पुणे : मुंढवा येथील गुगलचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा निनावी फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाने गुगलचे कार्यालय आणि परिसरात कसून तपासणी केली. परंतु, घटनास्थळी काहीही संशयास्पद अथवा बॉम्ब सदृश वस्तू आढळून आले नाही. दरम्यान, मुंबई पोलिसांनी निनावी फोन करणार्या व्यक्तीस हैदराबाद येथून अटक केली.
रविवारी रात्री मुंबईतील गुगलच्या कार्यालयात एकाचा निनावी फोन आला. त्या व्यक्तीने पुण्यातील गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यावर गुगलच्या अधिकार्यांनी मुंबई पोलिसांना ही माहिती दिली. येथील एका कमर्शियल बिझनेस सेंटरच्या इमारतीमध्ये 11 व्या मजल्यावर गुगलचे कार्यालय आहे. त्यानुसार पुणे शहर पोलिसांनी या ठिकाणी पोलिस बंदोबस्त पाठविण्यात आला.
त्यानंतर तातडीने मुंढवा पोलिस आणि बॉम्बशोधक व नाशक पथक गुगलच्या कार्यालयात पोचले. त्यांनी संपूर्ण कार्यालय आणि इमारतीच्या परिसरात तपासणी केली. मात्र, काहीही तथ्य आढळून आले नाही. मुंबई पोलिसांनी फोन करणार्याचा शोध घेतला असता, तो हैदराबाद येथून आल्याचे निष्पन्न झाले. हैदराबाद पोलिसांच्या मदतीने निनावी फोन करणार्या व्यक्तीला अटक केली आहे. तो पुण्यातील गुगल कार्यालयात काम करणार्या एका कर्मचायाचाच भाऊ आहे. मद्यधुंद अवस्थेत त्याने हा फोन केल्याची माहिती समोर आली आहे.