-
१९६ गावांकरीता पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे ३८१ कोटी रूपयांचा निधी
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते २०६ योजनांचे भूमिपूजन
-
प्रत्येक कुटुंबाला पुरविले जाणार प्रती व्यक्ती दररोज ५५ लीटर पाणी
-
ग्रामीण भागातील हजारो माता-भगिनींच्या डोक्यावरील हंडा दूर होण्यास होणार मदत
भिवंडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पुरविण्यासाठी सुरू केलेल्या ‘हर घर नल से जल’ योजनेतून जल जीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्यात जलक्रांती’ होत आहे. भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील १९६ गाव-पाड्यांमध्ये ‘जल जीवन मिशन’ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ३८१ कोटी रुपये खर्चून नळाने पाणीपुरवठा करण्याच्या योजनांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’द्वारे केंद्र व राज्य सरकारच्या प्रत्येकी ५० टक्के निधीतून ग्रामीण भागातील गावांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी योजना तयार करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला प्रतिव्यक्ती दररोज ५५ लीटर पाणी पुरविले जाणार आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडीतील १९६ गाव-पाड्यांमध्ये ’जल जीवन मिशन’ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत दहा नव्या नळ पाणीपुरवठा योजना व सध्याच्या योजनांचे सक्षमीकरण करण्यासाठी पाठपुरावा केला होता.
’जल जीवन मिशन’च्या माध्यमातून २२६ कोटी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे १५५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यावेळी कपिल पाटील म्हणाले, “भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर, मुरबाड, कल्याण आणि वाडा तालुक्यात नळपाणीपुरवठा योजनांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. गावांचा विकास शहरासारखा झाला पाहिजे, हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. प्रत्येक गावातील नळपाणीपुरवठा योजनांचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी सर्व ग्रामस्थांनी सतर्क राहावे.”
यावेळी आ. शांताराम मोरे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील, जिल्हा परिषदेचे सीईओ मनुज जिंदल, भाजप तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, माजी सभापती सपना भोईर, शांताराम भोईर, कैलास जाधव, किशोर पाटील, रवी जाधव, डी. के. म्हात्रे, जयवंत पाटील, भरत पाटील, हरिश्चंद्र पाटील, भानुदास पाटील, उज्ज्वला भोईर, ललिता पाटील, जि. प. कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे आदींची उपस्थिती होती.
भिवंडी ग्रामीण भागासाठी ऐतिहासिक दिवस
पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाल्यानंतर केवणीदिवे, कोपर, वडुनवघर, जुनांदुर्खी, कांबे, खोणी, टेंभिवली, अंबाडी, कवाड येथे झालेल्या कार्यक्रमात भूमिपूजन करण्यात आले. एकाच दिवशी तब्बल २०६ योजनांचे भूमिपूजन झाल्याने, भिवंडी ग्रामीण भागातील ग्रामस्थांसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला.
दरम्यान, “या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो माता-भगिनींच्या डोक्यावरील हंडा दूर होणार असून, त्यांना घरातच नळाने पाणी उपलब्ध होईल. केंद्रीय पंचायत राज विभागाने गावांच्या पातळीवर निश्चित केलेल्या नऊ शाश्वत विकासाच्या योजनांवर कार्य करावे,” असे आवाहनही यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ग्रामस्थांना केले.