जागतिक राजकारणातील एक महदाश्चर्य - हेन्री किसिंजर

    09-Dec-2023
Total Views |
American diplomat Former national security advisor Henry Kissinger

‘तू आपले कर्म कर’ हा भगवान श्रीकृष्णाचा आग्रह (अपील) अर्जुनाला पटतो आणि तो कसा निःशंक होऊन युद्ध करण्यासाठी सज्ज होतो, हे किसिंजरसारख्या एके काळच्या सैनिकी पेशाच्या आणि वृत्तीच्या राजकारण्यालाही पटले आणि भावले, याचे आश्चर्य वाटावयास नको. नैतिकतेचा निषेध न करता, प्राप्त परिस्थितीत तत्काळ कर्तव्याची कृतीच कशी महत्त्वाची असते, या गोष्टींची नोंद त्यांनी घ्यावी, ही बाबही किसिंजर यांच्या कारकिर्दीशी मिळतीजुळती वाटते.

गीता, कौटिल्य आणि हेन्री किसिंजर

गीता, कौटिल्य आणि हेन्री किसिंजर ही तीन नावे एकत्र पाहिल्यानंतर कुणाच्याही भुवया आश्चर्याने उंचावल्या नाहीत, तरच आश्चर्य! पहिली दोन नावे एकत्र उच्चारली, तर कुणालाही आश्चर्य वाटावयास नको. हेन्री किसिंजर हे नावही अनेक सामान्यजनांना माहीत नसेल. पण, जागतिक राजकारणात मात्र या अमेरिकन कूटनीतिज्ञाला लोक ओळखून आणि वचकून असत. अमेरिका आणि चीन यांच्यात दोस्तीचे तसेच व्यापारी संबंध निर्माण करण्याचे श्रेय फार मोठ्या प्रमाणात हेन्री किसिंजर यांना दिले जाते. या कूटनीतिज्ञाच्या कार्यकर्तृत्वाचा, स्वभाववैशिष्ट्याचा, चतुराईचा परिचय करून देणार्‍या कथा लोकांमध्ये अनेकदा सांगितल्या जातात. त्यापैकी दोन नमुन्यादाखल नमूद कराव्याशा वाटतात.

चर्चा करण्यासाठी जेव्हा हेन्री किसिंजर आपल्या परदेशी समपदस्थांसोबत चर्चेला बसत असत, तेव्हा त्या दोघांमध्ये साहजिकच एक टेबल असे. समोरच्या व्यक्तीसमोर संदर्भासाठी मुद्द्यांचे टाचण असे. हेन्री किसिंजर यांना टाचणातील अक्षरे उलटी दिसत आणि त्यामुळे त्यात काय लिहिले आहे, ते दिसूनही कळत नसे. यावर उपाय म्हणून असा उलटा दिसणारा मजकूर वाचण्याचा सराव त्यांनी केला होता. आता प्रतिपक्ष कोणकोणते पर्याय घेऊन आला आहे, हे त्यांना कळत असे. यामुळे अमेरिकेसाठी वाटाघाटीने जास्तीत जास्त किफायतशीर सौदा करणारा राजकीय प्रतिनिधी असा त्याचा लौकिक होता, असे म्हणतात. हेन्री किसिंजर यांना अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा एक अत्यंत विश्वसनीय सहकारी मानले जाते. ही मैत्री वैयक्तिक पातळीवरही आहे, असा निक्सन यांचा समज होता. प्रतिपक्षाच्या ‘वॉटरगेट’ नावाच्या कार्यालयात काय खलबते चालतात, हे कळावे म्हणून निक्सन यांच्या संमतीने म्हणा किंवा मान्यतेने म्हणा मायक्रोफोन बसवण्यात आले होते, असे म्हणतात. पुढे हा प्रकार उघडकीला आला आणि निक्सन यांची नाचक्की होऊन त्यांच्यावर देशभर टीकेची झोड उठवण्यात आली. अशा प्रसंगी आपली ही विश्वसनीय सल्लागार व्यक्ती नक्की उपयोगी पडेल, अशा खात्रीने निक्सन यांनी हेन्री किसिंजर यांना भेटीला बोलवून ‘आता मी काय करू,’ असे अत्यंत काकुळतीने विचारले. पण, एक अक्षरही न बोलता हा कूटनीतिज्ञ चिरूट ओढीत, एका कोपर्‍याकडे एकटक पाहत राहिला, असे सांगतात. ‘या पापाला राजीनामा देण्याशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही,’ असेच जणू हेन्री किसिंजर यांना सूचवावयाचे असावे. कारण, या भेटीनंतर निक्सन राजीनामा देऊन पायउतार झाले. एका राजकारण्याला आपल्या ‘शब्दाविण्या झालेल्या या संवादात’ हेन्री किसिंजर यांनी नक्की काय सांगितले असेल, यावर अनेक माध्यमात चर्चा होत होती, असे म्हणतात. हेन्री किसिंजरच्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण परिचय अर्थातच या दोन कथातून होणार नाही, हे खरे असले तरी झलक मात्र नक्की मिळेल, असे वाटते.

गीतेनुसार जगाचा व्यवहार

अशा या हेन्री किसिंजर यांनी एकूण २७ पुस्तके लिहिली आहेत. ती सर्व सारखीच सरस आहेत. त्यापैकी एक पुस्तक तसे जुने असले तरी ‘पेंग्विन’ने हिंदुस्थानात चार-पाच वर्षांपूर्वी प्रसिद्ध केले आहे. ‘वर्ल्ड ऑर्डर ः रिफ्लेक्शन्स ऑन द कॅरेक्टर ऑफ नेशन्स अ‍ॅण्ड द कोर्स ऑफ हिस्टरी’ असे भलेमोठे शीर्षक असलेले हे पुस्तक. या पुस्तकातील ‘गीतेनुसार जग’ (द वर्ल्ड अ‍ॅकॅार्डिंग टू गीता) याबद्दलचे त्यांचे विचार जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असेल. या शिवाय कौटिल्याचे ’अर्थशास्त्र’ याबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले आहेत. आजवर गीतेचे अनेक अभ्यासक होऊन गेले. लोकमान्य टिळकांना गीतेत कर्मयोग गवसला, कुणाला भक्तियोग तर कुणाला संन्यास योग गवसला. डॉक्टर चान्सरकरांना तर त्यात अर्थशास्त्रातील तत्त्वे आढळली. किसिंजर यांना या ग्रंथात अनेक चक्रे (सायकल्स) आढळतात. प्रत्येक चक्र सहस्रावधी वर्षांचे असते. साम्राज्यांचाच नव्हे तर विश्वाचासुद्धा नाश होतो; पण तो पुन्हा निर्माण होण्यासाठी. मानवी अनुभवाचे वास्तविक स्वरूप त्यांनाच कळते, ज्यांचा स्वतःचा त्यात सहभाग असतो. गीतेत किसिंजर यांना नैतिकता (मोरॅलिटी) आणि सामर्थ्य (पॅावर) यांतील संबंधांची चर्चा केलेली आढळते. युद्धाचे दुष्परिणाम, त्यात होऊ घातलेला स्वकीय आणि निरपराध लोकांचा होणारा विनाश या सर्वाला आपण कारणीभूत होणार, या कल्पनेने गांगरलेला आणि गलितगात्र झालेला अर्जुन युद्धाचे समर्थनच होऊ शकत नाही, या निष्कर्षाला कसा पोहोचतो, याची नोंद किसिंजर घेतात आणि भगवान श्रीकृष्ण त्याचे समाधान कसे करतात, हेही ते विस्ताराने सांगतात. हे सर्व विस्ताराने या छोटेखानी लेखात सांगणे शक्य नाही आणि तो या लेखाचा हेतूही नाही.

गीता : आध्यात्मिक शब्दकोष

‘तू आपले कर्म कर’ हा भगवान श्रीकृष्णाचा आग्रह (अपील) अर्जुनाला पटतो आणि तो कसा निःशंक होऊन युद्ध करण्यासाठी सज्ज होतो, हे किसिंजरसारख्या एके काळच्या सैनिकी पेशाच्या आणि वृत्तीच्या राजकारण्यालाही पटले आणि भावले, याचे आश्चर्य वाचावयास नको. नैतिकतेचा निषेध न करता, प्राप्त परिस्थितीत तत्काळ कर्तव्याची कृतीच कशी महत्त्वाची असते, या गोष्टींची नोंद त्यांनी घ्यावी, ही बाबही किसिंजर यांच्या कारकिर्दीशी मिळतीजुळती वाटते. निर्भय मनाने युद्ध करावे, असा गीतेचा संदेश आहे, असे ते म्हणतात. पण, त्याचवेळी महात्मा गांधी गीताला आपला ’आध्यात्मिक शब्दकोष’ (स्पिरिच्युअल डिक्शनरी) मानीत असत, याची त्यांना आठवण आहे.

कौटिल्याची विशेषता

यानंतर किसिंजर वळले आहेत, ते थेट कौटिल्याकडे. कौटिल्य इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकात होऊन गेल्याची नोंद ते आवर्जून घेताना दिसतात. भारतात मौर्य घराण्याच्या उदयाचे कारकत्त्व ते कौटिल्याला देतात, ते योग्यच म्हटले पाहिजे. एकाच राज्याच्या कारकिर्दीत ‘अलेक्झांडर द ग्रेट’ला भारतीय उपखंडातून पिटाळून लावून, उपखंडात एकछत्री अमल निर्माण करणारा कौटिल्य अर्थशास्त्रातही तेवढ्याच अधिकारवाणीने लिहितो, यामुळे किसिंजर काहीसे विस्मित झाल्याची जाणीव होते.

कौटिल्य आणि पाश्चात्य चिंतक

युरोपात वेस्टफालियाचा तह रूर्ह नदी तीरी झाला, त्याच्या कितीतरी आधी कौटिल्याने राज्याराज्यात कायम स्वरुपी संघर्षाची स्थिती असते असते, हे जाणले होते, हे त्यांनी मनमोकळेपणाने मान्य केले आहे. मिचिएवेली या इटालियन इतिहासकार, तत्त्ववेत्ता, राजनीतिज्ञाप्रमाणेच कौटिल्याची भूमिका होती, असे किसिंजर म्हणतात. पण, स्थिती असलीच तर नेमकी उलट होती. कारण, कौटिल्याचा काळ मिचिएवेलीच्या काळाच्या कितीतरी अगोदरच्या आहे. रिचिलिऊ हा फ्रेंच धर्ममार्तंड आणि राजकारणीसुद्धा याच विचाराचा होता; पण या दोघात सुमारे दोन हजार वर्षांचे अंतर होते, हे मात्र हेन्री किसिंजर यांनी स्पष्टपणे नोंदवले आहे. राज्य ही मुळातच ठिसूळ (फ्रॅजाईल) संस्था आहे. त्यामुळे ते कायम स्वरुपी राहिलेच पाहिजे, या म्हणण्याला नैतिकतेचा आधार नसतो, हे किसिंजर यांना जाणवावे यात आश्चर्य ते काय? अमेरिकेची आजवरची धोरणे आणि व्यवहार याच तत्त्वावर अनुसरून राहत आले आहेत.

कौटिल्याची भावलेली शिकवण

राज्याची स्थापना कशी करावी, त्याचे रक्षण कसे करावे, शत्रूंच्या कारवायांना योग्यवेळ पाहून पायबंद कसा घालावा, प्रदेश कसे जिंकावेत, याबाबतचे कौटिल्याचा विचार किसिंजर यांना पटलेले दिसतात. सामर्थ्य बहुआयामी असते. त्याचे घटक परस्परावलंबी असतात. उद्दिष्टानुसार त्यांचा वापर करायचा असतो. भौगोलिक परिस्थिती, आर्थिक पाठबळ, सैनिकी सामर्थ्य, राजकीय डावपेच, हेरगिरी, तत्कालीन कायदे, परंपरा, लोक भावना, अफवा, दंतकथा, मानवी स्वभावविशेष, माणसाचा दुबळेपणा या सर्व बाबी राजाला माहीत असल्या पाहिजेत, या कौटिल्याच्या शिकवणीची नोंद किसिंजर यांनी आपल्या पुस्तकात घेतली आहे. या ठिकाणी त्यांना मिचिएवेली या इटालियन राजनीतिज्ञाची आणि क्लॅासेविच या जर्मन तत्त्वज्ञाची आठवण होते. यापैकी क्लॅासेविच याने युद्धातील नीतिनियमांचा पाया घातला, असे मानतात.

सत्तेचा समतोल ही कौटिल्याची संकल्पना

‘सत्तेचा समतोल’ ही संकल्पना पाश्चात्यांना सूचण्याच्या दोन हजार वर्षांपूर्वी कौटिल्याने मांडली, हे किसिंजर मनमोकळेपणाने मान्य करतात. शत्रू आणि मित्र या दोघांवरही पाळत ठेवण्यासाठी आणि माहिती मिळविण्यासाठी फिरते साधू, भटके, जादुगार, ज्योतिषी यांचा उपयोग कसा करून घ्यावा, अफवा पसरवून राज्यात बेदली कशी माजवावी, दोन राज्यांत वैमनस्य कसे निर्माण करावे, शत्रूच्या सैन्यात गोंधळ कसा माजवावा आणि या सर्वांसाठी योग्यवेळ कशी साधावी, याचा वस्तुपाठच कौटिल्याने दिला आहे. या सर्व बाबींचीही तपशीलवार नोंद किसिंजर यांनी घेतली आहे.

प्रजा असंतुष्ट असणार नाही, याकडे राजाचे कायम लक्ष असले पाहिजे. मिचिएवेली (युरोपातील पुनर्निर्मितीच्या कालखंडातील तत्त्ववेत्ता) आणि कौटिल्य यांची तुलना करताना किसिंजर एक महत्त्वाचा फरक दाखवतात, तो असा की, कौटिल्याचे सर्व विवेचन भावनिक आत्मीयतेपासून (नॅास्टॅग्लिया) पूर्णपणे अलिप्त होते.

“अशोकाच्या काळात भारताचा विस्तार आजचे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि इराण यांतील काही भाग येथपर्यंत झाला होता. याबद्दल मात्र आपण होकारार्थी किंवा नकारार्थी टिप्पणी करू इच्छित नाही,” असे किसिंजर यांनी म्हटले आहे. आपली वैशिष्ट्ये आणि ज्येष्ठता पाश्चात्यांच्या तोंडून ऐकली म्हणजे अनेकांना लवकर पटते, असा अनुभव आहे. गेलेल्या बद्दल वाईट बोलू नये, असाही संकेत आहे. पण, समीक्षा करायची झाली, तर व्यक्तिमत्त्वाच्या दोन्ही बाजू समोर यायला नकोत का?

वसंत गणेश काणे
९४२२८०४४३०
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.