पवारांच्या संमतीशिवाय शपथविधी होणे अशक्यच - सदाभाऊ खोत
15-Feb-2023
Total Views | 102
60
मुंबई : ''२३ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला होता. अजित पवारांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एकत्र येत भाजप राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करत पहाटेचा शपथविधी केला होता हे सर्वांना माहित आहे. राष्ट्रवादीने कितीही नाकारले तरी हा शपथविधी पवार साहेबांच्या संमतीशिवाय होणे शक्यच नव्हते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात केलेला दावा योग्यच असून पहाटे झालेला शपथविधी पवारांच्या संमतीशिवाय होणे शक्यच नाही,' असे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीच्या संदर्भात केलेल्या गौप्यस्फोटानंतर राज्यातील राजकारणात विशेषत्वाने चर्चांना नव्याने सुरुवात झाली आहे. त्यातच पवारांचे कट्टर विरोधक आणि माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेल्या या विधानामुळे या वादात भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचाच डाव असल्याचा आरोपही सदाभाऊंनी यावेळी केला.
अजित पवार निर्णय घेऊ शकत नाहीत
‘पहाटेच्या शपथविधीबाबत यापूर्वी मी माझी स्पष्ट भूमिका मांडली होती. माझी ती भूमिका अशी होती की, शरद पवारांच्या संमतीशिवाय पहाटेचा शपथविधीच होऊ शकत नाही. अजित पवार स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे शरद पवारांना शपथविधीबाबत माहित नाही, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा साफ खोटा असल्याचेही खोत यांनी म्हटले आहे.