शिवचरित्र रुपेरी पडद्यावर यावं, नव्या पिढीच्या भावविश्वात शिवाजी महाराज पोहोचावे यासाठी दिगपाल लांजेकरांनी 'शिवराज अष्टक' ही संकल्पना आणली. त्यामागचं प्रयोजन काय, प्रेरणा कोणती आणि आतापर्यंत त्याला मिळालेला प्रतिसाद या सर्व मुद्यांवर आज शिवजयंतीच्या निमित्त चर्चा झाली.
1. शिवराज अष्टकला उदंड प्रतिसाद मिळतोय. प्रतिसाद चांगला आहे पण त्याचा समाजावर परिणाम कितीसा होतोय?
-आपण या चित्रपटांच्या मूळ उद्देशापर्यंत जाऊया. मुळात शिवाष्टक सुरु करताना फर्जंद जेव्हा करायला घेतला तेव्हा थोडी साशंकता मनात होती. चित्रपटाच्या व्यावसायिक यशाचा मुद्दा डोक्यातच नव्हता तेव्हा. ही एक चळवळ व्हावी ही इच्छा होती. जे शिवचरित्र आपण लहानपणापासून वाचलंय, जे आपल्याला गेले साडेतीनशे वर्ष प्रेरणा देतंय, ते नवीन पिढीच्या समोर आणावे हे मनात होतं. आजच्या मुलांना पुस्तकांपेक्षा चित्रपट आणि स्क्रीनवरची माध्यमं जास्त भावतात. त्यांच्या भावविश्वात शिवाजी महाराजांचं स्थान निर्माण व्हावं, जेणेकरून पुढे जाऊन हीच मुले खोलात शिरतील.. यासाठी हा प्रयत्न होता. आणि म्हणावा तसा प्रतिसाद मिळालासुद्धा. म्हणजे बघ आपण लहान असताना नाच रे मोरा आणि चॉकलेटचा बंगला या गाण्यांवर स्नेहसंमेलनात नृत्य सादर करायचो. मध्यंतरी हिंदी चित्रपटांतील अश्लील गाणी या मुलांमध्ये रुजतायेत की काय अशी आपल्या सगळ्यांनाच भीती वाटत होती. पण चित्र पुन्हा बदललं, युगत मांडली भारूडवर बरीच नृत्य दिसून येतात. हा सकारात्मक बदल आहे. मुलांच्या भावविश्वात शिवराज अष्टकच्या गाण्यांनी यशस्वी प्रवेश केला ही आमची जमेची बाजू. आता एक किस्साच सांगायचा झाला तर, ठाण्याच्या कारागृहात या चित्रपटांना घेऊन एक प्रयोग केला. तिथल्या ८ लहान मुलांना सातत्याने हे चित्रपट दाखवले. त्याचे व्हिडीओ बनवले. मुलांना रडू आलं, वाईट वाटलं, आपले पूर्वज इतकं करून गेले आणि आता आपण काय करतोय ही बोचणी लागली. तोच एक क्षण. मुलं सुधारली. काहींनी पुढे शिकायला सुरुवात केली आणि दोघांनी ठाण्याच्या भाजी मंडईत दुकान थाटले. आता सन्मानाने मेहनत करून ही मुलं जगतात तेव्हा समाधान वाटतं. हे फक्त चित्रपट नाहीत, म्हणूनच याला थोडं आध्यात्मिक बैठक असलेलं 'शिवराज अष्टक' असं नाव दिलं. अजून एक म्हणजे कोरोना काळात मला अनेक डॉक्टरांचे फोन आले. गाण्यांमुळे काम करण्याची लढण्याची स्फूर्ती मिळते असे त्यांनी सांगितले.
2. इतिहासाचं डॉक्युमेंटेशन करताना काही प्रमाणात लेखकाचं, दिग्दर्शकाचं अंतरंग त्यात उतरतं. आणि चित्रपट निर्मिती करताना ते गरजेचेही आहे. या दृष्टीने तुमच्या चित्रपटाटांकडे तुम्ही कसे पाहता?
- चित्रपट काही ऐतिहासिक डॉक्युमेंटेशन असू शकत नाहीत. त्यात काही प्रमाणात लेखकाला स्वातंत्र्य घ्यावंच लागतं. पण असं घडलं होतं का या विचाराने मुलं जेव्हा भूतकाळात डोकावतील अशी आशा करतो. हा माझा प्रयत्न आहे. इतिहासाचं सांस्कृतिक स्वरूपात जतन करून ठेवणं मला महत्वाचं वाटलं. मी सुरुवात केली, माझ्या एकट्याने ते होणार नाही. त्यात सातत्याने प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक पिढीत हे व्हायला हवे. हे चित्रपट म्हणजे इतिहास नाही तर सांस्कृतिक ठेवा आहे. आपण भालजींचे चित्रपट जसे ७० वर्ष पाहतो तसे हे १०० वर्षे पहिले जाणार आहेत. त्यामुळे इतिहास नाहीतरी निदान संस्कृती यातून टिकायला हवी. त्यातली बोली, जीवनमान, खाद्यसंस्कृती, पद्धती अशा अनेक गोष्टींचा अभ्यास केला. आज तू पाहिलं असशील तर माझ्या प्रत्येक चित्रपटात एक लोकगीत आहे, युगत भारूड, त्यानंतर गोंधळ घेतला, पोवाडा, वाघ्या मुरळी, धनगर गीत आणि आता सुभेदारमध्ये मरीआई आहे. ही आपली संस्कृती संगीताशी जोडली गेलीये. संगीत वारसा आपल्याला फार पूर्वीपासून लाभला आहे. ही जनजागृती करणारी आपली संस्कृती आज अंधश्रद्धेकडे झुकली तरी ती पुनर्जीवित आपणच करायला हवी.
3. आज अनेकांना शिवाजी महाराजांची भूमिका साकारायची आहे. अनेक चित्रपटही प्रदर्शित होतायत. या चित्रपटांकडे तुम्ही कोणत्या दृष्टीकोनातून पाहता?
- मी एका अर्थाने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. पण मला काही मुद्दे मांडायचेत. मी जेव्हा फर्जंद पासून सुरुवात केली तेव्हापासूनच मी म्हणतोय की एकट्या दिगपाल लांजेकरला संपूर्ण शिवचरित्र सांगणं शक्य नाही. फक्त ३२ वर्षांची त्यांची कारकीर्द आहे, तरी त्यावर हजारो पीएचडी झाल्या. लाखो लोक त्यावर अभ्यास करतायेत. अनेक दिग्दर्शक, लेखक साहित्यिक पुढे यायला हवे. सर्वंनी साकल्याने हे चरित्र उलगडून दाखवायला हवे, पण हे चरित्र कालातीत आहे, प्रत्येक काळात मार्गदर्शक ठराव असं आहे तर तेवढ्या डोळसपणे ते मांडले गेले पाहिजे. आमची टीम ते करायचा प्रयत्न कातरतेय. त्रुटी सगळ्यांकडून राहतात, पुढच्या चित्रपटातून त्या वगळायला हव्यात. फक्त लोकांना आवडतंय आणि व्यावसायिक फायदा मिळतो म्हणून याच्या मागे लागू नये. महाराजांची मांडणी जबाबदारीने व्हायला हवी. मग त्यात वेषभूषेपासून त्यांच्या संवादांपर्यंत सगळ्याकडे भान ठेऊन पाहायला हवं.
4. प्रत्येक चित्रपटात त्या त्या किल्ल्यावर जाऊन चित्रीकरण करायचा अट्टाहास का?
- दुर्दैवाने आपण स्वतःच करंटे आहोत. हा मिळालेला वारसा आपल्याला सांभाळता येत नाही. म्हणून, नाहीतर त्या त्या घटनेची हकीकत दाखवणारा तो तो किल्ला मला प्रत्येक चित्रपटात दाखवायचा होता. पण आज तेवढ्या चांगल्या अवस्थेत ते किल्ले आहेत का? आज कित्येक तरुण, संस्था पदरमोड करून किल्ले स्वच्छ करतायेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपुऱ्या सोयी. किल्ल्यांवर व्हॅनिटी किंवा मोठा ताफा घेऊन जाऊ शकत नाही. शूटिंग म्हंटल म्हणजे थोडंफार नुकसान होऊ शकत गडाचं, ते होऊ नये म्हणून मोजके सिन चित्रित करतो.
5. या शिवकार्यासाठी तुम्हाला नुकताच गुरुकुल पुरस्कार प्राप्त झाला. त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत?
- सगळ्या माध्यमांत एक विशिष्ठ दृष्टिकोनातून जे काम करतात त्यांना तो जाहीर केला जातो. मला मिळाला तो दुसरा गुरुकुल पुरस्कार. गिरीश खेमकर महान रंगकर्मी आहेत पुण्यात, अमृता धारकर आणि केतकी गद्रे यांनी सेटवरच मला काहीही कल्पना नसताना तो अर्पण केला. सर्व कुटुंबियांना बोलावून अशा अनोख्या पद्धतीने दिला.
6. तेच तेच कलाकार चित्रपटांतून पुन्हा पुन्हा दिसून येतात. टीम तीच ठेवण्यामागे काही खास कारण?
- ट्युनिंग हा सर्वात महत्वाचा भाग आहेच. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची शिवभक्ती. म्हणजे अर्थातच महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात शिवाजी महाराज रक्ताच्या थेंबा थेंबात आहेत पण अभिनय करताना त्या तोडीचा अभिनय सर्वच करू शकतील का हे पाहणं महत्वाचं ठरतं. दुसरं म्हणजे, मराठी चित्रपटात तुम्ही काम करता तेव्हा ज्या दर्जाचं तुम्ही काम करता, ज्या व्यस्त वातावरणात काम करता तेवढे पैसे मिळतीलच असे नाही. गेले ४ चित्रपट जे कलाकार माझ्यासोबत आहेत त्यांनी अमाप कष्ट उपसलेत. म्हणजे किल्ल्यांवर राहून सोयी उपलब्ध नसताना शूटिंग पूर्ण केलेत. अशी कलाकार मंडळी मला मिळाली. त्यामुळे ती मला नक्कीच सोडायची नाहीत. त्यातही मृणाल ताई आणि चिन्मयला आऊसाहेब आणि शिवाजी महाराज ही भूमिका मी देऊन टाकलीय. आऊसाहेब आणि शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची आराध्य दैवतं आहेत. त्यांच्यावर सर्व डोलारा उभा आहे. ही दोन पात्र सोडली तर ज्याच्या त्याच्या अभिनयानुसार, वकुबानुसार आणि भूमिकांच्या गरजेनुसार कलाकारांना भूमिका देतो.
मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.