नवी दिल्ली : जगातील विविध देशांसोबतच्या व्यापार करारांबाबत भारताचा नवा दृष्टीकोन गुणवत्तेस महत्व देतो. त्यामुळे भारत – युरोपीय महासंघादरम्यानचा मुक्त व्यापार करार ऐतिहासिक ठरेल, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी केले. इंडिया युरोप बिझनेस अँड सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्हच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना ते बोलत होते.
नजीकच्या भविष्यात भारत ही एकमेव मोठी अर्थव्यवस्था बनेल, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारत द्विपक्षीय भागीदारीवर चर्चा करण्यास सज्ज आहे. शाश्वतता वाढवण्यात व्यवसायांची प्राथमिक भूमिका असते. भारत आणि युरोपीय महासंघामध्ये बहु-ध्रुवीय जग, भू-राजकीय आणि सुरक्षाविषयक मुद्द्यांविषयी एकमत आहे. युरोपीय हा भारताचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. त्यामुळे विविध मुद्द्यांवर युरोपीय महासंघासोबत भागिदारी करण्यास भारत सज्ज असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले.
भारत – युरोपीय महासंघादरम्यानचा मुक्त व्यापार करार ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, भारतात आज १०० हून अधिक स्टार्टअप युनिकॉर्न आहेत. त्यातील बहुतांशी युनिकॉर्न तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. भारत जगाच्या वाढीच्या इंजिनांपैकी एक आहे. भारत – युरोपीय महासंघादरम्याचे सहकार्य हरित परिवर्तन अणि स्वच्छ उर्जेसाठीही महत्वाच आहे. या विषयांवर भारतास सहकार्याची अपेक्षा आहे, असेही परराष्ट्र मंत्र्यांनी नमूद केले आहे.
चिनी परराष्ट्र मंत्री भारतात येणार
येत्या २ मार्च रोजी नवी दिल्ली येथे जी २० परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. त्यासाठी चिनी परराष्ट्र मंत्री किन गांग हे भारतात येणार आहेत. यापूर्वी २०१९ साली चिनचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री वांग यी यांचा भारत दौरा झाला होता, त्यानंतर तब्बल चार वर्षांनी चिनी परराष्ट्र मंत्री भारतात येत आहेत. भारत – चीन सीमातणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा विशेष ठरणार आहेत.