भारताची यथेच्छ नालस्ती करणार्या चर्चिलच्या देशात काय सुरू आहे आणि भारत आणि त्याच्या शेजारच्या देशात काय चालू आहे?
Briton economic crisis
1947 साली जेव्हा एका मोठ्या संघर्षानंतर भारत स्वतंत्र झाला आणि देश म्हणून आपली वाटचाल सुरू झाली, त्यावेळी दुसर्या महायुद्धाचे नायक म्हणून ओळखल्या जाणार्या सर विन्स्टन चर्चिल यांचे वाक्य होते, ‘भारत भुरट्या, रस्त्यावर लूटमार करणार्या लोकांच्या हातात जाईल. त्याचे नेतृत्व अत्यंत सुमार क्षमतेच्या लोकांच्या हातात असेल. तोंडाने गोड बोलणार्या मनाने मूर्ख असलेल्या लोकांच्या हातात हा देश असेल. हे लोक सत्तेसाठी परस्परांशी भांडतील आणि राजकीय स्थैर्य हरवून बसतील. भारतात एक दिवस असा येईल की, हवा आणि पाण्यासाठी देखील कर लावला जाईल.’‘ पण, नियतीचा काव्यगत न्याय असा की, हे सगळे आणि याहून वाईट खुद्द चर्चिल यांच्याच राजकीय पक्षात आणि त्यांच्या देशात होत आहे.
‘ब्रेक्झिट‘मधून त्यांनी काय साध्य केले, या प्रश्नाचे उत्तर कुणाचपाशी नाही. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. शाही परिवारापासून ते ‘बीबीसी‘पर्यंत कितीतरी बांडगुळे ब्रिटिश करदात्यांच्या जीवावर चैन करीत आहेत. बँकिंग हा एकमेव धड चालणारा व्यवसाय ब्रिटिशांपाशी उरला आहे. या बँकिंग व्यवसायाचे भांडवलदेखील निरनिराळ्या देशांतून लुटून आणलेल्या संपत्तीवर उभे आहे, हे कधीच विसरता येणार नाही. या सगळ्यावर कळस म्हणून एक भारतीय वंशाचा माणूस (ज्या भारतीयांविषयी चर्चिल यांना इतका तिटकारा होता) या ब्रिटनचे नेतृत्व करीत आहे.
भारताची स्थिती मात्र अगदी उलट आहे. देशात राजकीय अंत:प्रवाह निरनिराळे दिसत असले, तरी ‘राष्ट्र’ म्हणून देशाची वाटचाल खंबीरपणे होत आहे. अर्थव्यवस्थेचा दिवा वादळातही देशाच्या राजकीय नेतृत्वाच्या ओंजळीने रक्षिलेला आहे. ब्रिटन आणि त्याच्या आसपासच्या देशात जे चालू आहे आणि भारत आणि भारताच्या शेजारच्या देशात जे चालले आहे, यातील फरक भीषण आणि जाणविण्यासारखा आहे. भारताबरोबरच ‘राष्ट्रजीवन’ म्हणून आकाराला आलेले देश मात्र पूर्णपणे अराजकाच्या वाटेवर आहेत. आपल्या घरात अराजक येऊ नये म्हणून स्वत:च्या हितासाठी आपल्यालाच हळूहळू का होईना, या देशांचे संचालन ठीक व्हावे, यासाठी प्रयत्न करावे लागतील.
पाकिस्तान ही सगळ्यात भयंकर गोष्ट. ज्या दहशतवादी गटांना पाकिस्तानने अफगाणिस्तानात स्थैर्य मिळवून दिले, ते दहशतवादी गट आता पाकिस्तानात दहशतवादी कारवाया करायला सक्रिय झाले आहेत. त्यांची क्रौर्याची भूक इतकी आहे की, लहान मुले, महिला कुणालाही सोडायला ते तयार नाहीत. माणसेच काय, पण मशिदींसारखी धार्मिक स्थळेही त्यांच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. वाजपेयींच्या कवितेतल्या ‘औरो के घरो मे आग देखने का सपना सदा अपने ही घरमे खरा होता हैं’ या उक्तीची प्रचिती तिथे येत आहे. महागाईमुळे शिक्षण सोडाव्या लागलेल्या मुलांची एक पिढीच्या पिढी आज पाकिस्तानात उभी आहे. आता ही मुले वयात येऊन काय करणार, हे सांगायला वेगळ्या ज्योतिष्याची गरज नाही. या देशाचे लवकरच तीन तुकडे होतील आणि रशिया भारत आणि चीन यांच्या आश्रयाला जातील. असे झाले, तरच आशिया इस्लामी दहशतवादापासून काही काळ तरी सुरक्षित राहील. धर्माचे अधिष्ठान बाळगून उभी राहिलेले राष्ट्रे अखेरीस कोणत्या दिशेने जातात, त्याचा हा वस्तुपाठ आहे.
श्रीलंकेची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. इस्लामी दहशतवादाचे सावट इथे नसले तरी यादवी ही श्रीलंकेची मोठी समस्या. केवळ दोन कोटी लोकसंख्या असलेला हा देश त्याच्या स्थापनेपासून आर्थिक आघाडीवर मेटाकुटीला आला आहे. मधल्या काळात चीनच्या नादाला लागल्याने श्रीलंकेत जे काही झाले, त्याचे आपण सगळेच साक्षीदार आहोत. अचानक सगळे काही जैविक शेतीच्या आधारे करून लोकप्रियता मिळविण्याची सवंग हुक्की श्रीलंकेच्या राज्यकर्त्यांना आली आणि अन्नसुरक्षेचे पुरते बारा वाजले. अन्नधान्याची महागाई इतकी वाढली की, लोक रस्यावर उतरले. महागाईचा श्रीलंकेतला दर 54.2 टक्के इतका भयंकर आहे. आधीच ‘कोविड’, त्यात रस्त्यावर चाललेल्या मारामार्या, यामुळे श्रीलंकेतले पर्यटनही पुरते कोलमडले. आज भारतच श्रीलंकेला आर्थिक आणि प्रशासकीय घडी बसविण्याच्या दृष्टीने मदत करीत आहे.
नेपाळमधली स्थितीही काहीशी अशीच आहे. परकीय चलनाचा साठा, बँका व वित्तीय संस्था, सरकारी महसूलात तूट, रोजगाराच्या संधी असे सगळेच घटक एकामागोमाग एक संकटात येत आहेत. महागाई फारशी नसली, तरी राजकीय अस्थिरता भयंकर आहे. राजकीय पक्ष भारताकडून की चीनकडून लाभ मिळवायचे, याच साठमारीत गुंतलेले असतात. भूकंपाचेही एक कारण इथे आहेच. बांगलादेश हा भूप्रदेशाच्या तुलनेत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश. निरनिराळ्या जागतिक वित्तीय संस्थाकंडून घेतलेले कर्ज आणि आर्थिक संकटे हे बांगलादेशासमोरची मोठी समस्या. त्यात अन्नसुरक्षा हे मोठे संकट आहेच.
या सगळ्या शेजारी राष्ट्रांच्या तुलनेत आपली स्थिती निराळी आणि मजबूत आहे. परकीय गंगाजळी ठीक स्थितीत आहे. महागाईवर बर्यापैकी नियंत्रणात आहे. नवे ‘युनिकॉर्न’ तयार होत आहेत. स्टार्टअप किंवा उत्पादन उद्योगात आपण खूप पुढे गेलो आहेत. 2023 या आर्थिक वर्षात भारत आर्थिक ताकदीचा देश म्हणून पुढे येताना दिसेल. भारताने हे साध्य केले ते गेल्या राजकीय स्थैर्यामुळे आणि योग्य निर्णयामुळे. आशियाचे नेतृत्व करण्याची क्षमता आज भारतात आहे आणि आशियाई देशांनाही भारताने त्यांचे नेतृत्व करावे असे वाटते, यात सगळे आले.