नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट (इसिस) दहशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकांनी शनिवारी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ४४ ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रातील पुणे, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर आणि मीरा भाईंदर येथे छापे टाकण्यात आले आहेत.
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छापेमारीमध्ये आंतरराष्ट्रीय धागेदोरे आणि परदेशातील-इसिस कार्यकर्त्यांच्या सहभागासह एक मोठा कट उघड केला आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकातील 1, पुण्यातील 2, ठाणे ग्रामीणमध्ये 31, ठाणे शहरातील 9 आणि भाईंदरमधील एका ठिकाणी छापे टाकले. यामध्ये एनआयएने 13 जणांना अटकही केली आहे.
इसिस मॉड्यूल देशभरात पसरविण्याचा प्रयत्न सुरू असून प्रामुख्याने त्याचे जाळे महाराष्ट्रात पसरले आहे. याआधीही महाराष्ट्रात अशा प्रकारचे जाळे उघडकीस आले आहेत. तरुणांना फूस लावून त्यांना कट्टरपंथी बनवण्यासाठी या मॉड्यूल्समध्ये काही काम करण्यात आले आहे का, याचीही माहिती एनआयए गोळा करत आहे.