‘हिंडेनबर्ग’चा हल्ला ‘अदानी’चे हेलकावे आणि गुंतवणूकदारांची होरपळ

    05-Feb-2023
Total Views | 1000
अंदाजे दहा दिवसांपूर्वी अमेरिकस्थित एका आर्थिक संशोधन संस्थेने भारतातील ‘अदानी’ समूहाबद्दल एक अहवाल जाहीर केला. या अहवालात ‘अदानी’ समूहाच्या एकंदर व्यवसायांबद्दल अनेक गंभीर आरोप केले होते. ‘हिंडेनबर्ग’नुसार हा संशोधन अहवाल सुमारे दोन वर्षांच्या अभ्यासातून तयार केला असून यात ‘अदानी’ समूह हा चक्क चोर असल्याचाच आरोप केलेला आहे.
Adani Group



अर्थात, आरोपांच्या सोबत ‘हिंडेनबर्ग’ संस्थेने हेसुद्धा सांगितले की, त्यांनी ‘अदानी’ समूह हा ‘शॉर्ट’ केला आहे, म्हणजेच ‘अदानी’ समूहाचे शेअर्स जेव्हा कोसळतील, तेव्हा या ‘हिंडेनबर्ग’ला आर्थिक फायदा होईल. हा अहवाल आल्यानंतर ‘अदानी’समूहातील सर्वच कंपन्यांचे शेअर्स हे सुमारे ६०-७० टक्क्याने खाली पडले. हा घटनाक्रम खूप मोठा आहे. तसेच, यात केलेले आरोप, ‘अदानी’ समूहाने दोन लाख कोटी रुपये उभे करणे, तसेच, पुढच्याच दिवशी ते गुंतवणूकदारांना परत देऊन टाकणे वगैरे सर्वच घटना या नाट्यमय आहेत. गुंतवणूकदारांनी अशा घटनांमधून बोध घेणे खूप महत्त्वाचे आहे. याच सगळ्या घडामोडींवर भाष्य करणारा हा लेख...

दि. २४ जानेवारी रोजी ‘हिंडेनबर्ग’ संस्थेने ‘अदानी’ समूहाविरोधात एक सनसनाटी अहवाल सादर केला. 'The World's ३rd Richest Man is pulling The Largest con in corporate History', असेच या अहवालाचे नाव होते. थोडक्यात काय तर ‘अदानी’ समूह हा लोकांची फसवणूक करत असल्याचा मोठा आरोप या अहवालात करण्यात आला होता. अहवालाच्या शेवटी ‘अदानी’ समूहाला ८८ प्रश्न या ‘हिंडेनबर्ग’ संस्थेने विचारले आणि जर समूह पारदर्शक असेल, तर या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले. हा अहवाल सादर करण्यामागे ‘हिंडेनबर्ग’ संस्थेचा नफा कमावणे हा हेतू होताच. परंतु, भारतातील ‘प्रेस फ्रीडम’वर भाष्य करताना भारतातील काही ठरावीक लोकांची ‘री’ त्यांनी ओढल्याचेही दिसून येते.

हा अहवाल जेव्हा प्रसिद्ध झाला, तेव्हा गौतम अदानी हे जागतिक श्रीमंत लोकांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर होते. गेल्या तीन वर्षांत ‘अदानी’ यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. अहवालाच्या वेळी ‘अदानी’ यांची संपत्ती ही सुमारे १२० अब्ज डॉलर्स एवढी होती व त्यातील सुमारे १०० अब्ज डॉलर्स ही कोरोनानंतरच्या काळात कमावलेली आहे. अहवालाच्या वेळी ‘अदानी’ समूहातील सर्वच कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना १०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला होता. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की, शेअर मार्केट हे वर्षाला सरासरी १२ टक्के इतकेच वाढते. यातील ‘अदानी टोटल गॅस’ या कंपनीने २ हजार, १२१ टक्के, ‘अदानी एंटरप्राईज’ या कंपनीने १ हजार, ३९८ टक्के एवढा नफा गुंतवणूकदारांना गेल्या तीन वर्षांत कमवून दिला होता. ‘हिंडेनबर्ग’ संस्थेने त्यांच्या अहवालात नेमके हेच म्हंटले होते. त्यांच्या मते, जरी वाचकांनी त्यांच्या अहवालाकडे दुर्लक्ष केले, तरीसुद्धा ‘अदानी’ समूहाच्या सर्वच कंपनी या जवळपास ७०-८० टक्क्यांने 'overalued' होत्या.

अलीकडे रजत शर्मा यांच्या कार्यक्रमात गौतम अदानी यांना हाच प्रश्न विचारला होता की, “ ‘अदानी’ समूहाचा हा फुगा फुटणार की वाढतच जाणार?”, तेव्हा गौतम अदानी यांनी सांगितले होती की, “जोपर्यंत भारत वाढतो आहे, तोपर्यंत हा फुगा उंच उडत राहील म्हणून.” गौतम अदानी यांच्या बोलण्यात तथ्य होतेच. कारण, ‘अदानी’ समूहाच्या वाढीत सामान्य भारतीयांचाच हात होता. ‘अदानी’ समूहाची ही घोडदौड अत्यंत वेगळ्या प्रकारे झाली आहे. ‘रिलायन्स’सारख्या मोठ्या कंपनी या कर्जमुक्तीकडे वाटचाल करत असताना ‘अदानी’ समूहाने तब्बल दोन लाख कोटी रुपयांचे कर्ज उचलून ते भारतात गुंतवले आहे.


कर्ज घेऊन कंपनीचा धंदा वाढवणे, धंदा वाढला की कंपनीच्या शेअरची किंमत वाढते. मग वाढलेल्या किमतीचे शेअर्स बँकांकडे नेऊन पुन्हा कर्ज घेणे अशा पद्धतीने ‘अदानी’ समूहाचा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही एका कंपनीने एखादे कर्ज देण्यास जरी असमर्थता दर्शवली, तरीसुद्धा त्याचा परिणाम हा इतर कंपनीवर होऊ शकतो. या व्यतिरिक्त या अहवालात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला गेला तो म्हणजे ‘अदानी’ समूहात ज्या परदेशी गुंतवणूक कंपनीने गुंतवणूक केली आहे, त्यातील काही कंपन्या या मॉरिशसमधील आहेत आणि त्यातील अझचड APMS Investment Fund, Opal Investment सारख्या काही कंपन्यांच्या एकूण गुंतवणुकीतील ९५ टक्के जास्त गुंतवणूक ही ‘अदानी’ समूहात आहे. त्यामुळे ‘अदानी’ समूहातील व्यक्तीच या गुंतवणूक कंपनी चालवतात, असा आरोप यात करण्यात आला आहे. हा खूप महत्त्वाचा आरोप आहे आणि सिद्ध झाल्यास सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक ’अदानी’ समूहाने केल्याचे सिद्ध होईल.


बाकीचा अहवाल हा ‘अदानी’ समूहातील लोकांनी पूर्वी कोणते गुन्हे केले होते आणि त्यांच्यावर कोणत्या केसेस झाल्या आहेत वगैरे गोष्टींनी भरलेला आहे. ‘अदानी’ समूहाने या अहवालाला उत्तरे देताना दि. २९ जानेवारी रोजी सुमारे ४०० पेक्षा अधिक पानांचे उत्तर लिहिले. ज्यामध्ये ‘हिंडेनबर्ग’ संस्थेवर आरोप केले. ‘हिंडेनबर्ग’ संस्था ही खोटे बोलत असून लवकरच कायदेशीर कारवाई करणार आहोत, असेसुद्धा यात म्हणले. ‘अदानी’ समूह हा २० हजार कोटी रुपये उभे करणार होता. त्यामुळे त्याला खोडा घालण्यासाठी म्हणून ‘हिंडेनबर्ग’ने हा अहवाल सादर केल्याचे ‘अदानी’ समूहाने म्हंटले आहे. ‘अदानी’ समूहाने जरी उत्तर दिले असले तरी त्याचा विशेष परिणाम ‘अदानी’ समूहाच्या शेअर्सच्या किमतीवर झाला नाही व त्यांची किंमत आणखीन कोसळली. ‘अदानी’ समूहाने उत्तर देताना असे सांगितले की, “ ‘अदानी’ समूहावर केलेला हल्ला हा भारत देशवारील हल्ला आहे.”


दि. २९ जानेवारी रोजी ‘हिंडेनबर्ग’ने ‘अदानी’समूहाच्या उत्तरांवर आणखीन एक ‘ब्लॉग’ प्रसिद्ध केला. ज्यामध्ये असे सांगितले की, ‘अदानी’ समूहाने विचारलेल्या ८८ पैकी केवळ २६ प्रश्नांची उत्तरे दिली आहेत व बाकीचे ६२ प्रश्न हे टाळले आहेत. २९ तारखेलाच ‘अदानी’ समूहाचा तब्बल २० हजार कोटी रुपयांचा ‘एफपीओ’ सुरू झाला होता. ‘हिंडेनबर्ग’च्या अहवालामुळे अनेकांना असे वाटत होते की, ‘अदानी’ समूह हा ‘एफपीओ’ मागे घेतील. कारण, पहिल्या दोन दिवसांत या ‘एफपीओ’ला अतिशय थंड प्रतिसाद मिळाला. परंतु, शेवटच्या दिवशी म्हणजे दि. ३१ जानेवारी रोजी आश्चर्यकारक पद्धतीने हा ‘एफपीओ’ संपूर्ण भरला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यात अंबानी, जिंदालसारख्या उद्योजकांनी आपले पैसे लावले होते.


दि. १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प संसदेत सादर झाला. हा अर्थसंकल्प अतिशय उत्तम असल्याने याला शेअर बाजाराने उत्तम प्रतिसाद दिला. मात्र, दुपारी स्वित्झर्लंडस्थित ‘क्रेडिट स्विस’ या बँकने ‘अदानी’ समूहाबद्दल सांगताना लिहिले की, “त्यांनी ‘अदानी’ समूहाचे बॉन्ड स्वीकारणे बंद केले आहे.” या बातमीचा अत्यंत विपरित परिणाम ‘अदानी’ समूहाच्या शेअर्स किमतीवर झाला. गंमत म्हणजे, दोन दिवस आधी ‘क्रेडिट स्विस’नेच ‘अदानी’ समूहाच्या ‘अदानी पोर्ट’ या किमतीचे शेअर्स विकत घ्या, असे रेटिंग दिले होते. ‘क्रेडिट स्विस’ समूहाचा दुटप्पीपणा यातून दिसून आला.

१ फेब्रुवारीला गौतम अदानी यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितले की, जे २० हजार कोटी रुपये त्यांनी उभे केले आहेत, ते परत करण्यात येत आहेत. हे परत करण्याचे कारण म्हणजे शेअर्सची घसरलेली किंमत. हे करून अदानी यांनी ’वरारसश उेपीीेंश्र’ करण्याचा एक प्रयत्न करून पाहिला. मात्र, त्याचा विशेष फायदा झालेला दिसून आला नाही. आज ‘अदानी’ समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स हे सुमारे ६०-७० टक्क्याने खाली पडलेले आहेत व यात अनेक सामान्य गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. मात्र, इतिहासात हे असे अनेक वेळा घडलेले आहे.

या सगळ्यात भारतातील अनेकांनी बोंबा मारायला सुरुवात केली की, ‘एलआयसी’ व ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’सारख्या सरकारी संस्थांचे यात बरेच नुकसान झाले. शेवटी या दोन्ही संस्थांना आपले म्हणणे माध्यमांसमोर मांडावे लागले. ‘एलआयसी’नुसारत्यांनी ‘अदानी’ समूहात केलेली गुंतवणूक ही अजून सुरक्षित असून नफ्यातसुद्धा आहे. त्याचबरोबर ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने सुद्धा त्यांच्या ‘अदानी’ समूहाला दिलेल्या कर्जाबद्दल सांगितले की, कर्ज हे सुरक्षित असून त्यांच्या एकूण कर्जाच्या एक टक्क्यांपेक्षा ही कमी रक्कम आहे त्यामुळे काळजीचे कारण नाही.

खरे सांगायचे तर ‘अदानी’ समूहाचा फुगा कधी ना कधी फुटणार होताच आणि ‘हिंडेनबर्ग’ने दिलेली कारणे ही दुर्लक्षित करण्याजोगीही नक्कीच नाहीत. एक मात्र आहे की, या सगळ्याने सर्वात जास्त फायदा कुणाचा झाला असेल, तर तो प्रत्यक्ष ‘हिंडेनबर्गचा’च. सर्वात जास्त नुकसान झाले ते मात्र सामान्य गुंतवणूकदारांचे, ज्यांनी चढ्या भावावर ‘अदानी’मध्ये गुंतवणूक केली होती. हे नुकसान भरून निघायला काही वर्षं लागतील किंवा कदाचित काही दिवसांतसुद्धा भरून निघेल..! ‘अदानी’ कंपन्यांचे भविष्य सांगणे आता अवघड झाले आहे. येणारा काळ काय ते ठरवेल. गुंतवणूकदारांनी या सर्व घटनेमधून कोणता बोध घ्यावा? कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करताना प्रथम त्या कंपनीचे ‘फंडामेंटल्स’ किती भक्कम आहेत, याची माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे.

गुंतवणूक करताना कंपनीचे ‘वॅल्यूएशन’ बघणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. गुंतवणूकदारांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, दीर्घकाळासाठी शेअर मार्केटमधून १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळणे अवघड आहे. तेव्हा, एखाद्या कंपनीने तीन वर्षांत एक हजार टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला असेल, तर समाधानी होऊन शेअर्स विकून टाकलेले चांगले. कोणतीही मोठी गुंतवणूक करताना अनुभवी गुंतवणूकदाराचा किंवा प्रोफेशनल्सचा सल्ला जरूर घेतला पाहिजे. कोणत्याही कंपनीत केलेली गुंतवणूक की, आपल्या शेअरमार्केट मधल्या एकूण गुंतवणुकीच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. आपली एकूण गुंतवणूक की, शेअर मार्केट, बँक डिपॉजिट वगैरे सारख्या ठिकाणी विभागून ठेवावी. बाहेरील बातमीवर अंध:विश्वास कधीही ठेवू नये. तसेच, कोणतीही कंपनी देशकार्यासाठी काम करत नाही, हे लक्षात घेऊन गुंतवणूक केली पाहिजे. ‘भाव भगवान छे’ ही म्हण लक्षात घेऊन योग्य त्या भावाला गुंतवणूक करावी.
- सीए शंतनु परांजपे



(लेखक अर्थ व करसल्लागार आहेत.)






अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121