला गेल्याचे आयोजक प्रदीप दाते यांच्याकडून समजते.
स्टोरीटेलने मराठीतील पाच हजारांहून अधिक सर्वोत्तम पुस्तके ऑडिओ स्वरूपात मोबाईलवर उपलब्ध करून देऊन मराठी भाषा संवर्धनाचे मोठे काम केले आहे. यामुळे मराठी भाषिक आपल्या स्मार्टफोनवर जगात कुठेही, कितीही आणि कधीही मराठी भाषा ऐकू शकतात. स्टोरीटेल इंडियाचे कंट्री मॅनेजर योगेश दशरथ यावेळी म्हणाले, “९६ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन साजरे करण्यासाठी स्टोरीटेलच्या माध्यमातून आम्ही विशेष योजना घेऊन येत आहोत. अवघ्या पाचशे रुपये वार्षिक वर्गणीत पाच हजारांहून अधिक मराठी ऑडिओबुक्सचा खजिना या दरम्यान साहित्यप्रेमी, दर्दी रसिक अनुभवू शकतील."
मराठी भाषा विभागाने पत्रपेटी व मजकूर लिहिलेली पत्रे ठेवली होती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे कसे योग्य आहे हे सांगणारी उदाहरणे लिहून पत्रे तयार ठेवली आहेत. राष्ट्रपतींचा पत्ता असलेल्या या पत्रावर प्रेषक म्हणून आपापले नाव लिहून पत्र पेटीत टाकण्यात आले.
विवेक प्रकाशनाच्या पद्मश्री रमेश पतंगे लिखित स संविधानाचा पुस्तकाला मिळणारा प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे. कित्येक पालक आपल्या मुलांसाठी संविधान घेऊन जात आहेत. हे सर्व शालेय वयातच मुलांना शिकवायला हवे अशी प्रतिक्रिया एका बाबांनी यावेळी दिली. इंडस बुक सोर्सचे शांताराम म्हणाले,”कोरोना महामारीनंतर धार्मिक पुस्तकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. आजही वाचकांची पसंती धार्मिक पुस्तकांना मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे दिसून येते.
तृणधान्यांचे वर्ष जाहीर झाल्याने बाजरी आणि नाचणीचे पदार्थ, पापड, कुरडया मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. स्थानिक काळा गुळ व नाचणीचे विविध आकारातले पापड वाचकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच वर्धा येथील खादी ग्रामोद्योग सुती पिशव्या, सद्य, पर्सेस व अन्य सुती वस्तू विक्रीला ठेवले आहेत. पैकी साड्या महिलावर्गाच्या पसंतीस उतरल्या आहेत.