नाशिक जिल्ह्यातील ‘रामसर’चा दर्जा मिळालेल्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांचे संरक्षण, संवर्धन व्हावे म्हणून व्रतस्थपणे कार्यरत उत्तम डेर्ले यांच्या भरारीची ही कहाणी...
डॉ. उत्तम विश्राम डेर्ले यांचा जन्म निफाड तालुक्यातील शिंगवे गावी झाला. नाशिकमधील मराठा हायस्कूल येथून ते दहावी उत्तीर्ण झाले आणि नंतर याच संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयातून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षण घेऊन रुग्णसेवा करायची, असे स्वप्न डेर्ले यांनी अगदी लहानपणापासूनच पाहिले होते. त्यानुसार नागपूर येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात ‘बीएएमएस’चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर दोन वर्षे मुंबईत ‘प्रॅक्टिस’ केली. आपल्या मूळ गावातील रुग्णांना रुग्णसेवा देता यावी, म्हणून निफाडमध्ये त्यांनी १९८७ मध्ये छोटा दवाखाना सुरू केला. भाडेतत्त्वावर घेतलेल्या छोट्या जागेत रुग्णसेवा दिल्यानंतर १९९२ साली त्यांनी ‘पार्वती हॉस्पिटल’ची स्थापना केली. तालुकास्तरावरीलरुग्णांना आणि जवळच्या खेड्यामधील रुग्णांना अत्याधुनिक सेवा देता यावी म्हणून त्यांनी निफाडमध्ये ऑपरेशन थिएटर, पॅथोलॉजी लॅब आणि १५ खाटा असलेले रुग्णालय सुरू केले. निफाडमधील त्यांचे हे पहिले खासगी रुग्णालय ठरले.
डॉ. डेर्ले यांची शेती नांदूरमधमेश्वर धरणाचे ’बॅकवॉटर’ असलेले करंजगाव येथीलच. त्यामुळे बालपणापासूनच तेथील पक्ष्यांचे चैतन्य पाहून त्यांना पक्ष्यांबद्दल विलक्षण आकर्षण, कुतूहल निर्माण झाले होते. नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य असल्यामुळे येथे पक्ष्यांविषयी विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्यावेळी सर्व पक्षी उपक्रम तसेच राज्यातील पक्षी संमेलनात ते सहभाग नोंदवत. रुग्णसेवा देताना जबाबदार्या कमी होत गेल्यानंतर कामाच्या व्यापातून थोडे मोकळे होत, छंद जोपासता यावा म्हणून त्यांनी पर्यावरण, पक्षी, वन्यजीव, निसर्ग यांच्यावर काम करण्यास प्रारंभ केला. जल, भूमी, वायुप्रदूषण कमी व्हावे आणि निसर्गाचे तत्त्व अबाधित राहावे, असे त्यांना वाटे. त्यासाठी डॉ. डेर्ले पर्यावरणरक्षण आणि पक्षिसंवर्धन विषयाकडे वळाले. नांदूरमधमेश्वर येथे हिवाळ्यात भरपूर स्थलांतरित पक्षी येतात. तिथे पक्षिगणनेत डॉ. डेर्ले सहभाग घेत. यातून त्यांनी पक्ष्यांच्या प्रजाती, नावे, वैशिष्ट्ये आत्मसात केली. पुस्तके, कॅमेरा, मोठी दुर्बीण यांच्या मदतीने ते नियमित पक्षी निरीक्षण करत. त्यामुळे आधीच असणारी निसर्गाची आवड अधिकच वाढत गेली.
पुढे महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे ते सभासद झाले आणि दरवर्षी विविध जिल्ह्यांत होणार्या पक्षी संमेलनाला ते आवर्जून जाऊ लागलेे. राज्यभरातील पक्षितज्ज्ञ, पक्षिनिरीक्षक यांच्या भेटी वाढत गेल्या आणि पक्ष्यांच्या अभ्यासासाठी कक्षा वाढत गेल्या. यातून तज्ज्ञ मार्गदर्शक, पक्षिअभ्यासकांकडून त्यांनी मार्गदर्शन घेऊन त्यांनी पक्ष्यांचे संवर्धन, संरक्षणाचे व्रत अंगीकारले.नांदूरमधमेश्वर येथे वन विभागाकडून पक्षिसंरक्षणासाठी मोठ्या उपाययोजना करण्यात येतात. त्यात पक्षी, पर्यटक आणि स्थानिक शेतकर्यांसह काय उपाययोजना, प्रबोधन करता येईल, यासाठी डॉ. डेर्ले सक्रिय सहभाग घेत असत. निसर्ग वाचला पाहिजे, पक्ष्यांचे चैतन्य अबाधित राहून त्यात वाढ व्हावी, हा उद्देश ठेवून डॉ. डेर्ले यांनी आजवर पक्षिनिरीक्षण, संवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी १०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. नांदूरमधमेश्वर येथे राज्य सरकारच्या वन्यजीव विभागाने सन २००० मध्ये ‘निसर्ग निर्वचन केंद्रा’ची स्थापना केली. त्यामध्ये पक्ष्यांचे मॉडेल, प्रतिकृती, त्यांची घरटी, वैशिष्ट्ये सांगणारे फलक यासह मोठी माहिती प्रदर्शित केली आहे. त्यामध्ये पक्ष्यांच्या सुरेख हालचाली टिपणारे सुंदर फोटो प्रदर्शनही आहे. त्यामध्ये डॉ. डेर्ले यांनी स्वत:च्या कॅमेर्याने टिपलेल्या काही फोटोंचा समावेश करण्यात आला आहे.
पर्यावरण, निसर्गासाठी चळवळ उभी राहावी म्हणून डॉ. डेर्ले यांनी २००२ मध्ये पक्षिमित्रांना घेऊन ’पक्षी निसर्ग मित्रमंडळा’ची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून नियमित पक्षिगणना, नांदूरमधमेश्वरसह परिसरातील गावातील स्थानिकांना अभयारण्यांचे संवर्धन, संरक्षण करण्यासाठी नियमित मार्गदर्शन केले जाते. पक्ष्यांची मानवाला उपयुक्तता, त्यांचे मानवी जीवनातील स्थान आणि महत्त्व यावर प्रबोधन केले जाते. पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांसाठी पर्यटकांसाठी करावायच्या गोष्टी यासंदर्भात वन्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी विचारविनमय करत सुधारणा करण्यात त्यांच्या संस्थेचा मोलाचा वाटा आहे. अभयारण्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वृक्षतोड, नागरिकांचे जमिनीवरील अतिक्रमण याविरोधात ‘पक्षी निसर्ग मित्रमंडळा’च्या माध्यमातून त्यांनी मोठी चळवळ उभी केली.
नांदूरमधमेश्वर येथील अभयारण्यास ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळवण्यासाठीच्या अटी-शर्तीच्या पूर्तता करण्याच्या कामी डॉ. डेर्ले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. निफाड तालुक्यात बिबट्यांचे प्रमाण अधिक असल्याने या वन्यजीवांसाठीही डॉ. डेर्ले यांनी आपल्या संस्थेमार्फेत व्यापक जागृती मोहीम राबविली. प्रसारमाध्यमे, वृत्तपत्र, नभोवाणी या माध्यमातून त्यांनी व्यापक जनजागृती केली.पतंग महोत्सवात नायलॉन मांज्याचा वापर, मानवी चुकांमुळे अनेक पक्षी जखमी होतात. डॉ. डेर्ले यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करुन अनेक पक्ष्यांवर उपचार करुन त्यांचे जीव वाचविले आहे. हे कार्य अविरतपणे सुरू असते. ’‘माणूस हा निसर्गाचा छोटा भाग असून निसर्ग वाचला तरच मानव वाचेल,” असे डॉ. डेर्ले सांगतात. निसर्गातील हवा, पाणी, पक्षी, जैवविविधता, परिस्थितिकी हे घटक वाचण्यासाठी स्थानिक पातळीपासून ते जागतिक स्तरावर विविध माध्यमातून प्रयत्न करण्याचा त्यांचा मानस आहे. अशा या निसर्गरक्षक डॉ. उत्तम डेर्ले यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून अनेक शुभेच्छा...!