महत्त्वपूर्ण रामनाम

    22-Feb-2023   
Total Views | 181
Ramnaam

शास्त्रांत सांगितलेल्या सर्व पारमार्थिक साधनात नामस्मरण महत्त्वाचे आहे, असे समर्थ म्हणतात. तसेच भगवंताचे नाम हे सर्व साधनांचे सार असून त्यांची तुलना दुसर्‍या कशाबरोबर करता येत नाही, हेही समर्थांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. समर्थांचे आराध्यदैवत राम आहे आणि त्याच्याविषयी रामदासांच्या मनात अतीव आदराची भावना आहे, हे सर्वजण जाणतात. भगवंताची अनेक नावे आहेत. असे असले तरी स्वामींनी रामनामाचे महत्त्व वारंवार सांगितले आहे. यासंदर्भात आणखी काही विचार स्वामी पुढील श्लोकात सांगतात-


बहुनाम या रामनामी तुलेना।
अभाग्या नरा पामरा हें कळेंना॥
विषा औषधे घेतलें पार्वतीशें।
जिवा मानवा किंकरा कोण पुसे॥


देवदेवतांची, भगवंताची अनेक नावे लोकांना माहीत आहेत. काही देवांच्या नावाच्या सहस्रनामावळी आपण ऐकतो. या सर्व नामांत रामनाम कसे महत्त्वाचे आहे, हे आता स्वामी समजावून सांगत आहेत. भगवंताची सहस्रनामे ऐकल्यावर नामस्मरणांच्या संदर्भात आपले मन चक्रावून जाते आणि मनात विचार येतो की, नामसाधनेसाठी यापैकी कोणते नाम योग्य आहे. त्यापैकी अनेक नावे चांगली वाटल्याने नेमक्या कोणत्या नावाचा जप करावा, याचा निश्चय न झाल्याने मनात संभ्रम निर्माण होतो. वस्तुत: भगवंताच्या सर्व नावातून एकच अंतिम सत्याची, ब्रह्माची, भगवंताची ओळख अपेक्षित आहे. परंतु, जो तो आपल्याला आवडलेल्या अथवा परंपरागत चालत आलेल्या नामाचा प्रचार करीत असतो. त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ भाव निर्माण करुन माणूस माझेच मत योग्य, असा आग्रह धरु लागतो. त्यातून अहंकार, गर्व, ताठा निर्माण होतो.

सामान्य माणूस या मतमतांतराने भांबवून जातो. या संदर्भात श्री गोंदवलेकर महाराजांनी एक छान दृष्टान्त दिला आहे. ते म्हणतात, एका विशिष्ट व्यक्तीला त्याच्या नात्यातील मंडळी वेगवेगळ्या नावांनी ओळखतात, पण तरी ती व्यक्ती एकच असते. तो माणूस कुणाचा पुत्र असतो, कुणाचा तो पिता असतो, कुणाचा भाऊ, कुणाचा काका, मामा, भाचा, पुतण्या असतो. नात्यात तो वेगवेगळ्या नावांनी ओळखला गेला, तरी तो एकच असतो. नावांमुळे त्यांच्यात भिन्नत्व येत नाही. तोच प्रकार भगवंताच्या वेगवेगळ्या नावांचा आहे. समर्थ समन्वयवादी संत होते. त्यांनी राम-पांडुरंग यांच्यात भेद केला नाही. तथापि, सामान्य लोकांना या बहुनामाच्या गोंधळातून बाहेर काढावे आणि याबाबत एक शिस्त लावून द्यावी, यासाठी स्वामींनी सांगून टाकले की, तुम्ही रामनाम घ्या. रामनामाची तुलना दुसर्‍या कशाशी होऊ शकत नाही. स्वामी पुढे म्हणतात, परमार्थभाग्य ज्यांना लाभले नाही, अशा अभागी क्षुद्र माणसांना हे समजत नाही. ते उगीच वाद वाढवत बसतात.

आधुनिक तंत्रविज्ञानात शब्दांची, उच्चारांची कंपने मोजली जातात. त्यातून मंत्राक्षरांची स्पंदने मोजता येतात. त्या कंपनांनी भोवतालचे वातावरण अनुकूल होऊ शकते. यासंबंधी वैज्ञानिकांचे प्रयोग चालू आहेत. ‘राम’ या शब्दाने उत्पन्न होणार्‍या कंपनांची, स्पंदनाची प्रचिती समर्थांनी अनुभवली असेल, ती वैशिष्ट्यपूर्ण आढळल्याने रामनामाची तुलना दुसर्‍या कशाशी करता येत नाही, असे समर्थ म्हणाले असतील. याबाबतीत आणखी एक विचार पुढे येतो की, त्यामुळे ‘राम’ या अक्षराचे अनन्यसाधारण महत्त्व सांगता येते. या संदर्भात प्रा. के. वि. बेलसरे म्हणतात, “ज्ञानी पुरूषांच्या मते, ईश्वराचा आदिसंकल्प सृष्टीच्या प्रारंभी दिव्य नादरूपाने प्रगट झाला. त्या अनाहत नादास ‘ओंकार’ असे म्हणतात. हा ओंकाररूपी नाद सर्व पिंडांच्या अंतर्यामी वास करतो. राम हे त्याचे आहत, व्यक्त शब्दरूप आहे.” सर्व वेदमंत्रांच्या, पारमार्थिक ग्रंथांच्या सिद्धमंत्रांच्या प्रारंभी ‘ओम्’ हे अक्षर असते. प्राणिमात्रांच्या श्वसनातून अखंड ‘सोऽहम्’ या अनाहत नादाचा जप चाललेला असतो.

ज्ञानी अभ्यासकांच्या मते, ’ओम’चे रूप ’राम’ या नावातून प्रगट होते. त्यामुळे ते आदिस्थान, उगमस्थान मानले पाहिजे. या कारणाने ‘राम’ हे नाम महत्त्वपूर्ण ठरते. रामनामाची दुसर्‍या कशाशी तुलना होऊ शकत नाही, असे समर्थ त्यामुळे म्हणाले असावेत. समर्थ पुढे असेही म्हणाले की, “या रामनामाचे माहात्म्य ज्याला कळत नाही, तो अभागी पामर (क्षुद्र) आहे.” विचारवंत अभ्यासू ज्ञानी पुरुषांनी ‘राम’नामाचे उगमस्थान सांगितले, तरी आपल्यासारख्या सामान्य माणसाला बुद्धीला जास्त ताण द्यावासा वाटत नाही. सामान्य माणसाची प्रवृत्ती लोक काय करतात, हे पाहण्याची असते आणि त्यांचा कल मोठ्याने अथवा लोकांचे अनुकरण करण्याकडे असतो. भगवद्गीता म्हणते, ‘...लोकस्तदनुवर्तते।’ (श्लोक ३.२१) म्हणजे लोक श्रेष्ठांचे आचरण पाहून त्याचे अनुकरण करतात. लोकांच्या स्वभावाची स्वामींनाही कल्पना आहे. त्यामुळे रामनाम लोकांना महत्त्वाचे वाटण्यासाठी श्रेष्ठांचे उदाहरण दिले पाहिजे, असे स्वामींना वाटते. यासंबंधी ज्याला सर्वजण अध्यात्मसाधनेत श्रेष्ठ मानतात. त्या भगवान शंकराचे, महादेवाचे उदाहरण स्वामी लोकांसमोर ठेवतात.

महादेवाला सर्वत्र समाजात अत्यंत आदराचे स्थान आहे. त्यांचा आदर्श लोकांसमोर ठेवावा, असे स्वामींना वाटते. त्यामुळे लोक त्यांचे अनुकरण करु लागतील, असा स्वामींचा कयास आहे. भगवान शंकरांचे ‘नीलकंठ’ हे नाव प्रचलित आहे. त्या नावाची कथा सर्वपरिचित आहे. समुद्रमंथनाच्या वेळी विविध गोष्टी मंथनातून बाहेर आल्या. त्यात ’हलाहल’ नावाचे महाभयंकर विषही बाहेर आले. हे विष आता सर्व सृष्टी नष्ट करुन टाकेल, या भीतीने विश्वाच्या कल्याणार्थ भगवान शंकरांनी ते स्वतःच प्राशन करुन या जगाला वाचवले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि विषाचा परिणाम होऊन असह्य दाह निर्माण झाला. त्या त्रासापासून सुटण्यासाठी भगवान सदाशिवांंनी डोक्यावर गंगेचा प्रवाह घेतला, मस्तकी चंद्र धारण केला आणि गळ्यावर सर्पाचे आच्छादन ठेवले. पण, त्याचा उपयोग झाला नाही. अखेरीस त्यांनी रामनामाचा जप केला आणि त्यामुळे विषाच्या दाहाचे उपशमन आले. अशी पौराणिक कथा आहे. ‘हलाहल’ विषाच्या दाहापुढे तर सामान्य माणसांच्या अडचणी क्षुल्लक आहेत. रामनाम असताना कोण त्या अडचणींना विचारतो!

रामनाम हे औषधी म्हणून साक्षात् शंकरांनी घेतले असल्याने सामान्य माणसांच्या अडचणींना त्याच्यापुढे काय किंमत आहे! स्वामींच्या शब्दांत सांगायचे म्हणजे, ‘जिवा मानवा किंकरा कोण पुसे.’मनाच्या श्लोकांत रामनामाचे महत्त्व श्रोत्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी समर्थ, भगवान शंकरांचे उदाहरण वरचेवर सांगताना दिसतात. यापुढील चार श्लोकांतूनही त्यांनी शंकर महादेवांच्या उल्लेख जाणीवपूर्वक केला आहे. कारण, शंकराचे माहात्म्य हिंदुस्थानात व्यापकपणे दिसून येते. महाराष्ट्रात तर शिवपूजन फार पुरातन काळापासून आहे. प्रसिद्ध अशा १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाच महाराष्ट्रभूमीत आहेत. ती अशी : त्र्यंबकेश्वर (नाशिक), भीमाशंकर (जि. पुणे), घृष्णेश्वर (मराठवाडा), परळी वैजनाथ (जि. बीड) आणि औंढ्या नागनाथ (जि. हिंगोली). महाराष्ट्र शिवभक्तांसाठी व विष्णुभक्तांसाठीही प्रसिद्ध आहे. येथे शिव-वैष्णव हा वाद कधीही नव्हता. हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. शंकर-पार्वती रामनामाचा जप करतात, म्हणून रामनामासाठी समर्थ वारंवार महादेवाचे उदाहरण लोकांसमोर ठेवतात. मनाचे श्लोक वाचताना हे प्रकर्षाने जाणवते.





सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..
अग्रलेख
जरुर वाचा
बिहारमधील गोपाळगंजमधील घटना, ईदच्या रात्री युवतीचा मृत्यू?

बिहारमधील गोपाळगंजमधील घटना, ईदच्या रात्री युवतीचा मृत्यू?

बिहारमधील गोपालगंजमधील एका युवतीचे धड झाडाला टांगण्यात आले होते. यावेळी युवतीच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, गावातील युवकांनी मिळूनच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करण्यात आली. पीडितेने आत्महत्या केली असावी असा समज निर्माण व्हावा यासाठी तिला एका झाडाला टांगण्यात आले होते. संबंधित प्रकरण हे मांझागड ठाणे क्षेत्रातील आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत युवतीची हत्या करणाऱ्या प्रियकराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेप्रसंगी अनेक तपास करण्यात आले आहेत. या तपासातून संबंधि..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121