शिवरायांच्या आरमाराची शौर्यप्रेरणा आणि भारतीय नौदल दिनाचा दिमाखदार सोहळा

    09-Dec-2023   
Total Views |
Why Shivaji Maharaj and his Sindhudurg Fort were at the centre of Navy Day this year


ज्याचे सागरावरती अधिराज्य, तोच बलवान, ही उक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणली. त्यावेळी समुद्राकडून शत्रूचे धोके होते. जसे की जंजिर्‍याचा सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज आणि समुद्रामध्ये फिरणारे समुद्री चाचे. या धोक्याचे विश्लेषण करून छत्रपतींनी कोकणपट्टीच्या उथळ पाण्यामध्ये सक्षम असलेले नौदल तयार केले आणि समुद्रामध्ये सुद्धा गनिमी कावा वापरला. त्यांनी अनेक जलदुर्ग बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडवणार्‍या सिंधुदुर्ग किल्ल्यावर यंदाचा भारताचा ‘नौदल दिन’ साजरा झाला, हे औचित्यपूर्ण ठरले. त्यानिमित्ताने...


भारतीय सैन्य दलाचा स्थापना दिवस आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार, दिल्लीच्या बाहेर साजरे होत आहेत. यंदा प्रथमच दि. 15 जानेवारीला भारतीय सैन्याच्या स्थापना दिवस बंगळुरूमध्ये साजरा झाला. ऑक्टोबरमध्ये ’हवाई दल दिवस’ हा उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे पार पाडण्यात आला आणि या प्रथेस धरून नौदलाने कोकण किनारपट्टीवरती सिंधुदुर्ग मालवण किनारपट्टीची निवड केली.

किनारपट्टीवरील जनतेची नौदलाशी पुन्हा एकदा ओळख

अशा कार्यक्रमांमुळे किनारपट्टीवरती राहणार्‍या सामान्य जनतेला आपला ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा समजतो. किनारपट्टीला असलेल्यांना सागरी सुरक्षेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होते. आपल्यासमोर असलेल्या सागरी आव्हानांचा पुन्हा एकदा विचार केला जातो, आपल्या देशाकडे असलेली सागरी सुरक्षाच्या नौका व इतर साधने जनतेच्या समोर येतात आणि सर्वात महत्त्वाचे नौदलाचे अधिकारी आणि कर्मचारी हेसुद्धा जनतेमध्ये मिसळून विश्वास देतात की, सागरी सुरक्षेमध्ये सामान्य जनतेचा सहभागसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे.याआधी नौदल महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती मुंबईच्या बाहेर दिसलेले नव्हते. कुलाबामध्ये असलेल्या नौदलाच्या नगरीत जाण्याकरिता सुद्धा सोपे नव्हते. ’नौदल दिना’च्या निमित्ताने किनारपट्टीवरती असलेल्या जनतेची नौदलाशी पुन्हा एकदा ओळख झाली आहे.

सिंधुदुर्ग हे छत्रपती शिवरायांच्या सामर्थ्याचं प्रतीक

मालवण आणि तारकर्लीचा सुंदर समुद्र किनारा, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण आणि इथलं वातावरण हे भारतात नवा जोश निर्माण करणारा ठरलं. ’झुकू नका, थांबू नका, पुढे चाला’ हा मंत्र नौदलाने दिला. आज मी नौदलाच्या अधिकार्‍यांना नौदल दिवसाच्या शुभेच्छा देतो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली.“सिंधुदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ला पाहून, आपला उर अभिमानाने भरून येतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना आरमाराचं महत्त्व पटलं होतं. जो समुद्रावर नियंत्रण ठेवतो, त्याला सत्ता राखता येते, हे त्यांना माहीत होतं. हिरोजी इंदुलकर, कान्होजी आंग्रे या वीरांनाही मी वंदन करतो. छत्रपती शिवजी महाराजांची प्रेरणा घेऊन, गुलामीची मानसिकता सोडून भारत देश प्रगती करतो आहे,” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

भारताचा गौरवशाली इतिहास...

 
“मी स्वतःला भाग्यवान समजतो की, नौदलाच्या झेंड्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेशी जोडण्याची संधी मला मिळाली. आज एक आणखी घोषणा करायची आहे, भारतीय नौदल आता रँक्सची नावं आपल्या परंपरेप्रमाणे देणार आहे. नारीशक्तीची संख्या वाढवण्यावरही आपण भर देत आहोत. नेव्हल शिपमध्ये पहिल्या महिला कमांडिंग अधिकार्‍याची नियुक्ती झाली आहे. आजचा भारत हा आपल्यासाठी नवी लक्ष्यं ठरवतो आहे, ही खूप चांगली बाब आहे. आपल्या समुद्री सामर्थ्याचा इतिहास आहे. एक काळ असा होता की, सुरतच्या किनार्‍यावर 80 हून जास्त देशाची जहाजं असायची.


जेव्हा आपण समुद्रावरचं नियंत्रण घालवलं, तेव्हा आर्थिकदृष्ट्याही आपण कमकुवत झालो. आता आपल्या देशाला गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचं आहे,” असे प्रतिपादन नौदल दिना’च्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर बोलताना पंतप्रधानांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूमीत मराठ्यांचे आरमार उभारून, आपल्या दूरदृष्टीचा प्रत्यय दिला होता, त्या कोकण भूमीवर दि. 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदलाच्यावतीने ’नौदल दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदी यांनी सिंधुदुर्गच्या समुद्रकिनारी राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 43 फूट उंच पुतळ्याचे अनावरणदेखील केले.

कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गचीच निवड का?


भारतीय आरमार उभारणीतील छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान आणि त्यांच्या राज्याभिषेकाचे 350व्या वर्षाचे औचित्य साधून, यंदाचा ’नौदल दिन’ सिंधुदुर्ग येथे साजरा करण्यात आला. यासाठी नौदलाने अनेक जलदुर्गांची पाहणी केल्यानंतर, छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची निवड केली. सिंधुदुर्ग किल्ला भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाची साक्ष देतो. शिवछत्रपतींनी पायदळ व घोडदळाप्रमाणे मराठ्यांचे आरमार सुसज्ज करत स्वराज्य बळकट केले. सिद्दी, इंग्रज आणि पोर्तुगीजांना शह देण्यासाठी सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग असे अनेक जलदुर्ग उभारले. त्यांची उभारणी करताना शत्रूची जहाजे जलदुर्गाजवळ येण्यापूर्वीच क्षतिग्रस्त होतील, याची चोख व्यवस्था केली. जहाज बांधणीचे काम समांतरपणे हाती घेतले. गलबते, तोफा ठेवता येईल असे गुराब त्यांच्या आरमाराचा भाग होते. सैनिकांची वाहतूक करण्यासाठी तरांडी तर मालवाहतुकीसाठी शिबाड जहाज वापरली गेल्याचे उल्लेख आहेत. सुमारे 400 जहाजांच्या बळावर महाराजांनी कोकण किनारा आपल्या अधिपत्याखाली आणला.
 
भारतीय नौदल दरवर्षी दि. 4 डिसेंबर हा दिवस ’नौदल दिन’ म्हणून साजरा करते. 1971च्या युद्धात भारतीय युद्धनौकांनी थेट कराची बंदरावर हल्ला चढविला. अनेक पाकिस्तानी युद्धनौकांना जलसमाधी दिली. त्यांचे तेलसाठे उद्ध्वस्त झाले. कराची बंदर काही दिवस आगीच्या वेढ्यात सापडले होते. या प्रहाराने पाकिस्तान नौदलचे मनोधैर्य खच्ची झाले. या विजयाचे स्मरण हीच ’नौदल दिना’ची प्रेरणा.भारतीय सैन्य आंतरराष्ट्रीय सीमा, नियंत्रण रेषा ओलांडणार नाही, या सरकारच्या धोरणाने सैन्याची रणनीती सीमेपर्यंतच मर्यादित राहिली. 1971च्या युद्धात आक्रमक धोरण स्वीकारून भारतीय युद्धनौकांनी कराचीवर हल्ला केला, भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानात शिरून पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली.

नौदलाचा आधुनिकतेकडे प्रवास


नौदलाच्या ताफ्यात सध्या 132हून अधिक युद्धनौका व पाणबुड्या असून पुढील पाच वर्षांत त्यांची संख्या 200 वर नेण्याचे लक्ष्य आहे. सध्या नौदलात 143 विमाने आणि 130 हेलिकॉप्टर आहेत. देशात 43 जहाजे व पाणबुड्यांची बांधणी प्रगतिपथावर आहे. स्वदेशी बनावटीची 51 जहाजे, सहा पाणबुड्या व नौदलास उपयुक्त ठरणार्‍या 111 हेलिकॉप्टरच्या बांधणीला मान्यता मिळाली आहे. नौदलाकडे सद्यःस्थितीत रशियन बनावटीची ’आयएनएस विक्रमादित्य’ आणि स्वदेशी ’आयएनएस विक्रांत’ या दोन विमानवाहू युद्धनौका आहेत. यंदाच्या सोहळ्यात ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही विमानवाहू नौका ’आयएनएस कोलकाता’, ’आयएनएस कोची’, ’आयएनएस विशाखापट्टणम’, ’आयएनएस चेन्नई’, ’आयएनएस ब्रह्मपुत्रा’ अशा सुमारे 20 युद्धनौका, विनाशिका, ’मिग 29 के’, ’हॉक’, ’सीकिंग 42 बी’, ’एलसीए’ ही 40 विमाने, ’चेतक’, ’एएलएच ध्रुव’, ’कामोव्ह’ व बहुउद्देशीय ’एमएच-60 रोमिओ’ या हेलिकॉप्टचर्सचा ताफा उपस्थित होता. युद्धनौका व विमानांची प्रात्यक्षिके, नौदल बॅण्ड, राष्ट्रीय छात्र सेना पथकाचे (एनसीसी) हॉर्न पाईप नृत्य, सिंधुदुर्ग किल्ल्यावर लेझर शो असे दिमाखदार कार्यक्रम यंदा नौदल दिनानिमित्त संपन्न झाले.
 
सागरीसुरक्षेच्या दृष्टीने किनारी गावांमध्ये सजगता, जबाबदारीची जाणीव


छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्ताने भारतीय नौदलाला कोकण किनारपट्टीचे स्मरण झाले, ही स्वागताची बाब आहे. एरव्ही मुंबईतील नौदलाचा पश्चिम कमांडचा तळ हीच काय ती नौदलसामर्थ्याची चिन्हे भूमीवर दिसतात. महाराष्ट्रातील आरमारी व जलवाहतुकीचा इतिहास, किनारी लोकजीवन ही सर्व पार्श्वभूमी असूनही नौदल, तटरक्षक दल यातील करिअर वाढीस लागावे, नौदलाच्या इतिहासाकडे कुणी मागे वळून पाहावे किंवा नौदल सामर्थ्याचे आकलन करून घ्यावे, अशी प्रतीके आपण किनारपट्टीवर उभी केलेली नाहीत.नौदलाच्या ध्वजामध्ये शिवरायांची अष्टकोनी मुद्रा चिन्हांकित झाल्यानंतर तरी आता किनारपट्टीवर असे काही प्रयत्न सुरू होतील, अशी आशा करुया. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने किनारी गावांमध्ये सजगता व जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि तरुणांना सागरी क्षेत्रातील करिअरच्या नव्या वाटांची ओळख करून देणे, असे उद्दिष्टही यामागे हवे.

(नि.) ब्रि. हेमंत महाजन


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.