नवी मुंबई : ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा पारित झालाच पाहिजे, यासाठी नवी मुंबईतील महिला आक्रमक झाल्या असून तुर्भे पाठोपाठ कोपरखैरणेत आयोजित करण्यात आलेल्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘श्री श्री शंकर देव सेवा समिती’ आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून कोपरखैरणे सेक्टर ४ येथे ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभेचे बुधवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी ‘लव्ह जिहाद मुक्त नवी मुंबई’ या विषयी प्रास्ताविक गायत्री गोर्र्हाई यांनी केले. नवी मुंबईमध्ये घडलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना आणि त्यांचे परिणाम त्यांनी मांडले.
दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी आपल्या खणखणीत भाषणात ‘लव्ह जिहाद’ आणि त्याचे स्वरूप परिणाम याबाबत उपस्थित महिलांशी संवाद साधला. महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणारा कायदा कसा आवश्यक आहे हे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित महिलांनी मत मांडले की, महाराष्टात तत्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा पारित व्हावा. यावेळी नगरसेवक शंकर मोरे, नगरसेविका सायली शिंदे, संगीता म्हात्रे, चंद्रभागा मोरे यांनी उपस्थित महिलांना सकल हिंदू समाज आयोजित नवी मुंबई जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.