भरड धान्याला जागतिक मानांकन

    10-Feb-2023   
Total Views |
World ranking of coarse grains

भारतीय आपल्या अन्नात हवी तितकी कडधान्ये खात नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने हा विषय आता गांभीर्याने घेतला आहे. देशाची कडधान्य बाजार पेठ येत्या तीन वर्षात २५ अब्ज अमेरिकन डॉलरचे लक्ष्य गाठणार आहे. त्याविषयी केलेला ऊहापोह...


शाश्वत कडधान्य क्षेत्राची आंतरराष्ट्रीय बैठक मुंबईत

भारताची कडधान्य बाजार पेठ २०२६ पर्यंत २५ अब्ज अमेरिकन डॉलरचे लक्ष्य गाठणार असून २०३० पर्यंत मागणी ३३-३५ दशलक्ष टनापर्यंत जाण्याची शक्यता नोंदविली जात आहे. भारतीय कडधान्ये आणि धान्य क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्याचा आणि भारताची अन्न आणि पोषण सुरक्षा प्रगत करण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल म्हणून, ‘इंडिया पल्सेस अ‍ॅण्ड ग्रेन्स असोसिएशन’च्यावतीने मुंबईत दि. १६ ते १ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसांचे ‘मेगा ग्लोबल सेमिनार’- ‘दि पल्सेस कॉन्क्लेव्ह २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे.

या महत्त्वाच्या क्षेत्रातील शाश्वत आणि तांत्रिक प्रगतीचे महत्त्व लक्षात घेऊन प्रमोशनल एजन्सी, संशोधन करणारे शास्त्रज्ञ, अन्नतंत्रज्ञ, प्रक्रिया कंपन्या, मूल्यशृंखला सहभागीदार, सेवा पुरवठादार व संबंधित घटकांसह जगभरातील प्रमुख भागधारकांची सद्य:स्थिती, भविष्यातील ट्रेंड, व्यापार धोरणे यावर सखोल चर्चा या सेमिनारमध्ये अपेक्षित आहे. भारतीय आपल्या अन्नात हवी तितकी कडधान्ये खात नाहीत. त्यामुळे भारत सरकारने हा विषय आता गांभीर्याने घेतला आहे.
 
‘प्लस कॉन्क्लेव्ह २०२३’ केवळ नवीन उत्पादने, प्रक्रिया आणि उपकरणे यांचे केवळ सादरीकरण करणार नाही, तर २०हून अधिक देशांतील शंभरहून अधिक प्रतिनिधींना एकत्र आणून ज्ञानाची देवाणघेवाण आणि ‘नेटवर्किंग’ची मोठी संधीसुद्धा निर्माण होणार आहे. भारतात डाळींचे जगातील सर्वात मोठे क्षेत्र आहे आणि भारत विविध प्रकारच्या डाळींचा जगातील सर्वात मोठा उत्पादक, प्रक्रियाकर्ता व ग्राहक आहे. कॅनडाच्या सास्काचेवान प्रांताचे कृषिमंत्री डेव्हिड मेरीट त्यांच्या शिष्टमंडळासह या ‘कॉन्क्लेव्ह’ मध्येसक्रियपणे सहभागी होणार आहेत. याशिवाय भारत ज्या देशांसोबत व्यापार करतो, त्या देशांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.कडधान्यांच्या मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये अद्वितीय वाढीची क्षमता आहे. याचा उपयोग भारतात करुन शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविता येईल, तसेच पोषणसुरक्षा वाढविता येईल. अनेकांसाठी कडधान्य हे प्रमुख अन्न तर आहेच; शिवाय अन्नप्रक्रिया उद्योगांत यांचा उपयोग होतो.
  
कडधान्यांचा उपयोग सूप, सॉस, बेकरी उत्पादने, जेवण, अल्पोपाहार तसेच ‘कन्फेक्शनरी’ उत्पादने तयार करण्यासाठी होतो. या सेमिनारमध्ये चर्चेसाठीमहत्त्वाचा विषय असणार आहे, तो म्हणजे कडधान्यांपासून तयार होणारी वनस्पतीआधारित अन्य उत्पादने, हे उद्योन्मुख क्षेत्र आहे. यात वेगाने वाढ होण्याची क्षमता आहे. वनस्पतीआधारित अन्नउद्योग देशाच्या कृषी अर्थव्यस्थेला चालना देईल व लोकसंख्येच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यास मदत करेल. तसेच जागतिक हवामान बदलाशी लढण्यास मदत करेल.कडधान्ये आणि धान्यउत्पादनावरील हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांना समोरे जाण्यासाठी मुख्य लक्ष्य म्हणून ‘सस्टेनेेबलिटी ऑफ पल्सेस सेक्टर’ कडधान्य क्षेत्राची शाश्वतता संकल्पना आहे.

संयुक्त राष्ट्रातर्फे २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष ‘इंटरनॅशनल मिलेट्स इअर’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ‘मिलेट्स’ ही तृणधान्येच आहेत, पण सर्व तृणधान्ये ‘मिलेट्स’ नसतात. तृणधान्यांचे ‘सिरिअल्स’ आणि ‘मिलेट्स’ असे दोन प्रकार आहेत. ‘सिरिअल्स’मध्ये गहू, तांदूळ, ओट, मका, बार्ली या मोठ्या तृणधान्यांचा, तर ‘मिलेट्स’मध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी,वरी या छोट्या तृणधान्यांचा समावेश होतो. ‘मिलेट्स’ना भरडधान्ये म्हटले जाते. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वीच्या आदिमानवाने शेतीचा शोध लावला. काही गवतांचे बी खाण्यायोग्य आहे, हे ओळखून त्याची लागवड सुरु केली. धान्याचा दाणा जितका लहान, तितके त्यात तंतुमय पदार्थ फाबर आणि ब जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त. भरड धान्यात खनिजे व प्रथिनांचे प्रमाणही जास्त असते.

भरड धान्ये कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगली वाढतात आणि त्यांना पाणीही कमी लागते. ६० ते ८० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मुख्यत: ज्वारी आणि बाजरी ही पिके घेतली जात होती. पुण्यात बाजरीची, तर कोल्हापूर-सोलापूर मध्ये ज्वारीची भाकरी हेच मुख्य धान्य जेवणात असते. राजगिरा आणि बटू ही भरडधान्ये मात्र तृणधान्ये नसून ती द्विदल धान्ये आहेत. त्यातील बटू हे धान्य मुख्यत: उत्तर भारतात त्यातही हिमालय परिसरात जास्त पिकते. नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात काही ठिकाणी हे पीक घेतले जाते.पंतप्रधान मोदी यांनी भरडधान्याचे महत्त्व जगाला पटवून दिले. म्हणूनच हे वर्ष ‘भरड धान्य वर्ष’ म्हणून घोषित झाले.


World ranking of coarse grains

आता रेल्वेत भरड धान्याचे पदार्थ
 
चालू वर्ष हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर झाले असल्यामुळे रेल्वे गाड्यांत देण्यात येणार्‍या खाद्य पदार्थांमध्ये भरड धान्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय रेल्वे आणि ‘आयआरसीटीसी’ने घेतले आहे. याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी या ‘वंदे भारत एक्सप्रेस’मधून होणार आहे. ज्वारी, राजगिरा आणि नाचणीपासून तयार केलेले पदार्थ प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहेत. भरडधान्य किंवा ‘मिलेट्स’ ही कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीत येणारी पौष्टिक पिके आहेत. भारतात यांचे फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते आणि निर्यातही होते. भरड धान्याच्या जगातील एकूण उत्पादनांपैकी ४० टक्क्यांपेक्षा जास्त भरड धान्य हे भारतात पिकते. यांना फारशी निगा राखावी लागत नाही. यावर रोगही कमी पडतात, तसेच यांना पाणी व खते यांची गरजही कमी असते. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले जावे, यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये दिलेल्या प्रस्तावाला ७२ देशांनी पाठिंबा दिल्यानंतर युनायटेड नेशनने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले.

भारतीय भरडधान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने १६ आंतरराष्ट्रीय प्रदर्शन तसेच खरेदीदार-विक्रेता माध्यमातून निर्यातदार शेतकरी आणि व्यापार्‍यांचा सहभाग वाढविण्याच्या विविध योजना आखल्या आहेत. भरड धान्य नियमित पेरल्यामुळे जमिनीतील प्रमाण वाढून मातीचा पोत बर्‍यापैकी सुधारतो. ही धान्ये पाळीव तसेच मुक्त पशु-पक्ष्यांचे आवडते खाद्यपदार्थ असून यामुळे जैवविविधता वाढते. भरड धान्याचे अनेक प्रकार असून अंदाजे १६ प्रमुख प्रकारची भरड धान्ये ही भारतात पिकवली आणि निर्माण केली जातात. पोषक धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अपेडा कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण या मंत्रालयाच्या प्रमुख कृषी निर्यात प्रोत्साहन संस्थेच्या माध्यमातून भारतीय भरड धान्यांच्या निर्यातीला जगभरात अधिक प्रोतसाहन देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे व्यापक धोरण तयार केले आहे.

 २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारतातून ३४.३२ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किंमतीच्या भरड घान्यांची निर्यात झाले. भारतीय भरड घान्याचे ब्रॅण्डिंग आणि जाहिरात याची जबाबदारी परदेशातील भारतीय दूतवासांकडे देण्यात आली आहे. भारतात राजस्थान महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये भरड धान्यांचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र, देशातील एकूण भरड धान्य उत्पादनापैकी केवळ एक टक्का भरड धान्यांची निर्यात होते. केंद्र सरकारने बाजरी व अन्य धान्यांसह संभाव्य उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आणि पोषणमूल्य युक्त तृणधान्यांच्या पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्यासाठी ‘न्यूट्रीसिरियल्स’ निर्यात मंचाची स्थापना केली आहे.भारतातून युएई, नेपाळ, सौदी अरेबिया, लिबिया, ओमान, इजिप्त, ट्युनिशिया, येमेन, युके व युएसए या प्रमुख देशांमध्ये भरड धान्ये निर्यात होतात. यंदाचं वर्ष ‘भरड धान्य आंतरराष्ट्रीय वर्ष’ असावं हा आपल्या देशाचा प्रस्ताव जगाने मान्य केला असल्याने तो यशस्वी करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य बनते.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.