
आधुनिक भारतातील महान सेनानी म्हणजे महादजी शिंदे
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टिका केली. दिल्ली विजयोत्सव कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटले की, भारत जोडो यात्रेला निघालेल्यांनी मराठा शासक महादजी शिंदे एका पायावर भारत जोडला होता, हे शिकावे असा टोला त्यांनी लगाविला.
महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक संचालनालय आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे महादजी शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिल्ली विजयोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते व खासदार सुधांशू त्रिवेदी, माजी माहिती आयुक्त उदय माहूरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिल्ली प्रांत कार्यवाह भारत भूषण आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री सिंधिया म्हणाले, महादजी शिंदे यांनी हिमालयापासून अरबी समुद्रापर्यंत, अटकपासून कटकपर्यंत भारताला जोडले होते. आज भारत जोडो अभियान चालवणाऱ्यांनी इतिहासाच्या पानांवरून शिकावे. त्यांनी भारताला केवळ लष्करी सामर्थ्य आणि कौशल्यानेच नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीनेही जोडण्याचे मोठे काम केले. स्वावलंबी भारत आणि एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना त्यांनी अतिशय कौशल्याने राबविल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ते म्हणाले की, पानिपतच्या तिसऱ्या युद्धात सिंधिया घराण्याचे 16 दिवे विझले. महादजी सिंधिया यांचा एक पाय कापण्यात आला. एक पाय असूनही त्यांनी फ्रान्स, पोर्तुगाल यांच्या मदतीने सैन्याचे आधुनिकीकरण केले. बंदुका आणि तोफांसह सैन्य तयार केले. आग्रा येथे तोफखाना उभारला आणि 10 वर्षांनी 1771 मध्ये लाल किल्ला जिंकला. एवढेच नाही तर 1782 मध्ये त्यांनी बडगाममध्ये इंग्रजांचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे आधुनिक भारतातील एक महान सेनानी म्हणजे महादजी शिंदे असल्याचेही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावेळी नमूद केले.
सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, इतिहासकारांनी देशाच्या इतिहासातील हिंदू स्वाभिमान, अभिमान आणि विजयाचे अध्याय जाणूनबुजून लपवले. मुघल सम्राट शाह आलम हा महादजी सिंधिया यांच्या नियंत्रणाखाली होता, हे सत्य सांगितले जात नाही. बाप्पा रावल यांनी तुर्कस्तानपर्यंत साम्राज्य प्रस्थापित केले होते. त्याचप्रमाणे १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अमृत काळातील गुलामगिरीच्या प्रतिकातून मुक्त होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळेच भारतीय नौदलाचा ध्वज आणि चिन्ह बदलून त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचे चिन्ह समाविष्ट करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.