नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरिया मध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आम्ही सीरियाच्या नागरिकांच्या दुःखात सहभागी आहोत आणि या कठीण परिस्थितीत सर्वतोपरी साहाय्य आणि पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे "या विनाशकारी भूकंपामुळे सीरियावरही परिणाम झाला आहे हे जाणून खूप वेदना झाल्या. बळींच्या कुटुंबीयांप्रती मी शोक संवेदना व्यक्त करतो. सीरियाच्या नागरिकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत आणि या कठीण काळात मदत आणि पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत."
तुर्कस्थान मध्ये आज झालेल्या भूकंपाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी सहाय करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्देशांनुसार तातडीने करायच्या मदत योजनांबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी साऊथ ब्लॉकमध्ये एक बैठक घेतली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, एन डी आर एफ ची शोध आणि बचाव पथके तसेच मदत सामग्री सह वैद्यकीय पथके तुर्कीला तातडीने रवाना केली जातील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
(तुर्कस्तानच्या दियारबाकीरमध्ये एका इमारतीच्या ढिगाऱ्यातून बचावकर्ते मुलीला बाहेर काढत आहेत.)
विशेष प्रशिक्षित श्वान पथके आणि आवश्यक उपकरणांसह 100 जवानांचा समावेश असलेलली एन डी आर एफ ची दोन पथके भूकंपग्रस्त भागात शोध आणि बचाव कार्यासाठी रवाना होण्यासाठी सज्ज आहेत. याशिवाय प्रशिक्षित डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय पथकेही अत्यावश्यक औषधांचा साठा घेऊन रवाना होण्यासाठी तयार आहेत. तुर्की प्रजासत्ताक सरकार, अंकारामधील भारतीय दूतावास आणि इस्तंबूलमधील वाणिज्य दूतावास यांच्या समन्वयाने हे मदत साहित्य पोहोचवले जाईल.
या बैठकीला कॅबिनेट सचिव, गृह मंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण – एन डी एम ए , एन डी आर एफ, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय , नागरी विमान वाहतूक आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.