मुंबई : म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५३११ सदनिकांच्या विक्रीकरिता दि. १३ डिसेंबर, २०२३ रोजी आयोजित ऑनलाईन संगणकीय सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. सोडतीचा नवीन दिनांक संबंधित अर्जदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते दि. १५ सप्टेंबर, २०२३ रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. अर्जदारांच्या सोयीकरिता मंडळातर्फे सोडतीत सहभागी होण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली. या सोडतीसाठी एकूण ३०,६८७ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह २४३०३ अर्ज प्राप्त झाले आहेत. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी दिनांक ०४ डिसेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी ११ डिसेंबर, २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
कोंकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०१० सदनिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करणार्या नागरिकांनी PMAY योजने अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. तथापि नोंदणी केलेली नसल्यास सोडतीतील यशस्वी अर्जदारांनी नोंदणी करणे बंधनकारक राहील. कोंकण मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १०३७ सदनिका, सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ सदनिका आहेत. प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य या योजने व्यतिरिक्त इतर सर्व योजनांकरिता २० टक्के प्रतीक्षा यादी ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.