गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला अंटार्क्टिक समुद्रावरीलबर्फाचे प्रमाण १.९१ दशलक्ष चौरस किलोमीटर (७,३७,००० चौरस मैल) इतके कमी झाले. ही नोंद दि. २५फेब्रुवारी, २०२२ रोजी नोंदवलेल्या १.९२ दशलक्ष चौरस किलोमीटर (७,४१,००० चौरस मैल) चा विक्रमी नोंदींपेक्षा कमी असून, नवीन विक्रमी किमान प्रमाण या दिवशी नोंदवले गेले. अंटार्क्टिकेतल्या समुद्री बर्फाचा विस्तार २.० दशलक्ष चौरस किलोमीटर (७,७२,००० चौरस मैल) च्या खाली गेल्याचे हे नोंदवलेल्या इतिहासातले फक्त दुसरे वर्ष. जाणून घेऊया अंटार्क्टिकाभोवतीचा समुद्रातील बर्फाविषयी...
मागील वर्षामध्ये दि. १८ फेब्रुवारी ते दि. ३ मार्च दरम्यान वार्षिक किमान प्रमाण दिसून आले आहे. त्यामुळे या वर्षी आणखी घट होणे अपेक्षित आहे. अंटार्क्टिक समुद्रात कमी बर्फाच्या नोंदीमध्ये गेल्या सात वर्षांत तीन वेळ ‘रेकॉर्ड ब्रेकिंग’ वर्षं झाली आहेत. ही वर्षं म्हणजे २०१७, २०२२ आणि आता २०२३. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, वितळण्याच्या नेहमीच्या पॅटर्नचा विचार करता, या वर्षीचा आपण वार्षिक किमान बिंदू अद्याप दिसायचा बाकी आहे.अंटार्क्टिकाभोवतीचा समुद्राचा बर्फ हा वाढीच्या आणि वितळण्याच्या हंगामी चक्रातून जातो. दक्षिणेकडील हिवाळ्याच्या उत्तरार्धात, सप्टेंबरमध्ये बर्फ कमाल मर्यादेपर्यंत पोहोचतो. त्यानंतर वितळण्याचा हंगाम सुरू होतो. परिणामी, फेब्रुवारीच्या उत्तरार्धात किंवा मार्चच्या सुरुवातीला, दक्षिणेकडील उन्हाळ्यात बर्फाचे किमान प्रमाण दिसते. हवामानाच्या परिस्थितीनुसार, बर्फाची वक्ररेषा वर्षानुवर्षे बदलते. तथापि, गेल्या काही दशकांमध्ये कमी किमान आणि कमाल बर्फाच्या पातळीचा ‘ट्रेंड’ दिसू लागला आहेत.
अंटार्क्टिकाच्या सभोवतालच्या समुद्रातील बर्फाचे क्षेत्र विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले आहे, शास्त्रज्ञांनी अहवाल दिला आहे की, ‘इतकी टोकाची परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती.’ आर्क्टिकमधील समुद्रातीलबर्फ वितळण्यामुळे हवामान संकटाचा परिणाम १९७९ पर्यंतच्या नोंदींपासून स्पष्ट आहे. पण, अंटार्क्टिक समुद्रातील बर्फ वर्षागणिक अधिक प्रमाणात बदलत असतो, तरी या चा जागतिक पातळीवर अजून नीट कळलेले नाही. गेल्या सहा वर्षांतील अंटार्क्टिक समुद्रातील बर्फाचे हे चटकन लक्षात येणारे नुकसान दर्शविते की, आता समुद्रात उष्णतेची पातळी वाढलेली आहे आणि हवामानाच्या नमुन्यांमधील संबंधित बदलांचा अर्थ असा होऊ शकतो की, हवामानाचे संकट शेवटी अंटार्क्टिकच्या निरीक्षणांमध्ये प्रकट होत आहे. संशोधन, समुद्रपर्यटन आणि मासेमारी करणारी जहाजे, सगळेच समान चित्र नोंदवत आहेत. अशा अनेक जहाजांनी अंटार्क्टिक महाद्वीपाभोवती बहुतेक क्षेत्रे अक्षरशः बर्फमुक्त आहेत, असे नोंदवले आहे. फक्त वेडेल समुद्रावर गोठलेल्या हिमानगांचे वर्चस्व राहिले आहे, असेही जहाजे सांगतात.
अंटार्क्टिक बर्फाबद्दल शास्त्रज्ञ आधीच खूप चिंतित होते. २०१४ पर्यंतच्या हवामान मॉडेल्सनेअसे सुचवले होते की, या महाद्वीपावर बसलेली महाकाय पश्चिम अंटार्क्टिक आईस शीट, त्याकाळी नोंदवलेल्या ’ग्लोबल हीटिंग’मुळे कोसळू शकते, असे म्हटले गेले होते. या ‘हीटिंग इव्हेंट’मुळे, समुद्रावर बर्फाचे आवरण कमी होत आहे आणि हिमनगांचे विघटनदेखील वेगवान गतीने होऊ लागले आहे, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. अलीकडचा अभ्यास असादेखील अंदाज देतो की, पश्चिम अंटार्क्टिक आईस शीट हळूहळू कोसळत जाईल आणि समुद्रपातळी चार मीटरपर्यंत वाढेल. जागतिक तापमानात फक्त एका डिग्रीने बढत देखील हे घडवून आणू शकते, असे अभ्यासावरुन वरून दिसून येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा एक डिग्रीचा बिंदू आधीच निघून गेला आहे.
जर्मनीच्या आल्फ्रेड वेगेनर इन्स्टिट्यूटमधील ‘हेल्महोल्ट्झ सेंटर फॉर पोलार’ आणि ‘मरीन रिसर्च’चे प्रोफेसर कार्स्टन गोहल म्हणाले आहेत की, “मी येथे इतकी टोकाची, बर्फमुक्त परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती.” १९९४ साली पहिल्यांदा या प्रदेशाला गोहल यांनी भेट दिली होती. अंटार्क्टिकामधील ‘पोलारस्टर्न’ या संशोधन जहाजावर असणार्या गोहल यांनी कळवले आहे की, ‘महाद्वीपीय सागरमग्न खंडभूमी अर्थात ‘कॉन्टिनेन्टल शेल्फ एरिया’मध्ये, जर्मनीच्या आकारमानाचे क्षेत्र आता पूर्णपणे बर्फमुक्त झालेले आहे. हा बदल किती जलदगतीने झाला आहे, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. पुढे गोहल असेदेखील म्हणतात की, “गेल्या ३५ वर्षांत बर्फाचा आवरण तुटपुंजा गतीने बदलले, पण हेच आवरण गेल्या सहा वर्षांत अचानक खूप बदलले आहे.”
अमेरिकेतील ‘नॅशनल स्नो अॅण्ड आईस डेटा सेंटर’ (एनएसआयडीसी) येथील शास्त्रज्ञांनीही या नवीन किमान बर्फाच्या नोंदीबद्दल चिंता दर्शवली आहे. ‘एनएसआयडीसी’ शास्त्रज्ञ या अभूतपूर्व घसरणीचे श्रेय हवामानाच्या परिस्थितीला, विशेषतः अॅमंडसेन समुद्रावरती सामान्यापेक्षा जास्त तीव्र पाश्चात्य वारे आणि कमी दाबाची प्रणाली देतात, ज्यामुळे पश्चिम अंटार्क्टिकाच्या मोठ्या प्रदेशावर उष्ण हवामानाचा परिणाम झाला.या बदलत्या प्रणालीकडे कित्येक दशकांपासून अभ्यास करत असणार्या कार्लोस मोफ्ट, डेलावेअर युनिव्हर्सिटीच्या समुद्रशास्त्रज्ञांनीदेखील या गेल्या काही वर्षात घडणार्या बदलांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.इमेज क्रेडिट्स - पिवळी रेषा गहाळ असलेल्या बर्फाला चिन्हांकित करते.सोबत असलेल्या ‘एनएसआयडीसी’च्या आकृतीवरून अंटार्क्टिक बर्फाच्या शेल्फ्स्मधून वितळून गेलेल्या बर्फाचे प्रमाण दर्शवले आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, ऐतिहासिक नोंदी अंटार्क्टिकामध्ये नाट्यमय बदल दर्शवते. बेल्जियन संशोधन जहाज ‘बेल्जिका’, १२५ वर्षांपूर्वी अंटार्क्टिक उन्हाळ्यात एका वर्षापेक्षा जास्त काळ समुद्रावरील बर्फात अडकले होते. आज त्याच ठिकाणी पोलार्सटर्न नावाचे संशोधन जहाज पूर्णपणे बर्फमुक्त पाण्यात प्रवास करत आहे.
पण तरीही, ही असामान्य बातमी का आहे? अंटार्क्टिक समुद्री बर्फाचे वर्तन ही एक गुंतागुंतीची घटना आहे, ज्याला केवळ हवामान बदल इतकेच कारण दिले जाऊ शकत नाही. उपलब्ध उपग्रह डेटाच्या मागील ४० वर्षांच्या डेटावर नजर टाकल्यास, समुद्री बर्फाची व्याप्ती मोठी परिवर्तनशीलता दर्शवते. उन्हाळ्यातील बर्फाच्या परतीचा कमी-कमी होण्याचा कल गेल्या काही वर्षांतच दिसू लागला आहे. कॉम्प्युटर मॉडेल्सने भाकीत केले होते की, हा बदल दीर्घकालीन असेल, जसं आपण आर्क्टिकमध्ये पाहिले आहे. आर्क्टिकमध्ये ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा परिणाम म्हणून उन्हाळ्यातील समुद्री बर्फाचे प्रमाण दर दशकात १२-१३ टक्के कमी होत आहे. पण अंटार्क्टिकमध्ये स्थिती तशी नाही घडली. उपग्रहांचा डेटा हे दर्शविते की, अंटार्क्टिक समुद्रीबर्फ गेल्या शतकाच्या सुरुवातीला कमी होऊ लागला होता. परंतु, नंतर वाढूही लागला. पण अचानक अलीकडे काही वर्षात याने कमाल परिवर्तनशीलता दर्शविली आहे. हिवाळ्यात विक्रमी कमाल नोंददेखील झाली आहे आणि आता ग्रीष्मकालीन किमान रेकॉर्डदेखील. हिवाळ्यात, बर्फाच्या परतीची कमाल गणना १८ दशलक्ष वर्ग किमी (६.९ दशलक्ष चौरस मैल) इतकी व्यापक नोंदली गेली आहे.
उन्हाळ्यातील किमान नोंदीत प्रत्यक्षात किती बर्फ गहाळ आहे? ठाऊक आहे? व्यापकपणे सांगायचे, तर युनायटेड किंगडम आणि आयर्लंडसह ब्रिटिश बेटांना सहजपणे झाकण्यासाठी हे पुरेसे बर्फ असेल इतका बर्फ वितळला आहे. या तुलनेने तुम्हा वाचकांना नुकसान किती प्रमाणात झाले आहे, याचा ढोबळ अंदाज नक्कीच येईल.आपल्या ग्रहाच्या ध्रुवीय प्रदेशातला समुद्रातील बर्फ अत्यंत महत्त्वाचा आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर गोठलेल्या समुद्री बर्फात मीठ नसते, अर्थात ही गोठलेला पाणी मीठ बाहेर टाकते. या मुळे उरलेला सभोवतालचे पाणी अधिक घन होते आणि खोलवर बुडू लागते. हा ‘क्लायमॅटिक इंजिन’चा एक भाग आहे जो ‘द ग्रेट ओशन कंवेअर’ नावाचा पाण्याचा प्रवाह चालवतो. या च पाण्याच्या प्रवाहाने जागतिक हवामान यंत्रणेला शक्ती प्राप्त होते. ध्रुवांवरील जीवसृष्टीसाठीदेखील सागरी बर्फ खूप महत्त्वाचा असतो. अंटार्क्टिकमध्ये, बर्फाला चिकटलेली एकपेशीय वनस्पती ‘क्रिल’ म्हणून ओळखल्या जाणार्या लहान ‘क्रस्टेशियन्स’साठी अन्नाचा स्रोत आहे. हे क्रिल, व्हेल मास, सील, पेंग्विन आणि इतर पक्ष्यांसाठी मूलभूत अन्नाचा स्रोत आहे.
समुद्रीबर्फ अर्थात आईसबर्ग, हे एक असे ठिकाण असते, ज्यावर बर्याच प्रजाती समुद्राच्या पाण्याच्या बाहेर येऊन बसतात आणि विश्रांती घेतात. शिवाय, अंटार्क्टिक प्रदेशातील सभोवतालच्या तापमानावर पडणार बर्फाचा प्रभाव, जगभरातील हवामान चक्रांच्या योग्य कार्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.अंटार्क्टिकमध्ये ही घटना घडणे हे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सूतोवाच करते आहे की, हवामान बदल ही अफवा नाही तर अगदी आपल्या दारात येऊन ठेपलेला एक गंभीर धोका आहे. मानव जातीने समजून घेणे महत्त्वाचे आहे की, या बदलापासून सुटका नाही आणि त्याचा परिणाम आपल्या सर्वांवर, आज किंवा उद्या किंवा भविष्यात कधीतरी होईलच, याला पर्याय नाही. आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येक कृतीचा आता मानवतेच्या भविष्यावर अपरिवर्तनीय परिणाम होताना आपण बघत आहोत आणि बघत राहू...
-डॉ. मयूरेश जोशी