हिंदू संघटक नेने काका

    09-Dec-2023
Total Views | 94
Article on RSS Activist Anil Nene

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अनिल नेने यांना दि. २४ नोव्हेंबर रोजी बँकॉक येथे देवाज्ञा झाली. आज दि. १० डिसेंबर पुण्यात त्यांच्या स्नेही आणि निकटवर्तीयांनी स्मरणांजली कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांचा दीर्घकाळ सहवास लाभलेले प्रसिद्ध अभिनेते, संवादक, निवेदक आणि व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी नेने काकांच्या जागविलेल्या या आठवणी...

अनिल नेने (काका) गेलेत, हे आमच्यासाठी खूपच धक्कादायक. केवळ आमच्यासाठी नव्हे, तर समस्त हिंदूंसाठी त्यांचे नसणे एक अपरिमित हानी आहे. अचाट आणि विस्मयकारक तसेच प्रचंड जनसंपर्क असलेला, अमाप उत्साह असलेला हा माणूस म्हणजे माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी घरातील एक सदस्यच होता. ते आणखी जगायला हवे होते, आमच्यासाठी नव्हे या समाजाचे भले होण्यासाठी. नेने काका म्हणजे निस्सीम सावरकर भक्त, कट्टर हिंदुत्ववादी आणि जगभरात मराठी माणसांना एकत्र ठेवण्यासाठी अहोरात्र, अविरत कार्य करणारा व्यक्ती म्हणूनच मला ते कायम स्मरणात राहतील. मला काका नाहीत, त्यांनी मला पुतण्या मानले आणि तसेच जीवापाड प्रेम केले; मात्र माझ्या कौटुंबिक संबंधांशिवाय त्यांचं जे नातं जुळलं, तेच मुळी समविचारी पातळ्यांवर.
 
इतिहासाची आवड जोपासताना, आपल्या क्रांतिकारकांचा खरा इतिहास पुढील पिढ्यांना कळावा, यासाठी ते सातत्याने आग्रही असत. त्यांची व्याख्याने याच विषयांवर अधिक होत असत. लंडनमधून भारतात येण्याआधीच ‘मला ते तुझी आगामी चार महिन्यांत कोठे कोठे व्याख्याने, कार्यक्रम आहेत ते कळव, म्हणजे मला त्यात कोणत्या वेळी हजर राहता येईल, याचे नियोजन करता येईल,’ अशी माहिती मागवून नियोजन करायचे. केवळ पुण्यातच नव्हे, तर जगभरातील मराठी माणूस, हिंदू माणूस त्यांनी जोडण्याचे कार्य केले. ते एक मोठे हिंदू संघटक होते. जेथे जातील, तेथे ओळखी करून घेणे, त्या लक्षात ठेवणे, त्यांनी दिलेल्या माहितीचा संग्रह करून ठेवणे, मग त्याचा उपयोग जेथे शक्य आहे, तेथे सगळ्यांच्या हितासाठी करणे, असा अलिखित नियम करणारा आणि ते सातत्य ठेवणारा हा माणूस म्हणजे माझ्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठी आदर्शच होता. युरोपियन देशात स्थापन झालेल्या महाराष्ट्रीयन मंडळात काकांनी जगभरातील माणसांना एकत्र आणण्याचे केलेले कार्य कुणीच विसरू शकणार नाही.

पुण्याशी त्यांचं नातं हे अगदी बालवयापासूनचं. सदाशिव पेठेत राष्ट्रीय स्वयंसवेक संघाच्या वातावरणात रमलेल्या काकांनी ’एनडीए’त जाण्याचे स्वप्न विरल्यावर, ‘गोखले इन्स्टिट्यूट’मधून अर्थशास्त्राचा अभ्यास करून चरितार्थाची वाटचाल सुरू केली. मात्र, हे सुरू असताना आपली सैनिकी क्षेत्रातील आवड सोडली नाही. त्यांनी अनेक मित्र, स्नेही या क्षेत्रात जोडले आणि त्यांच्या शौर्यगाथा लोकांपर्यंत नेल्या, तसे नियोजनही करून ठेवले. लंडनमधील अर्थविषयक संस्थांमध्ये ४५ वर्षे कार्य करून त्यांनी हिंदुत्व, सावरकर आणि जगात जेथे मराठी माणूस आहे, त्याच्यासाठी आपल्या भारतीय संस्कृती, परंपरा, इतिहास यांवर या विषयासोबतच ऐतिहासिक घटनांवर, हिंदुत्वावर बदलत्या काळातील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळापर्यंत बदलत चाललेला आणि हिंदुत्वाला उजळत ठेवणारा भारत येथपर्यंत सातत्याने प्रबोधन केले. त्यांनी अनेक संस्थांसाठी लोकोपयोगी कामे केलीत. पुण्यातील त्यांचे दरवर्षी हिवाळ्यातील चार महिने म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन माहिती गोळा करण्याचा नेमच होता. यावर्षी देखील नेने काका-काकू दोघेही नुकतेच येथे आले होते. यावेळी ते नुकतेच अंदमान भेटीला जाऊन आले, त्यानंतर दोनच दिवसांनी बँकॅाकला जागतिक हिंदू परिषदेसाठी गेले, तेथूनच त्यांच्या निधनाचे वृत्त आले.

‘कोरोना’नंतर ते ‘युट्यूब’वरून वेगवेगळ्या क्रांतिकारकांचा इतिहास ते ऐकवित होते. अमोल सावरकर यांच्या विनंतीवरून त्यांनी हे कार्य केले. आता त्यावर आधारित पुस्तक ’तुजसाठी मरण ते जनन’ याचे प्रकाशन करण्याचे यावेळी ठरले होते. ते त्यांनी आधीच मला पाठवून दिले होते. “ते वाचून घे आणि तूच हा कार्यक्रम आयोजित करायचा,” असेही सांगितले होते. त्यासाठी भूषण गोखले, सच्चिदानंद शेवडे अशी मान्यवर मंडळीदेखील उपस्थित राहणार होती. मात्र, दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यामुळे आम्ही सर्वांनी आता येत्या १० तारखेला म्हणजे आज या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या स्मरणार्थ करण्याचे ठरविले.

हिंदुत्वासाठी काम करणार्‍या संस्थांना त्यांनी भरभरून देणगी दिली. ’भारत विद्या’ नावाचे जे भांडारकरचे व्यासपीठ आहे, त्याला पहिली देणगी देणारे नेने काकाच. जेव्हा त्यांना कळले, अशी संस्था निर्माण केली जात आहे, तेव्हा त्यांनी “राहुल, चल आपल्याला तेथे जायचे आहे, पहिली देणगी मी देणार.” आताही जेव्हा येथे आले, तेव्हा ते म्हणाले की, ”अरे राहुल, आपल्याला ’भारत विद्या’ला देणगी द्यायची आहे,” असे सांगितले होते. दरवर्षी दि. ३१ डिसेंबरला काकांचा वाढदिवस माझ्या घरी साजरा होत असे. आम्हाला त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळाही करायचा होता. दरवेळी माझ्या मुलाने आणलेला त्यांचा आवडता डार्क चॉकलेट केक ते कापायचे आणि आम्ही सर्व धमाल मस्ती करायचो, यावर्षीही ठरले होते. मात्र, आता शक्य नाही.
 
दि. १ मे रोजी इस्रायलमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी “राहुल, तू यंदा जायचे,” असे त्यांनी सांगितले होते. मात्र, कोरोनामुळे राहून गेले ते राहिलेच. शिवाय “ ‘आपलं घर’ ही संस्थादेखील बघायलादेखील जायचे आहे आणि मला देणगी द्यायची आहे,” असे ते म्हणाले होते. यावेळी नर्मदा परिक्रमा करायची, राम मंदिर बघायला अयोध्येत जायचे, असे त्यांचे नियोजन होते, ते आधीच त्यांनी मला कळवून ठेवले आणि तयारी करायला सांगितली. जगातील सर्वात आनंदी देश असलेल्या भूतानला जायचीदेखील त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता ते सर्व राहिले...“यावर्षी आपण गंगोत्रीला जाऊ, राहुल तुलाही यायचे आहे,” असे त्यांनी सांगितले होते. पण, कसले काय, काकांनी ती संधीच दिली नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी त्यांच्या अंत्यविधीच्या दिवशी त्यांच्या इच्छेनुसार इतर कोणतेही विधी न करता, त्यांच्या अस्थी गंगोत्री येथे मार्च महिन्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

मुळात मनसोक्त भटकणे आणि वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी माहिती संकलित करण्याचा, त्यांना जणू छंदच जडला होता. ’खावे त्यांच्या देशा’ हे असेच आपल्या भटकंतीवरील अप्रतिम पुस्तक त्यांनी लिहिले. वेगवेगळ्या देशांतील खाद्यपदार्थांची माहिती त्यात आहे. हिंदुत्वासाठी कोणते आंदोलन लंडनमध्ये असले की, नेने काका त्यात आघाडीवर असायचेच, जवळपास ८० हून अधिक देश ते हिंडले. भारतीय सैनिकांबद्दल त्यांना प्रचंड आदर आणि अभिमान. या क्षेत्रातील भूषण गोखले, जनरल सातपूते, जनरल निंभोरकर सर किंवा अन्य लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

दहा वर्षांपूर्वी पुण्यातील सर्वात मोठ्या कोकणस्थ संमेलनाचे मुख्य संयोजक नेने काका होते. स्वस्थ बसणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. हरहुन्नरी, तल्लख बुद्धिमत्ता असलेला हा माणूस सार्‍या जगभर भटकून आला. त्यांना ‘पेसमेकर’ बसविल्यानंतर कसलीही पर्वा न करता ते बेल्जियम, ग्रीस, युरोपियन देशांत जाऊन आलेत. यावेळी जेव्हा ते पुण्यात आले ते नियोजन करूनच. येथून अंदमानला गेल्यावर त्यांनी “अरे, राहुल बघ, मी येथे काय-काय बघितले.” याचा तपशीलवार ईमेल त्यांनी मला पाठविला. मोबाईलवरदेखील ते माहिती देत. ‘मी आता बलिदान वेदींपर्यंत आलो, सावरकरांची खोली बघितली,’ असे सर्व वर्णन ते सांगत असत. प्रत्येक गोष्टींचा मेल ते मला पाठवित असत, त्यात आपल्या ज्ञानात भर पडेल, असेच काही असायचे.

तसेच काकांना निरनिराळ्या वस्तू गोळा करण्याची प्रचंड हौस. कोठेही गेले की, तेथे आवडणारी वस्तू ते घेऊन येत. चीनमधून त्यांनी उत्तम आणि सुंदर असे स्त्रीचे रेशमांनी विणलेले पेंटिंग आणले, धर्मशाळेहून गाय वासरूचे शिल्प आणले. पेशव्यांचा अभिमान एवढा की श्रीगणेशाचे मोठे पेंटिंग त्यांनी घरात लावून घेतले. काकू मूळच्या वाईच्या. म्हणून तेथूनही ढोल्या गणपतीचे मोठ्ठे पोस्टर त्यांनी अगदी समोर दिसेल, असे घरात लावून घेतले. कलंदर एवढे की जगभरातील वाईन, विस्की आणण्याचा त्यांना छंद. मला त्याबद्दल ते माहिती द्यायचे.

आयुष्यभर माणसात राहिलेल्या नेने काकांनी कधीही कुणाला दुखावले नाही; उलट सर्वांची ते मदतच करीत होते. ‘कोरोना’ काळात जेव्हा माझे कार्यक्रम बंद होते, तेव्हा “राहुल, तुझे काम कसे सुरू आहे, कार्यक्रम बंद असतील, तर मी दोन चार लाख रूपये पाठवून देतो, संकोच करू नकोस.” मग मी म्हणायचो, ”नाही काका. नको, सर्व सुरळीत सुरू आहे.” जेव्हा ’कोरोना’ काळात देवव्रत बापट हे लतादीदी आणि सावरकरांवर कार्यक्रम करणार आहेत, असे त्यांना कळले, तेव्हा त्यांनी मला घरी बोलावून घेतले आणि मला सांगितले की, “देवव्रतला विचार कार्यक्रमाला किती खर्च येणार आहे.” त्यांनी आकडा सांगताच, ठरलं. “देवव्रत, हे पैसे माझ्याकडून घेऊन जा, नाही म्हणायचं नाही.” ‘गणेश क्रीडा मंच’मध्ये हा कार्यक्रम अगदी गच्च गर्दीत पार पडला. अक्षय जोग यांचे सावरकरांवर पुस्तक येतेय, चला, आपण जाऊया, ’ब्राह्मणरत्न’चा कार्यक्रम आहे, नेने काका पुढे असायचेच.

काकूंनी एकदा पंढरपूरला जाऊन तेथे पूजा करायची, अशी इच्छा व्यक्त केली. मग काय, “राहुल, तुझी तिथे ओळख आहे, बघ काय करायचे...” आम्ही रात्री सर्व परवानग्या वगैरे घेऊन तेथे गेलो. काका-काकूंनी पूजा केली. “आता पुढे काय, तू जे व्याख्यानात सांगतोस, ती मूर्ती लपविल्याची खोली बघायची इच्छा आहे,” असे सांगताच तेथील इत्यंभूत माहिती असलेल्या बडवे नावाच्या इसमाला घेऊन आम्ही पंढरपूरात ती खोली आणि सर्व ऐतिहासिक संदर्भ असलेली ठिकाणे पाहून आलोत. बेळगावला असेच एकदा माझे व्याख्यान असल्याचे त्यांना समजले. या व्याख्यानाचा विषय ऐकूनच ते आनंदित झाले. ’मी, कृष्णनीती, छत्रपती शिवाजी महाराजांची त्यावर आधारित रिती’ आणि आता त्याअनुषंगाने ’मोदी कृती’ या विषयावर व्याख्यान देणार होतो. मग काय नेने काका म्हणाले की, ”मी येणार, चला जाऊया.“ तेथेही या माणसाच्या ओळखी. “गोगटेच्या वाड्यात आपण राहायचे, तू कोठेही जायचे नाही, व्याख्यानाला तर येणारच; पण नंतर कोठे जायचे ते सांग.” तेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या राजहंस गडावर जाऊन इत्यंभूत माहिती त्यांनी जाणून घेतली. शंकराच्या मंदिरात जाऊन माहिती घेतली.

बाबासाहेब पुरंदरेंची आठवण आणि नेने काका
 
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंशी त्यांचे स्नेहाचे संबंध. जेव्हा बाबासाहेब लंडनला गेले होते, तेव्हा नेने काकांकडेच राहिले. त्यांनी बाबासाहेबांना तेथील चर्चिलचे घर बघायला नेले. ते बघून आल्यावर बाबासाहेब उदास झाल्याचे काकांच्या लक्षात आले. तेव्हा काकांनी याचे कारण विचारताच बाबासाहेबांनी जे उत्तर दिले, ते खूप महत्त्वाचे आहे. “हे लोक आपल्या अशा थोर लोकांची स्मारके किती उत्तम पद्धतीने जतन करून ठेवतात आणि आपल्या तिकडे महाराजांच्या गडांची आणि अन्य ठिकाणांची काय अवस्था आहे, हा विचार अस्वस्थ करतो,” असे उत्तर बाबासाहेबांकडून काकांना मिळाले होते.

मुंबईत लॅण्ड झाल्यावर काकांना बाबासाहेब गेल्याची बातमी कळली, तेव्हा त्यांनी लगेच मोबाईलवरून मला, ”राहुल, बाबासाहेब गेलेत हे खरे आहे का,” असे विचारले आणि त्यांनी कोठेही न जाता थेट बाबासाहेबांच्या दर्शनाच्या ठिकाणी जायचा निर्णय घेतला.
आणखी एक अशीच आठवण म्हणजे काकांना त्या डॉ. पांडुरंग खानखोजे यांचा पुतळा मेक्सिकोत उभारला जातोय, हे कळताच ते तेथे जाऊन आले. त्याचे छायाचित्र त्यांनी घेतले आणि हा माणूस उत्तम क्रांतिकारक होता, त्याला विसरता कामा नये, असे ते सांगत असत.

वसंत वसंत लिमये यांच्या मुलीच्या विवाहासाठी काकू येथे आल्या होत्या. त्यावेळी मला नेमके माझ्या कार्यक्रमासाठी लंडनला जावे लागले. तेव्हा आणि जेव्हा केव्हा माझे तेथे कार्यक्रम असायचे, ते आवर्जून मला घरी बोलवायचे, सर्व व्यवस्था करायचे माझीच नव्हे, तर ‘घाशीराम कोतवाल’च्या प्रयोगावेळीदेखील काकांनी डॉ. जब्बार पटेल यांना लागेल, ते सहकार्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील चित्रपट बाबूजी अर्थात सुधीर फडके तयार करीत होते, तेव्हा तेथील चित्रीकरणारसाठी प्रत्येक गोष्टीत काकांनी सहकार्य केले. बाबूजींना त्यांनी आपल्या घरीच ठेवले. सावरकरांवरील चित्रपट पूर्ण करण्याचा ध्यास त्यांनी पूर्णत्वास नेला. सरसंघचालक लंडनमध्ये कोणत्याही कार्यक्रमासाठी गेले की, काकांच्या घरीच थांबायचे. क्रॅायडॅानच्या शाखेत दररोज नेने काका ते हजर राहणारच. तेथे ज्या पद्धतीने रा. स्व. संघाचे कार्य चालते, त्यात सहभागी होणार, तेथील हिंदूंच्या हितासाठी जे करता येईल, ते प्रयत्न नेने काकांनी केलेत. एकदा तेथील हिंदूंविषयक विधेयक ब्रिटन संसदेत पारित करायचे होते. त्यांनी आपले सगळे कामधाम सोडून हे विधेयक पारित करण्यासाठी जे करता येईल, ते सर्व पुरावे, कागदपत्रे वगैरे गोळा करून आपल्या संबंधांचा उपयोग करून तेथील संसद सदस्यांशी बोलून सहकार्य केले.

लंडनमध्ये महाराष्ट्र मंडळाचे कार्य उत्तम चालावे म्हणून जागा हवी, यासाठी आग्रही असणार्‍या काकांनी तेथील आपल्या लोकांशी सल्लामसलत करून, चक्क एका चर्चची जागा घेतली आणि ते पाडून तेथे भव्य कार्यालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला. प्रत्येक कार्यात हिरिरीने सहभागी होणे, माणसात राहणे हे त्यांचे गुण वैशिष्ट्यपूर्ण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा जर इंग्लंडमध्ये असेल, तर त्यासाठीदेखील त्यांचा पुढाकार असायचा. २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोदींसाठी प्रचार करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्यावेळी त्यांनी राज्यात २०हून अधिक सभा घेतल्या होत्या. संघाशी निगडित प्रत्येक संघटनेसाठी ते कार्यरत असायचे, ’संस्कार भारती’ असो की सावरकरांचा कार्यक्रम काकांची भूमिका त्यात असायचीच.

माझ्या मुलाचे लग्न ठरले आणि ’कोरोना’मुळे त्यांना भारतात येणे शक्य नव्हते, त्यामुळे ”राहुल, तू कसे काय एवढ्या घाईत हा विवाह उरकून घेतो?” म्हणून त्यांनी मला दटावलेही. मात्र, मी त्यांना माझ्या मुलीला शिक्षणासाठी महिनाभरात अमेरिकेला जायचे असल्याने, तिने त्याआधी लग्न करा, असे सांगितल्याने हे करावे लागत असल्याचे कारण सांगितले. मात्र, आपल्या लाडक्या पुतण्याच्या मुलाच्या लग्नात आपण नाही, ही खंत त्यांना होती. त्यासाठी त्यांनी आम्ही ऑनलाईन लग्नसोहळा बघू, असे मला सांगितले. मात्र, त्यांना लग्नाला येता आले नाही, म्हणून त्यांनी चक्क येवल्याहून त्यांच्या ओळखीने एका पैठणी विणकराला सांगून एक छान सिल्क पैठणीचे सोवळे माझ्या मुलाच्या विवाहाआधी मला पुण्यात मिळेल, अशी व्यवस्था केली आणि हे सोवळे नेसूनच तू लग्नात मिरवायचे असे सांगितले. जेव्हा हा सोहळा ते ऑनलाईन बघत, तेव्हा त्यांनी काय भारी दिसतोस, राहुल या सोवळ्यात म्हणून माझी स्तुतीही केली. नेने काकांना भावपूर्ण श्रद्धांजली...

सावरकरांच्या उडीची शंभर वर्षे, ’ने मजसी ने’ आणि ’जयोस्तुते’

अनिल नेने काका हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. सावरकरांच्या त्या ऐतिहासिक उडीबाबत अनेक गैरसमज पसरविले जात असल्याबद्दल त्यांना संताप होता. मात्र, नेमकी वस्तुस्थिती आपण सांगितली पाहिजे, म्हणून त्यांनी तो सगळा इतिहास आपल्या व्याख्यानातून आणि लिखाणातून मांडला. शिवाय या उडीला ज्या दिवशी १०० वर्षे पूर्ण झालीत, त्या दिवशी काकांनी आधीच नियोजन करून जगभरातील विविध देशांतील १०० सावरकरप्रेमींना एकत्र करून, त्या ठिकाणी नेले. तेथे घडलेला किस्सा तर याहून भन्नाट आहे. ज्यावेळी हे ठिकाण पाहण्यासाठी सर्व जण उपस्थित होते, तेव्हा तेथे मंगेशकर कुटुंबीय अर्थात हृदयनाथ मंगेशकर वगैरे तसेच शंकर अभ्यंकर ही मंडळीदेखील आलेली होती. इतरही लोक होते. त्यावेळी कुठल्यातरी देशातील एक जण गिटारवर त्याच्या भाषेत गात होता. तेव्हा मग अनिल काकांना कल्पना सूचली आणि आपणही गायचे का... म्हणून मग त्यांनी हृदयनाथांना प्रश्न केला. सोबत अभ्यंकरांनीही दाद दिली. “होऊ दे त्याचे पूर्ण, मग आपण गाऊ” असे म्हणून या १०० जणांनी तेथे चक्क ’ने मजसी ने परत मातृभूमीला’ आणि ’जयोस्तुते’चे सामूहिक गायन सुरात केले. मंगेशकर कुटुंबीय असल्यावर काय बघायलाच नको, अगदी वातावरण सावरकरमय होऊन गेले, तेथे उपस्थित अन्य लोकदेखील विस्मयतेने हे बघतच राहिले.

डॉ. केशव हेडगेवारांवरील ‘मॅन आफ दि मिलेनिया’ लवकरच इंग्रजीत

नाना पालकरांनी डॉ. केशव हेडगेवारांवर जे चरित्र लिहिले, त्याचे इंग्रजीत पुस्तक तयार करण्याची जबाबदारी नेने काकांवर सोपविण्यात आली होती. सर्व माहिती संकलित करून, त्यांनी जगात ख्यात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक हिंदू संघटनेवरील हे डॉ. हेडगेवारांवरील ’मॅन आफ दि मिलेनिया’ हे इंग्रजी पुस्तक पूर्ण केले होते. लवकरच त्याचे प्रकाशन देखील होणार होते. मात्र, त्याआधीच काकांनी एक्झिट घेतली.

लंडनमध्ये दर शुक्रवारी दिवे, पणत्या

काकांचा हटके काम करण्याचा अंदाज भारीच होता. आपल्या देशात दिव्यांचे महत्त्व आहे. ते सगळ्या जगाला कळावे, म्हणून जेथे ते लंडनला राहत असत, तेथे दर शुक्रवारी त्यांनी आपल्या घरी सर्व लाईट बंद करून अंगणापासून ते प्रत्येक खोलीत किमान चार तास पणत्या लावण्याचा उपक्रम नियमित केला.

राहुल सोलापूरकर
(शब्दांकन ः अतुल तांदळीकर)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121