नवी दिल्ली : तुर्कस्तान आणि सीरिया हे दोन देश विनाशकारी भूकंपातून सावरत असतानाच भारतातही उत्तराखंडमध्ये मोठा भूकंप होऊ शकतो, असा इशारा राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन (एनजीआरआय) या संस्थेने दिला आहे.
तुर्की आणि सीरियात झालेल्या भूकंपात हजारो लोकांचा प्राण गेला असून, लाखो जण जखमी झाले आहेत. अद्याप बचावकार्याची प्रक्रिया सुरुच आहे. अशातच उत्तराखंडमध्ये कधीही भूकंप होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने स्थानिक लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘एनजीआरआय’ संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव यांनी याबाबत माहिती दिली आहे. एन. पूर्णचंद्र राव यांनी सांगितले की, “पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली विविध स्तर असतात, ज्यांची सतत हालचाल होत असते. भारतातील पृष्ठभागाखालील स्तर दरवर्षी पाच सेमीने सरकत आहे. याने दबाव निर्माण होत आहे.”
हिमाचल, उत्तराखंडसह नेपाळच्या पश्चिम भागात कधीही भूकंप होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर आम्ही उत्तराखंडमध्ये १८ भूकंप केंद्रे स्थापन केली आहे,-एन. पूर्णचंद्र राव, मुख्य शास्त्रज्ञ, एनजीआरआय संस्था