(संमेलनाध्यक्ष मुकादम यांची पुस्तकावर सही घेताना)
दोन दिवसांच्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या वगाचा ओझरता आढावा या लेखात घेतला आहे. वाचकांनी त्यावरून मुस्लीम मराठी साहित्याकारांच्या मनात डोकावण्याची संधी घ्यावी. मी तर म्हणेन की दोन समाजांमधील वैचारिक दुरी कमी करण्यासाठी हिंदूंनी मराठी मुस्लीम संमेलनांना उपस्थित राहावे.
लोकनाट्यात तमाशा, लळित, दशावतारी इ. अनेक प्रकार आहेत. कोकणात दशावतारी, तर देशावर तमाशा हे अधिक चालतात. तमाशात दोन भाग असतात. पहिला भाग निव्वळ करमणुकीचा असतो. त्यात समाजात प्रतिष्ठित समजल्या जाणार्यांच्या हसत खेळत टोप्या उडवणे, त्यांची वैगुण्ये समोर आणणे आणि त्यातून त्यांना हटवादीपणाची जाणीव करून देणे, असा भाग असतो. उत्तर भागात त्याच पद्धतीने सामाजिक प्रश्नाला धरून कथा गुंफलेली असते. त्याला ‘वग’ म्हणतात. एकंदरच या लोकनाट्यांचे पारंपरिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ठरलेली संहिता नसे. वेळेवर स्थलकाल परिस्थितीनुरूप मसाला घालत संवादांचा प्रवाह अगदी पहाटेपर्यंत सुरू राही.
संस्कृत नाटकांमध्ये सूत्रबद्ध संवाद, सुभाषिते अगदी आद्य नाट्यकार भासापासून ठरलेले आणि शेकडो वर्षे परंपरेने जपलेले आहेत. तो प्रकार लोकनाट्यात नव्हता. एक प्रकारे मूळसूत्रानुरूप कथानक गुंफण्याची प्रथा केवळ भारतातच नव्हे, तर इतरत्रही होती आणि आहे. कथानक बहुतांश वेळी अन्यायाशी झगडा, प्रतिकार यावर आधारलेले असते. बहुतांश वेळी त्याचा शेवट सुखांत दाखवण्याची प्रथा आहे. यातील नायक नेहमी बळीचे बक्रे दाखविलेले असतात. त्याला इंग्रजीत चपखल शब्द 'victim card‘ खेळवणारे असतात. या संमेलनात मला ‘बळीचे बकरे हे कथानक दोन-तीन सन्माननीय अपवाद सोडले, तर सर्व वक्ते आळवताना दिसले.
मुस्लिमांचे जागतिक रडगाणे
आमच्यावर इतर जग अन्याय करते आहे, आम्ही मुस्लिमेतरांच्या मुस्लीमघृणेचे ‘"Islamophobia' आहोत, हे रडगाणे जागतिक स्तरावर मुस्लीम समाज आळवताना दिसतो. त्यातूनच अतिरेकी कारवाया करण्याला प्रोत्साहन मिळते. घुसखोरी करून पाश्चात्य देशांमधून स्थिरावलेले, तेथील सोईसुविधांचा हक्काने उपभोग घेणारे मुस्लीम त्याच देशांतील नागरिकांवर हल्ले करतात, अतिरेकी कारवाया करतात हे नेहमीच आपण पाहतो. वर ते जगभर मुस्लीमघृणेचे "Islamophobia" रडगाणे गातात. त्याला भारतातील मुस्लीम अपवाद नाहीत. इथेही संसदेपासून तो साहित्य संमेलनापर्यंत तेच रडगाणे उगाळले जाते. संसदेत ‘एआयएमआयएम’चे ओवेसी तर साहित्य संमेलनात त्याच पक्षाचे जावेद पाशा कुरेशी तेच रडगाणे आळवत होते. कुरेशींच्या पहिल्या दिवशीच्या तथाकथित ऐतिहासिक आढावा घेणार्या भाषणाचे कळसूत्र अन्याय-अन्याय आणि त्याला फोडणी ब्राह्मणवादाची होती. बहुतांश वक्तेही त्याला अपवाद नव्हते. अध्यक्ष तरी अपवाद कसे असतील?
एका मराठी दैनिकाच्या रविवार, दि. २९ जानेवारी रोजी संमेलनाच्या बातमीचा मथळा ‘मराठी साहित्यात मुस्लिमांवर अन्याय‘ आणि आणि दुसर्या एका दैनिकाचा मथळा - ‘मुस्लिमांची मराठी साहित्यात होणारी उपेक्षा थांबायला हवी‘ त्याचे प्रतिबिंब होते. कोकणातून आलेल्या साहित्यिकांना वगळले जाते, अशी कैफियत एका वक्त्याने संमेलनात मांडली. याला जबाबदार कोण?अध्यक्ष मुकादमांनी समारोपाच्या भाषणात मुस्लीम समाजाचा उल्लेख ‘साहित्यक्षेत्रातील लहान भाऊ‘ असा करून मोठ्या भावाने मन मोठे करून मराठी साहित्य संमेलनात जागा द्यावी, असे आवाहन केले. पण, लहान भावाने वेगळी चूल मांडून ठेवली आहे; तो जुळवून घ्यायला तयार नाही. हे अगदी शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यापासून जाणवत होते. त्यातील ‘अच्छे दिन‘, ‘जनता का नसिब‘ आणि मी लक्ष्य देऊन ऐकताना मराठीतील एकही रचना सादर न होणे, मुस्लीम संतांच्या रचना तर दूरच राहिल्या. हे कसले लक्षण समजावे? ‘लहान भाऊ‘ म्हणवून घेण्यात मला मानभावीपणा दिसला. वाटा मागायला तयार, पण जुळवून घेणार नाही, ही वृत्ती.
(कवी साहील कबीर यांच्या सोबत सुसंवाद)
नव्या कथानकांचा तोंडवळा
हे साहित्य संमेलन होते. त्या अनुषंगाने मराठी मुस्लीम साहित्यिकांना साहित्य प्रसविण्यासाठी त्या दरम्यान एक कथानक सहज उपलब्ध झाले. त्याच आठवड्यात आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांनी ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत बालविवाह करणार्यांवर कायदेशीर कारवाई सुरू केली होती. त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. ज्यांना अटक झाली, त्यांची बायकापोरे आता आमचे वाली कोण; आम्हाला नवरे सुटून येईपर्यंत सरकारने सांभाळावे, या मागणीसाठी रस्त्यावर येत आहेत. त्यांच्या कळवळ्याने विशेष करून अनेक इंग्रजी वृत्तपत्रे त्यांची छायाचित्रे ठळकपणे छापत आहेत (इंडि. एक्स. ५ फेब्रु.) त्या बिचार्या महिलांचे दु:ख साहित्य प्रकारात मांडण्याची ऊर्मी आता समस्त मुस्लीम साहित्यिकांना येईल. ते कथा, कविता, नाटक, पथनाट्ये या माध्यमांमधून आपल्या भावनांना वाट करून देतील. त्यात केंद्र सरकारचा मुस्लिमांप्रती दुटप्पी चेहरामोहरा, स्थानिक पातळीवर हडेलहप्पी करणारा हिंदू अधिकारी असा सर्व मसाला अपेक्षित करायला हरकत नाही. काही प्रश्न आहेत. त्या कुटुंबाने मुलीच्या लग्नाला मान्यता देताना, तिचा कुटुंबात समावेश करताना, कायद्याने अजाण असताना ‘कुबूल-कुबूल‘ म्हणवून संमतीचे नाटक करताना ‘पोक्सो’ कायद्याचा विचार का केला नाही?
निकाहचे हे बेकायदेशीर कृत्य घडवून आणण्यात त्यांचा समावेश नव्हता? कालबाह्य आणि कायदाबाह्य ठरलेली रीति लक्षात आली नव्हती? अशी आलेली बालवधू घरात चाकरी करायलाच येते. तिचा नवरा पकडला गेल्यावर कुटुंब असूनही कशी रस्त्यावर येते? किंवा रस्त्यावर येण्याचे सोंग वठविण्याची तिच्यावर सक्ती केली जाते. कौटुंबिक दुर्लक्षाची किंमत शासकीय मदतीच्या माध्यमातून बहुसंख्यांनी का उचलावी? की त्यावेळी काफिरांचा पैसा चालतो? तसा तो हज ‘सबसिडी’ला चालत होता. ‘वक्फ’ बोर्डाच्या अधिपत्याखाली करोडो एकर जमिनी आहेत. त्यावर स्थानिक पातळीवरयेणारे उत्पन्न कोण हडप करते? "AIMPLB' या अखिल भारतीय मुस्लीम संस्थेचा महिला विभाग त्या महिलांच्या मदतीसाठी पुढे येता येत नाही? जर मराठी मुस्लीम साहित्यिकांना या बालविवाहच्या प्रथेला बळी पडलेल्या मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडणारे साहित्य निर्माण करायचे असेल, तर त्यांनी या धर्माधिष्ठित प्रथेविरोधात, त्याला सहमती देणार्या कौटुंबिक व्यवहाराला, ‘वक्फ’ बोर्डांच्या बेजबाबदारपणा उघडे पाडणारे साहित्य प्रसवावे. ते होणार नाही याची मला खात्री आहे.
बळीच्या बकर्याचे रडगाणे उगाळणारे आत्मवंचनेतून आत्मपरीक्षण करण्यास धजावत नाहीत. माझ्या ‘"KAFIROPHOBIA' वरील पुस्तकाला हातात धरण्यास न धजावणारे साहित्यिक असे चित्रण करू शकणार नाहीत. या उलट हिंदूंना ‘खलनायक‘ ठरवून मुस्लीम नायकांना ‘आदर्श‘ म्हणून रंगविण्याचे काम हिंदी सिनेसृष्टी गेली अनेक दशके करते आहे. ‘चक दे इंडिया’ या चित्रपटाचा नायक आणि त्या चमूचे वास्तविक प्रशिक्षक मुळात एक हिंदू, श्रीमीर रंजन नेगी होते. त्यांच्या जागी कबीर खान हे पात्र दाखवून देशभक्तीचा मुलामा त्या मुस्लीम पात्रावर चढविण्याचे अश्लाघ्य कथाचौर्य करण्यात आले, अशी अनेक उदाहरणे देता येतील. समाजात घडणार्या घटनांना मराठी मुस्लीम साहित्यिक कसे रंगवतात, ते यापुढे लक्षात येईल.
काही विषयांचा कानोसा
एक तक्रार अशी होती की, मुस्लीम समाजाची दुरवस्था मांडणारे साहित्य कमी आहे. त्या दुरवस्थेचे कारण स्वत: मुस्लीम समाजच आहे, हे स्पष्टपणे मांडण्याचा धीर साहित्यिक ऊर्मी असणारे मांडू शकत नसतील. त्याचा विचार या पूर्वीच्या लेखांत मांडला आहे. हसन मुजावर, जे या संमेलनाचे कार्याध्यक्ष होते आणि जे व्यवसायाने बिल्डर आहेत, अशी माहिती दिली गेली, त्यांनी संमेलनाच्या प्रारंभीच सबुरीचा सल्ला दिला की, कोणावरही व्यक्तिगत टीका करू नये आणि मुस्लिमांचे प्रश्न वाढतील, असे निर्देश टाळावे. श्रीराम आणि ह. सादिक शहाच्यामुळे पावन झालेली असा नाशिकचा उल्लेख त्यांनी केला. हे शहाणपण अनेकांना दाखवता आले नाही. मुस्लिमांना आर्थिक प्रगतीसाठी मराठी चांगले समजणे आणि बोलण्याची आवश्यकता आहे, हे त्यांनी सांगितल्याने चांगले झाले. ओढूनताणून मोडक्यातोडक्या हिंदीत बोलणारे मुस्लीम दूर टाकले गेले, तर तो दोष कोणाचा? एक अनपेक्षित ऐकायला मिळाले. माझी नोंद बरोबर असल्यास हसन यांनी इस्रायलची चक्क वाखाणणी केली. आजची इस्रायलने मिळवलेली बलवान स्थिती मेहनत करून मिळविल्याचे सांगितले. ते बोलून तर गेले, पण त्यांना समाजातील मुखंडांचा रोष आता पत्करावा लागत असेल, तर नवल नाही.
हुसेन दलवाईंनी मुस्लीम नेते समाजाचे खरे प्रश्न उठवत नाहीत, असा त्यांनी आरोप केला. आता नेते त्यांच्या सारख्यांना म्हणावे की समाजाला वेठीस धरलेल्या कठमुल्लांना म्हणावे? त्यांनी सामाजिक व्यवहाराचा उपदेश दिला. ‘ळ‘ उच्चारता येत नाही याची कमतरता अथवा दु:ख मानू नये. दलित साहित्याने सामाजिक अन्यायाला वाचा फोडली. त्यांच्यापेक्षा मुस्लीम समाज अधिक पिडला आहे. हे तेच ‘VICTIM CARD' खेळणे होते. दलवाईंनी भाषणाचा समारोप करताना मौ. अबुल कलम आझादांचा किस्सा सांगितला. आझाद काँग्रेसमध्ये होते म्हणून त्यांना बहुतांश मुस्लीम समाजाने वाळीत टाकले. ते समाजात एकटे पडले होते. त्याबाबत विचारले असता, आझाद म्हणाले की, “अक्लमंद तो अकेला होता हैं, भिड तो भेडियों के पिछे होती हैं.’ अगदी तसेच घडले. थोड्याच काळात मुहाजिरांची पाकिस्तानातील स्थिती तशीच झाली. आता तर अख्खे पाकिस्तान भिकेला लागले आहे. आता भारतातील मुस्लीम पाकिस्तान जिंकल्यावर फटाके फोडत नाहीत. ‘आम्ही इथलेच आहोत‘ हे ओरडून सांगतात. रझाकारांची पार्श्वभूमी असलेला ओवेसी प्रत्येक भाषणात तेच रडतो-ओरडतो.
अध्यक्ष मुकादमांनी सांगितले की, मार्क्सची अर्थशास्त्रीय प्रेरणा पैगंबरांच्या अर्थशास्त्रीय विचारात होती. त्यांची ‘री’ इतर एक दोन वक्त्यांनी ओढली. बिचारा मार्क्स कबरीत वळवळला असेल (Turned in his grave). मार्क्सने व्याज रहित आर्थिक व्यवस्थेचा उल्लेख वाचल्याचे मला आठवत नाही. मार्क्सचा पैगंबरांना जोडणारा तो उल्लेख म्या अज्ञान्याला खरच दाखवावा, अन्यथा मी वगाचा उल्लेख केला आहे, त्यात अशी विधाने चपखल बसतात. इस्लामच्या अभ्यासातून जगाचा उद्धार करण्याची हाळी एका वक्त्याने दिली. सीरिया, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान या सर्व देशांमधून इस्लामचा सखोल अभ्यास होत नाही? आपल्याच औरंगाबादचे असलेले अबुल आला मौदुदी इस्लामच्या सखोल ज्ञानभंडारासह पाकिस्तानात गेले. तिथे त्यांनी ‘जमात-ए-इस्लामी’ची चळवळ सुरू केली. अनेक पाकिस्तानी विचारवंत पाकिस्तानच्या आजच्या दिनवाण्या आणि अतिरेक्यांनी पिडलेल्या स्थितीसाठी मौदुदींना जबाबदार धरतात.
संस्कृत नाटकांवर मल्लिनाथी
मुस्तहिद खान यांनी एक शोध लावला की, ‘सांस्कृतिक दहशतवाद‘ राजकीय परिप्रेक्षातून उभा करण्यात आला. भारतात राजकीय सत्ता क्षत्रीयांच्या हातात होती. मी त्यात भर टाकतो. चिनी प्रवासी ह्युएनत्संग त्याच्या प्रवासवर्णनाप्रमाणे पश्चिम आणि उत्तरेत अनेक ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र राजे होते (Cultural History of Kapisha and Gandhara by Nilima Sengupta, १९८४, P ७५). तेव्हा, पुष्यमित्र आणि आता पेशवे ही त्यातील घासून गुळमुळीत झालेली नाणी आहेत. असे जर असेल तर ‘सांस्कृतिक दहशतवाद‘ प्रमुख्याने गैर-ब्राह्मण राज्यकर्त्यांनी उभा केला आणि पोसला. तो ब्राह्मणवाद कसा? मुस्तहिद यांनी असेही तारे तोडले की, मुळात संस्कृत नाटक नव्हते. ते इंग्रजी राज्यकर्त्यांनी संस्कृतात भाषांतर करवून घेतले. कोण संस्कृत बोलत होते, यावरही ते बोलले. तो वेगळाच विषय आहे. संस्कृत नाटकांचे मूळ म्हणता येतील अशी अनेक संवादसूक्ते ऋग्वेद संहितेत येतात. त्यांची माहिती मुस्तहिद खान यांना असण्याची शक्यता मला कमी वाटते. अर्धवट ठोकून देण्याची सोय वगांसारख्या हलक्याफुलक्या मनोरंजन प्रकारात श्रोत्यांना चालून गेली.
अली निजामुद्दीन, पुण्याचा ‘पीएच.डी’ विद्यार्थी, संशोधकाच्या दृष्टीतून विचार करणारा वाटला. त्याने मुस्लिमांमधील अश्रफांवर (उच्चवर्णीयांवर) कोरडे ओढले. अश्रफांना आरक्षण सरसकट मिळू नये; त्यांनीच अस्तित्त्वात नसलेली ‘पॅनइस्लामिझम’ची संकल्पना भारतातील मुस्लिमांवर लादली, त्यातून मुस्लिमांच्या मुळाशी आलेला अलगाववादअस्तित्त्वात आला, असे परखड बोल त्याने सुनावले. अन्वर राजन यांनी त्यांच्याच बाबतीत घडलेली घटना सांगितली. त्यांच्यासारख्या स्वतंत्र विचार करणार्याचे नाव समारंभाचे अध्यक्ष म्हणूल नाकारले गेले. त्यामागे धार्मिक चौकटीत जखडलेले काही हटवादी मुस्लीम होते, याची माहिती दिली.
दोन दिवसांच्या वगाचा हा ओझरता आढावा आहे. वाचकांनी त्यावरून मुस्लीम मराठी साहित्याकारांच्या मनात डोकावण्याची संधी घ्यावी. मी तर म्हणेन की दोन समाजांमधील वैचारिक दुरी कमी करण्यासाठी हिंदूंनी मराठी मुस्लीम संमेलनांना उपस्थित राहावे. कारण तेथे आपल्या मातृभाषेत, मराठीत चिंतन आणि विचार प्रकटन होते.
-डॉ. प्रमोद पाठक