पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवारांवर हल्लाबोल

‘प्रहार संघटने’चे आमदार बच्चू कडूंचाही सवाल

    17-Feb-2023
Total Views | 85
Bachu Kadu's question to Sharad Pawar on the morning oath ceremony
(बच्चू कडू)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर भाजप आणि मित्र पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर चौफेर हल्लाबोल करण्यात येत आहे. ‘प्रहार संघटने’चे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनीही शरद पवार यांना खोचकपणे सवाल विचारत, “आपल्या घरातील माणूस सकाळी शपथविधी करण्यासाठी जातो, हे माहिती नसेल का,” असा प्रश्न विचारला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शरद पवार यांना या प्रकरणी ‘टार्गेट’ करण्यात येत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

2019 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे औटघटकेचे सरकार स्थापन झाले होते. त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली. त्यावरुन राज्यात पुन्हा राजकीय वादंग सुरु आहे.या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच केलेल्या विधानानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्या पाठोपाठ आता ‘प्रहार संघटने’चे बच्चू कडू यांनीही शरद पवार यांना उद्देशून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. एक वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू यांनी शरद पवारांना लक्ष्य करत सवाल उपस्थित केले आहेत.

बच्चू कडू म्हणाले की, “शरद पवारांकडे सक्षम नेतृत्व म्हणून महाराष्ट्र आणि देशात पाहिले जाते. शरद पवारांना राजकारणातील खडान्खडा माहिती आहे. मग, आपल्याच घरातील माणूस सकाळी शपथविधी करण्यासाठी जातो, हे माहिती नसेल का,” असा प्रश्न बच्चू कडूंनी विचारला आहे.“शरद पवारांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अजित पवार शपथविधी घेण्यासाठी गेले होते. आता ते नाही म्हणत आहेत. पण, शरद पवार आणि विचारांना सोडून जर ते शपथविधी घेत असतील, तर मोठी बंडखोरी केली होती. मग अजित पवारांना उपमुख्यमंत्री कसे केले? ज्यांनी बंड केले, त्यांना पदावर बसवले. असे जर पक्षाचे धोरण असेल, तर इमानदारीने राहणार्‍या आमदारांचे काय,” असा सवालही बच्चू कडूंनी उपस्थित केला.

“बंड करणार्‍यांचे स्थान मोठे राहते. नाना पटोले काँग्रेस सोडत भाजपमध्ये गेले. परत काँग्रेसमध्ये आले. आता राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाले. बंडानंतर माणसाची किंमत वाढते, अशी चिन्ह आहेत,” असे विधान बच्चू कडूंनी केले आहे.
शरद पवारांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले होते. त्यांनी मोठी बंडखोरी केली होती. मग अजित पवारांना उपमुख्यमंत्री कसे केले? ज्यांनी बंड केले, त्यांना पदावर बसवले. असे जर पक्षाचे धोरण असेल, तर इमानदारीने राहणार्‍या आमदाराचे काय? -बच्चू कडू , प्रहार संघटना-प्रमुख
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121