BBC IT Raid : बीबीसीच्या कार्यालयात धाडीवेळी नेमकं काय सुरू होतं?
14-Feb-2023
Total Views | 93
BBC IT Raid
नवी दिल्ली : 'बीबीसी'च्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात मंगळवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाचे पथक पोहोचले. दिल्लीतील केजी मार्ग भागात एचटी टॉवरच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर बीबीसी कार्यालय आहे. या कार्यालयात तब्बल २४ आयकरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चौकशी केली. कारवाईत सर्वच कर्मचाऱ्यांचे फोन बंद करण्यात आले आहेत. सर्वांनाच एका खोलीत बसण्यास सांगितले आहे.
ही कारवाई दिल्लीत सुरू असताना मुंबईत सांताक्रूझ भागात बीबीसी स्टुडिओतही आयकर विभागाचे पथक पोहोचले. आयकर विभागातील सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, बीबीसीवर आंतरराष्ट्रीय करातील अनियमिततेचा आरोप लावण्यात आला आहे. याची चौकशी सध्या सुरू आहे. मात्र, या छाप्याबाबत आयकर विभाग किंवा बीबीसीतर्फे कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
काँग्रेसने बीबीसी कार्यालयावर कारवाईचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील माहितीपटाशी जोडला आहे. काँग्रेसने ट्विट करून याला अघोषित आणीबाणी म्हटले आहे. बीबीसीची पहिली डॉक्युमेंट्री आली, त्यावर बंदी घालण्यात आली. आता आयटीने बीबीसीवर छापा टाकला आहे, ही अघोषित आणीबाणी आहे.
काँग्रेसने आरशात पहावे!
काँग्रेसच्या वक्तव्यानंतर भाजप खासदार राज्यवर्धन सिंह राठोड म्हणाले की, "काँग्रेसने आणीबाणीवर बोलू नये. जे वृत्तपत्र स्वातंत्र्याबद्दल बोलतात त्यांनी स्वतः आरसा पहावा. इंग्रजांनी भारत सोडला त्यानंतर काँग्रेसचा फुटीरतावादी अजेंडा पुढे रेटण्याचे काम काँग्रेसकडे सोपवले असेच दिसते आहे. आणीबाणी आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बोलणाऱ्यांनी आरशात बघायलाच हवं.
दिल्लीतील बीबीसी कार्यालयाबाबत!
ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) वर्ल्ड सर्व्हिस टेलिव्हिजन ही ब्रिटिश सरकारी संस्था आहे. ज्यात ४० भाषांमध्ये बातम्या प्रसारित केल्या जातात. ब्रिटीश संसदेतील अनुदानाद्वारे त्याला वित्तपुरवठा केला जातो. त्याचे व्यवस्थापन परराष्ट्र आणि राष्ट्रकुल कार्यालयामार्फत केले जाते. हे डिजिटल, संस्कृती, मीडिया आणि क्रीडा विभागांतर्गत काम करते. बीबीसीची सुरुवात 1927 साली रॉयल चार्टर अंतर्गत झाली.