फडणवीस - शिंदे सरकारकडून बेरोजगारांसाठी रोजगारासह स्वयंरोजगाराची संधी
-मंगलप्रभात लोढा यांची उपस्थिती
23-Feb-2023
Total Views | 72
ठाणे : राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या फडणवीस-शिंदे सरकारने बेरोजगारांसाठी रोजगारासह स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडित दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ४ वा. या कालावधीत कल्याणमधील बापसई येथील इंडाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन येथे आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने दिली.
या मेळाव्यास राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात ठाणे येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच या मेळाव्यामध्ये उद्योजकता मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
महारोजगार मेळाव्यात नोकरीच्या संधी
या महारोजगार मेळाव्यामध्ये महिंद्रा इंटेग्रेटेड बिझनेस सोल्यूशन, मॅजिक बस, अड्रोमेडा सेल्स अँड डिस्ट्रिब्युटर्स, एसएम रिक्रूटमेंट, बीटीडब्ल्यू व्हिसा सर्व्हिसेस, स्मार्टस्टार्ट जॉब सोल्यूशन, कंपास ग्रुप, ट्रिनिटी एमपॉवरमेंट, कनेक्टवेल इंडस्ट्रिज, डीएमसीएफएस, कनेक्ट बिझनेस सोल्यूशन प्रा.लि., एनआयआयटी लि., स्टार प्लेसमेंट सर्व्हिसेस, कॉपरगेट कन्सलटंट लि., लाईव्हलाँग इन्शुरन्स ब्रोकर, इंडिया फिलींग प्रा.लि, श्रीराम जनरल इन्शुरन्स प्रा.लि., स्पॉटलाईट कन्स्लटंटस्, रायटर सेफगार्ड प्रा. लि., अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेज या विविध नामांकित कंपन्या मुलाखत घेण्यासाठी उपस्थित राहणार असून एकूण ३,६०० विविध पदांसाठी भरती होणार आहे.
स्वयंरोजगारासाठी अर्थसाह्य करणाऱ्या महामंडळांचाही सहभाग
या मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता स्वयंरोजगारासाठी आर्थिक साह्य उपलब्ध करणारी विविध शासकिय महामंडळे सहभागी होणार आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इ. महामंडळांची माहिती देणारे स्टॉल मेळाव्यात लावण्यात येणार आहेत.त्याचबरोबर विविध शासकिय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश आहे.