नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या तक्रारीवरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना विशेषाधिकार भंग प्रकरणी लोकसभा सचिवालयाने नोटीस पाठवली आहे. लोकसभा सचिवालयाने त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपला असून संसदेचे कामकाज १३ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
लोकसभेत उद्योगपती गौतम अदानी यांना केंद्र सरकारने संरक्षण दिल्याचा पुराव्याशिवाय आरोप करणारे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर संसदेच्या विशेषाधिकार समितीने कारवाई सुरू केली आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना विशेषाधिकाराच्या भंगाच्या नोटिसीवर कार्यवाही करत समितीने राहुल गांधी यांना १५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. राहुल गांधी यांनी उत्तरासह योग्य कागदपत्रे सादर न केल्यास त्यांना समितीसमोर हजर रहावे लागू शकते.
राहुल गांधी यांची विधाने ही सभागृहाची दिशाभूल करणारी, अपमानास्पद, असंसदीय आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेस बाधा आणणारी होती. त्याचप्रमाणे आरोप करताना त्याविषयीचे पुरावे देऊनही राहुल गांधी यांनी पुरावे सादर केले नाहीत. त्यामुळे हा सभागृहाचा अपमान झाला असून लोकसभा सदस्यांच्या विशेषाधिकाराचा भंग असल्याचे पत्र भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लिहिले होते.