लंडन: माध्यमांच्या वाढत्या स्पर्धेत सतत अग्रेसर राहण्याच्या प्रयत्नात बीबीसी या वृत्तसंस्थेकडून वारंवार आगळीक केली जात आहे. देशांतर्गत तसेच परदेशातही बीबीसीची झपाट्याने घसरत असल्याने त्यावर उपाययोजना करण्याऐवजी बीबीसीने वादग्रस्त विषयांना मुद्दामच हाती घेतले आहे. त्यामुळे बीबीसीला तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे.
गुजरात दंगलीवर आधारित लघूपट वादग्रस्त ठरल्यानंतर बीबीसीचा जिहादी ब्राईडवर आधारीत आणखी एक लघूपट वादात सापडला आहे. या लघूपटाला इंग्लंमध्ये तीव्र विरोध होत आहे. बीबीसीने प्रदर्शित केलेली ‘इंडिया-द मोदी क्वेश्चन’ या लघुपटामुळे उठलेले वादळ शमत नाही तोच बीबीसीने आणखी एक वादग्रस्त लघुपट आणला आहे. ‘द शमीमा बेगम स्टोरी’ या नावाने प्रदर्शित करण्यात आलेल्या या लघुपटाला इंग्लडमध्येच विरोधाचा सामना करावा लागत आहे.
जिहादी ब्राईड या नावाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शमीमा बेगमवर हा लघूपट चित्रित केलेला आहे. शमीमा १५ व्या वर्षी इंग्लंड मधील तिच्या घरातून पळून जात सीरियामधील इस्लामिक स्टेट या संघटनेत सहभागी झाली होती. सीरियात असताना तिला जिहादी ब्राईड या नावाने ओळखले जात होते. शमीमा आता २३ वर्षांची असून सीरिया आणि इस्लामिक स्टेटमधून बाहेर पडण्याचा तिचा संघर्ष सांगण्याचा तिचा प्रयत्न आहे. बीबीसीच्या लघुपटातून शमीमाबद्दल सहानुभूती दाखविण्याचा हा प्रकार असल्याने त्या विरोधात इंग्लंडमध्ये संताप व्यक्त होत असून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
‘द शमीमा बेगम स्टोरी’ हा ९० मिनिटांचा लघुपट बीबीसीने प्रदर्शित केला आहे. इंग्लंड ते सीरिया पर्यंतचा शमीमाचा प्रवास कसा होता? यावर हा लघुपट आधारीत असून त्यातून बाहेर पडण्याच्या तिच्या संघर्षाबाबत माहिती देण्यात आली आहे. सीरियामध्ये जाण्याच्या निर्णयाचे शमीमाला दुःख वाटत असून त्याचा तिला पश्चाताप होत आहे, असे कथानक यात असल्यामुळे इंग्लंडचे नागरिक नाराज आहेत.