शरीरातील पेशीपेशींमधील पूर्वीची गुणाणुरचना आता आपले पूर्वीचे सापेक्ष स्थान बदलून आवश्यक अशा नवीन सापेक्ष अवस्थेत येत असल्याने शरीरात विलक्षण दाह उत्पन्न होत असतो. उत्क्रांत अवस्थेत साधकाचे पूर्वीचे गुण बदलून नवीन उत्क्रांत आवश्यक गुण उत्पन्न होत असतात. तसे होत असताना पेशीपेशींतील जुन्या अनुत्क्रांत गुणाणुरचना बदलून, त्या स्थानी उत्क्रांत गुणरचना होत असल्याने असला दाह उत्पन्न होत असतो.
लोहातील कण एकसारखे गरगर फिरत असतात. त्यामुळे ते लोखंड अतिशय तापते. तद्वत साधकाच्या शरीराची अवस्था होऊन अतिशय दाह उत्पन्न होत असतो. असला भयानक दाहाचा काळ कुंडलिनी जागृतीच्या समयी जावाच लागतो. त्याला उपाय नाही. त्याकरिता आधी सांगितल्याप्रमाणे, जप, औषध योजना करावी म्हणजे दाहाची मात्रा कमी होऊ शकेल. पुराणातील सगर राजाच्या 16 सहस्त्र पुत्रांचे कपिल महामुनींचे शापामुळे भस्म होणे, याच कुंडलिनी जागृतीच्या अनुभवाचे कथारूप वर्णन होय. भगिरथाचे प्रयत्न म्हणजे त्यावरील उपाय होते. त्याचा यौगिक आशय न कळल्यामुळे साधनेतील एका महान सत्याला आपला समाज वंचित झाला आहे. भगवान गोपाळकृष्णाने यमुनेतील भयानक विषारी कालियाचे मर्दन करून त्याला यमुनेतून बाहेर घालवण्याची कथा याच कुंडलिनी दाहाचे कथारूप वर्णन होय. कालिया नागाच्या अस्तित्वामुळे यमुना तीरावरील ‘गौ’ म्हणजे इंद्रिये सुद्धा दग्ध होत असतात. त्यांना शांतता मिळावी म्हणून यमुना म्हणजे सुषुम्ना नाडीत प्रवेश करून त्या कालिया सर्पाचा नाश भगवान योगी करतात, असा त्या कथेचा आशय आहे.
भीमाचे विषप्राशन व नागकन्येद्वारे त्याचे जलात अपहरण असल्याच कुंडलिनी जागृतीच्या दाहाचे कथारूप वर्णन होय. नवीन वस्ती निर्माण करण्याकरिता पांडव खांडव वन जाळून त्यात मयासुराद्वारे मयसभा निर्माण करतात, पांडवांना लाक्षागृहात ठेवून ते रात्रीच्या वेळी दग्ध करून पांडवांना म्हणजे साधकातील उच्चवृत्तींना दग्ध करण्याचा दुष्टवृत्तीरूप दुर्योधनाचा प्रयत्न असल्याच कुंडलिनी जागृत झाल्यानंतर निर्माण झालेल्या दाहाचे कथारूप वर्णन होय. अर्जुनाचा नागकन्यांशी विवाह, भीम आणि अर्जुनाचे नागकन्यांद्वारे हरण व नागकन्यांशी झालेले विवाह, नागकन्या उलूपिपासून अर्जुनाला झालेला पुत्र बभ्रुवाहनाशी अर्जुनाचे युद्ध, भीमाचे नागलोकांशी सख्य इत्यादी महाभारतातील कथा असल्याच कुंडलिनी जागृतीच्या जटिल अनुभवांचे कथारूप वर्णन होय.
विहंग गती
विहंग गती कुंडलिनी जागृतीतील शेवटची अवस्था होय. शरीरातील पेशीपेशीतील गुणाणुंची पुनर्ररचना संपून सर्व गुणकण आता आवश्यक त्या उच्च उत्क्रांत सापेक्ष अवस्थेत स्थिरावले असतात. आता अपार शांतीचे साम्राज्य सुरू झालेले असते. घटाघटातील विद्युत चुंबकीय प्रवाह आता मंद व शांत झालेला असतो. त्यामुळे रक्तप्रवाह संथ व मंद झालेला असतो. शरीरातील सर्व विद्युत्कर्षण व्यवहार पूर्णत्वामुळे संयमित झालेला असतो. त्यामुळे आता साधकाचे शरीर, मन, बुद्धी व चित्त शांत झालेले असते. एखादा विहंग पक्षी चिमणीप्रमाणे फडफड न करता जसा शांतपणे पंख पसरून भयानक वेगाने इतस्ततः भ्रमण करीत असतो, तद्वत् साधकाचे शरीर वरून शांत पण व्यवहार अतिशय वेगाने विश्वाशी निगडित झालेले असतात. ‘धी’ म्हणजे जागृत चेतना शक्ती सर्वत्रच अखिल विश्वात स्पंदन करीत असून तिचे कर्षण प्रत्येक व्यक्ती आपापल्या बुद्धी क्षमतेनुसार सतत करीत असते. व्यक्तिगणिक होत असलेल्या असल्या सततच्या कर्षणाला ‘बुद्धी-शक्ती’ असे म्हणतात. असल्या बुद्धीमुळेच प्रत्येक पिंडाचा सर्वप्रकारचा व्यवहार चालू असतो. फिरणारा भोवरा वरून एका स्थानी स्थिर वाटत असला तरी तो स्वत:भोवती अतिशय वेगाने भ्रमण करीत असतो. विहंगाचे तसेच असते. त्याच्या पंखांची फडफड मुळीच दिसत नाही. परंतु, त्या पक्ष्याच्या केंद्राची ओढ पुढे पुढे असल्यामुळे तो विहंग अतिशय गतीने पुढे पुढे सरकत असतो. साधकाच्या असल्या वरवर शांत वाटणार्या, परंतु आतून विश्वाशी गतिमानतेने संलग्न असणार्या अवस्थेला धरून ऋषिमुनींनी ‘विहंग अवस्था’ असे यथार्थ नाव दिले आहे.
अखिल विश्वाशी संबंध आणण्याचे कार्य आपला मेंदू करीत असतो. विश्वातील अनंत शक्ती आपल्यात कर्षण करून त्याचे सुयोग्य वितरण मेंदू तंतुजालाद्वारे व त्या त्या गुणांना संचयित करणार्या केंद्राद्वारे सतत करीत असतो. मेंदूच्या असल्या दिव्य कर्षण व वितरण शक्तीला भगवान वेदव्यास ‘कृष्ण’ असे म्हणतात. ’कृष्ण’ या शब्दाची परिभाषाही तशीच आहे. ‘कर्षति इति कृष्णः’ कुंडलिनी जागृत योगी असल्या दिव्य कृष्ण अवस्थेत असल्याने त्याच्या मेंदूतील सर्व कर्षणगुणकेंद्रे पूर्णपणे जागृत होऊन ती यथार्थ कार्य करीत असतात. त्यामुळे असला परमयोगी सर्वगुणसंपन्न असा बनतो. इतरांपेक्षा सर्व विद्या व कलांमध्ये तो लवकरच श्रेष्ठ होतो. कुंडलिनी जागृतीमुळे तो सुंदर दिसतो. अतिशय बुद्धिमान होतो. तो ज्ञानी, वक्ता, लेखक, कवी, मल्ल, समाजसुधारक, समदुःखी, मुत्सद्दी, इत्यादी सर्व गुणांनी परिपूर्ण होतो. भगवान गोपालकृष्णाचे चरित्र भगवान वेदव्यासांनी असेच परिपूर्ण दाखविले आहे. ज्ञानमय वैदिक परंपरेचा आदर्श भगवान गोपालकृष्ण आहेत. आपल्या मेंदूतील अनेक शक्तिकेंद्रे व पेशी सुप्त पडलेल्या असतात. कुंडलिनी जागृतीद्वारे ती पेशीकेंद्रे जागृत व कार्यवश होतात आणि अशी व्यक्ती सर्वगुणसंपन्न होते. कुंडलिनी जागृतीचे हे वैशिष्ट्य आहे. असल्या दिव्य अवस्थेलाच समर्थ म्हणतात - ‘वेश असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा.’
सर्व विश्वाचे सत्य जाणण्याची दिव्य क्षमता मानवी मेंदूत असते. एवढा मोठा हत्ती, पण त्याचा मेंदू मानवाच्या मेंदूपेक्षा बराच लहान असतो. मानवाच्या मेंदूत बरीच अनुभव केंद्रे असतात आणि त्यांना साहाय्य करणार्या अगणित पेशी असतात. यापैकी बर्याच पेशी व शक्तिकेंद्रे अजागृत अवस्थेत असतात. कुंडलिनी जागृतीमुळे मेंदूत रक्तपुरवठा अधिक होऊन व त्याशिवाय प्रत्येक पेशीतील कुंडल अवस्था पूर्णपणे बदलून, त्या पेशी व त्यांची शक्तिकेंद्रे नवउत्क्रांत दिशेने प्रेरित होऊन साधक अतिशय बुद्धिमान व सर्वज्ञाता होत असतो. सर्व विश्वातील गूढ तो स्वस्थानीच जाणत असतो. विश्वात अनंत शक्ती सतत संचार करीत असतात. त्या त्या संचार शक्तींशी आपल्या मेंदूद्वारे संपर्क साधल्यास साधकाला विश्वातील त्या त्या दिव्य अवस्थेचे ज्ञान आपणहून होऊ शकते. उदा. दूरश्रवणाचेही असेच असते. जगातील अनेक वितरण केंद्रांवरून त्या त्या स्पंदनाच्या लहरी सतत प्रक्षेपित केल्या जातात. त्या ध्वनिलहरींचे आपापल्या घरातील रेडिओ उपकरणाद्वारे कर्षण करायचे असते, म्हणजे मग आपल्याला त्या त्या दूरश्रवण केंद्रावरील बातम्या अथवा गाणी ऐकू येतात. मेंदूचे कार्यदेखील तसेच असते.