मेरी आवाज ही पहचान हैं...

    22-Feb-2023   
Total Views |
Manish Soparkar

अभिनय, दिग्दर्शन, लेखन आणि आवाजाच्या क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून ‘मेरी आवाज ही पहचान हैं’ या वाक्याला सार्थ ठरविणार्‍या मनिष सोपारकर यांच्या कलाप्रवासाविषयी...

मनिष विनोद सोपारकर यांचा जन्म नालासोपार्‍याचा. त्यांचे वडील विनोद सोपारकर तेव्हा रेल्वे वर्कशॉपमध्ये कामाला होते. मनिष सोपारकरांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ’सोपारा इंग्लिश स्कूल’मध्ये झाले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण उत्कर्ष महाविद्यालय, विरार येथे झाले. त्यानंतर अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. शालेय जीवनापासून कला क्षेत्रातच काम करायचे, असे त्यांनी मनाशी पक्के केले. म्हणूनच मग त्यादृष्टीने अनौपचारिक शिक्षण घेण्यास सुरूवात केली. लहानपणापासून मनिष यांना मराठी आणि इतिहास या विषयांची आवड. त्यामुळे या दोन्ही विषयांशी संबंधित पुस्तके वाचण्याची गोडी आपसुकच निर्माण झाली. मग ‘नटसम्राट’सारख्या नाटकामधील उतारे सादर करणे, वेगवेगळ्या नाटकांचे पाठांतर करणे, अशा गोष्टी मनिष करू लागले आणि हीच त्यांच्यासाठी कला क्षेत्रातील प्रवेशाची पहिली पायरी ठरली.

सोपारकर हे लहानपणापासून वक्तृत्व, कथाकथन, निबंध लेखन यांसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होत. एकदा इयत्ता पाचवीत असताना त्यांनी वसई कला-क्रीडा स्पर्धेत वेशभूषा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. तेव्हा त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले होते. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला आणि ते अशा अनेक स्पर्धांत सहभागी होऊ लागले. त्यानंतर त्यांनी अकरावीला असताना विवा महाविद्यालयाकडून ’व्यथा’ नावाच्या एकांकिकेत भूमिका निभावली. त्यानंतर त्यांना महाविद्यालयीन तसेच राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत तसेच एकपात्री, द्विपात्री अभिनय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशी अनेक पारितोषिके पटकावली. खुल्या राष्ट्रीय युवा स्पर्धेत नाट्यस्पर्धेसाठी तीन वेळा महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठ युवा राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांनी लेखक, दिग्दर्शक म्हणून काम केले. तसेच, ’भगतसिंग वन्स मोअर’ या दोन अंकी प्रायोगिक नाटकात भगतसिंग यांची भूमिका, ’जाणता राजा शिवछत्रपती’ या अमोल कोल्हे अभिनित महानाट्यात सूत्रसंचालकाची भूमिका, ’भेटी लागी जिवा’ या सांगीतिक व्यावसायिक नाटकात भूमिका, ’मै सचिन तेंडुलकर’ या हिंदी प्रायोगिक नाटकात भूमिका साकारल्या. तसेच आजही ’आम्ही सारे’ या संस्थेच्या माध्यमातून दिग्दर्शक, लेखक, अभिनेता म्हणून मनिष कार्यरत आहेत.
 
महाविद्यालयीन जीवनात ’मी मराठी’ वाहिनीसाठी वर्तक महाविद्यालयाकडून सोपारकरांनी ’दे दणादण’ या प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते. तिथेच त्यांची ओळख ’डबिंग’ क्षेत्राशी झाले. त्यावेळी दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांना सोपारकर यांचा आवाज आवडला. मग त्यांनी सोपारकरांना ’मी मराठी’ आणि ’जनमत’ या दोन वाहिन्यांसाठी बातम्यांना ’व्हॉईस ओव्हर’ देण्याचे काम दिले. त्यानंतर त्यांनी ’फ्रीलान्सर’ म्हणून ’डबिंग’ क्षेत्रात काम करायला सुरूवात केली. पण, हा काळ त्यांच्यासाठी सोपा नव्हता. कारण, कला क्षेत्र हे आजही अनिश्चितता असलेले क्षेत्र मानले जाते.
 

Manish Soparkar


वर्तक महाविद्यालय, खालसा महाविद्यालय, एस. एन. महाविद्यालय, विवा महाविद्यालय, मिठीबाई महाविद्यालयांच्या एकांकिकांसाठी त्यांनी लेखन, दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच दुसर्‍या बाजूला अनेक मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटातील पात्रांना आवाज देण्याचे काम त्यांनी सुरू केले. ’आर्या’, ’सिटी ऑफ ड्रीम्स’, ’क्रिमिनल जस्टीस, हॉस्टेजेस’, ’ग्रहण’, ’डे ड्रीमर’, ’मार्शल युनिव्हर्स’ अशा अनेक वेबसीरिजसाठी त्याचबरोबर ’तारक मेहता’, ’वीर शिवाजी’, ’नंदिनी’, ’जय हनुमान’, ’श्रीकृष्णा’ यांसारख्या मालिकांसाठी ’डबिंग आर्टिस्ट’ म्हणून त्यांनी काम केले. तसेच जाहिराती, प्रोमो, डॉक्युमेंटरी यांच्यासाठी ’व्हॉईस ओव्हर’ त्यांनी दिला. त्यामुळे ’मेरी आवाज ही पहचान हैं’ हे वाक्य सोपारकरांबद्दल तंतोतत लागू पडते. एकदा मनिष सोपारकर अभिनेते विनय आपटे यांच्या आवाजाची ‘मिमिक्री’ करते होते आणि तेव्हा विनय आपटे स्वत: तिथे आले. त्यावेळी आपटे त्यांना म्हणाले की, “मनिष, स्वत:च स्वत:ची ओळख निर्माण कर, जर विनय आपटेंच्या आवाजाची नक्कल करशील, तर ’मिमिक्री आर्टिस्ट’ होशील,” हे वाक्य सोपारकर यांनी आयुष्य भर लक्षात ठेवले आणि म्हणूनच आज त्यांची स्वत:ची ओळख आहे.

मनिष सोपारकर यांनी ’झी युवा’ आणि ’झी टॉकीज’ वरील ’सुवर्णयुवा’ या अवॉर्ड शोसाठी, ’ई टीव्ही’ वरील ’गाणे तुमचे आमचे’ या शोसाठी लेखक म्हणून काम केले आहे. तसेच ’सह्याद्री’ वाहिनीवरील ’चित्रभूषण’ सोहळ्यासाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्याचबरोबर ’कुलवधू’,’क्राईम डायरी’,’मंथन’, ’एक संधी अजूनही’ या मालिकेत आणि ’घर दोघांचं’, ’स्कूल, कॉलेज आणि लाईफ’ या चित्रपटात अभिनेता म्हणूनही ते छोट्या पडद्यावर झळकले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या दशावतार महोत्सव, ’लोकमान्य पुरस्कार सोहळा’, ’गणेशोत्सव पुरस्कार सोहळा’ अशा अनेक सोहळ्यांसाठी सूत्रसंचालक म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली. सोपारकर यांना नाट्यकर्मी रमाकांत वाघचौडे स्मृतिप्रीत्यर्थ नाट्यक्षेत्रातील कामगिरीबद्दल प्रथम ’युवा रंगकर्मी पुरस्कार २०२२’, ‘आशा फिल्म्स’च्यावतीने नाट्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल ’कला गौरव पुरस्कार २०२२’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मनिष सोपारकरांना आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...!


-सुप्रिम मस्कर

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.