साहित्य संमेलनाच्या भाउगर्दीत संमेलनाध्यक्ष उपाशी !
सायली राजाध्यक्ष वडिलांची कड घेऊन फेसबुकवर कडाडल्या ; साहित्य संमेलनानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
13-Feb-2023
Total Views | 101
मुंबई : नुकतेच वर्धा येथे ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले. अनेक माध्यमांतून संमेलनावर टीका झाली. कार्यक्रम आणि आयोजनावर आसूड ओढले गेले. संमेलनाच्या संपरोपच्या अध्यक्षीय भाषणात नरेंद्र चपळगावकर यांनी आयोजकांकडून आणि रसिकांकडून आपल्याला भरपूर प्रेम मिळाले असे संगितले होते, मात्र एकंदर सूर निराळा असल्याचे व चपळगावकरांचा अवमान झाल्याचे सायली राजाध्यक्ष यांच्या पोस्ट मधून दिसून येते. त्यांनी यावेळी आयोजकांसोबतच मुख्यमंत्री आणि पत्रकारांचीही संमेलनालाआवश्यकता नसल्याचे म्हंटले आहे. संमेलनात अध्यक्षांच्या जेवणाची सोय नसल्याचे सांगत त्यांची झालेली परवड त्यांनी मांडली आहे.
सायली आपले अनुभव सांगताना म्हणतात, "तब्बल सव्वा तास मुख्यमंत्र्यांची वाट पाहण्यात गेला. मुख्यमंत्री पावणेबारा वाजता आले. तोपर्यंत सगळे लोक ताटकळत बसलेले होते. आल्यावर दिलगिरी व्यक्त करणं वगैरे प्रकार नाही. जणू काही उशिरा येण्याचा आपल्याला अधिकारच आहे अशी वृत्ती. त्यानंतर प्रत्येक माणसाचा वेगवेगळ्या माणसानं केलेल्या सत्कारानं आणखी काही वेळ गेला. मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले ते थांबेचनात. त्या भाषणाला काही संदर्भ नव्हता, काहीही सूत्र नव्हतं. ते फक्त बोलत आणि बोलत होते. त्यातच स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आणि शेतक-यांच्या आत्महत्या याविरोधात काही लोकांनी निदर्शनं केली. त्यांची दखल घेण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी भाषण सुरूच ठेवलं. बाबांना बाहेर प्रवेशद्वारावर गाडी सोडून चालत यायला सांगितलं. एका तंबूत बाबा होते. त्यांना भेटायला गर्दी उसळलेली असताना एक पोलिस इन्स्पेक्टर येऊन आमचं इथे ब्रिफिंग आहे आणि तंबू खाली करा असे म्हणाला. आई बाबांच्या जेवणाचीही सोय केलेली नव्हती. तीनही दिवस आईबाबा आणि माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांचे कुटुंब बाहेर जाऊन जेवत होते."
पुस्तकांची दुकाने आणि आयोजकांच्या उदासीनतेवर भाष्य करत त्यांनी त्याचवेळी नागपुरात सुरु असलेल्या लिटरेचर फेस्टिवलबद्दल आपले अमूल्य मत मांडले. चपळगावकरांच्या अध्यक्षीयभाषणातील मुद्दे कसे बरोबर होते हे पटवून देत त्यांनी कमी खर्चातील संमेलने कशी योग्य आहेत यावर आपले मत व्यक्त केले. तसेच पत्रकारांनी संमेलनात उच्छाद मांडल्याचे म्हणत त्यांनी आयोजकांवर टीका केली. त्यावर त्यांनी तोडगा सुचवल्यास आयोजक किमान प्रयत्न करू शकतील अशी आशा आहे.