महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणार्या ‘समृद्धी महामार्ग’ प्रकल्पाचा अंतिम टप्पा मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. ‘समृद्धी महामार्ग’ प्रकल्पाची सद्यःस्थिती त्याबरोबरच महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजना आणि सध्या सुरू असलेल्या इतर प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांची ‘महाएमटीबी’चे वेब उपसंपादक श्रेयश खरात यांनी विशेष मुलाखत घेतली. त्याचा हा वृत्तांत.
अभियंता म्हटलं की, आव्हाने आलीच. आपण आजवर अनेक प्रकल्प उभारले. त्यापैकी सर्वांत आव्हानात्मक प्रकल्प कुठला होता?
मी २०११ ते २०१५ या कालावधीत ठाण्याला अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होतो. यावेळी ठाण्यातील वैतरणा नदीवर अप्पर वैतरणा आणि लोअर वैतरणा या धरणांमध्ये मध्य वैतरणा या धरणाचं काम मुंबई महानगरपालिकेकडून सुरू होते. त्या धरणामुळे कसारा घाटातून कर्जतकडून जव्हारकडे जाणार एक रस्ता होता, त्यावरील एक जुना पूल पाण्याखाली जात होता. त्यामुळे तो पूल उंच बांधण्याचं काम मंडळामार्फत सुरू होतं. त्या पुलाची उंची २७६ फूट होती. दरिक्षेत्र असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात हवा होती. पावसाळ्यात खूप पाऊस पडायचा. अशात जून-जुलैच्या पावसामध्ये आम्ही त्या पुलाचं काम पूर्ण केलं होतं. हा प्रकल्प मी माझ्या कारकिर्दीतील सर्वांत आव्हानात्मक प्रकल्प मानतो.
‘समृद्धी महामार्गा’चा अंतिम टप्पा २०२४ पर्यंत पूर्ण होईल, अशी घोषणा विद्यमान मंत्र्यांनी केली आहे. परंतु, कामाची सद्यःस्थिती पाहता आणखी दोन वर्षे लागतील, असा विरोधकांचा आरोप आहे. या आरोपांमध्ये तथ्य आहे का?
‘समृद्धी महामार्गा’चा कार्यारंभ आदेश फेब्रुवारी २०१९ मध्ये काढण्यात आले होते. त्यानंतर २०१९ चा पावसाळा त्यानंतर कोरोना महामारी याचा परिणाम या कामावर झाला होता. परंतु, तरीही डिसेंबर २०२२ पर्यंत ५२० कि.मी च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान महोदयांच्या हस्ते करण्यात आले होते. देशात हा पहिलाच एवढा मोठ्या ‘मॅग्नेट्यूड’चा प्रकल्प असेल, जो एवढ्या कमी वेळात पूर्ण झाला आहे. त्यानंतर मेपर्यंत शिर्डीपासून भरवीरपर्यंतचा ८० कि.मीचा दुसरा टप्पा आम्ही पूर्ण केला. उर्वरित १०० कि.मी पैकी भरवीर ते इगतपुरी हा २० कि.मीचा तिसरा टप्पा महिन्याभरात वाहतुकीसाठी खुला होईल. बाकी ८० कि.मीचा जो टप्पा आहे. इगतपुरीपासून ठाण्यापर्यंत त्या भागात मोठ्या प्रमाणात डोंगर आणि दर्या आहेत. आशा ठिकाणी काम करणे खूप जिकिरीचे आहे. तरीही या सर्व संकटांवर मात करून या टप्याचे ही ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सहा महिन्यांत राहिलेले काम निश्चितपणे पूर्ण होईल व तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
‘समृद्धी महामार्ग’ आणि अपघात, या समीकरणाची सातत्याने चर्चा होत असते. या महामार्गावरचे अपघात थांबवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?
‘समृद्धी महामार्ग’ हे एक ‘इंजिनिअरिंग मार्व्हल’ आहे. हा आमच्या स्पेशल पब्लिकेशन ऑफ आयआरसी जे आहे, त्याच्या स्टँडर्डसनुसार परिपूर्ण बांधलेला हा महामार्ग आहे. इंजिनिअरिंगदृष्ट्या महामार्गत कोठेही त्रुटी नाहीत. प्रत्येक वाहनानुसार वेगमर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यानुसार जर वाहने चालली, तर अपघात होणार नाहीत. हा महामार्ग ६०० कि.मी सरळ आहे. टोल व्यतिरिक्त कोणतेही अडथळे नाहीत त्यामुळे चालकाला वाहन वेगाने चालवण्याची इच्छा होऊ शकते. त्यावर नियंत्रण ठेवून वाहन ‘आरटीओ’ने घालून दिलेल्या मर्यादेत चालवले, तर अपघात होणार नाहीत. प्रत्येक वाहनांसाठी लेन ठरवून दिलेल्या आहेत. त्याचे पालन करणे आवश्यक आहे. लेन डीसीप्लिन आणि वेगमर्यादा या दोन गोष्टींच पालन केले, तर या महामार्गावर एकही अपघात होणार नाही. दुसरं म्हणजे हा महामार्ग दहा जिल्ह्यांतून जातो. दहापैकी नऊ जिल्ह्यांत हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे. अशात नऊ जिल्ह्यांत कुठेही अपघात झाला तरी समृद्धीवर अपघात झाला असे म्हटले जाते. सध्याची आकडेवारी पाहिली, तर ११ महिन्यांत १४१ च्या आसपास अपघाती मृत्यू झाले आहेत. ती आकडेवारी राज्याच्या आकडेवारीच्या तुलनेत कमी आहे. ती आकडेवारी कमी असली तरीही महामार्गावर अपघात होणारच नाही, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणखी उपाययोजना करण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत. दर दहा कि.मी वर दहा एमएमच्या रुम्बलिंग स्ट्रिप्स लावण्यात येत आहेत. ज्यामुळे ड्रायव्हरला झोप लागल्यास झटका लागून जागे होण्यास मदत होते. दर पाच कि.मी वर रंगीबेरंगी झेंडेही लावले जात आहेत.
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते सिंधुदुर्ग या कोकण ग्रीन फिल्ड महामार्गाला मान्यता देण्यात आली आहे. या महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला कधीपर्यंत सुरुवात होईल?
माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात ५००० कि.मीचे एक्स्प्रेसवेचे जाळे निर्माण करण्याची घोषणा केली आहे. यात ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे, रिंग रोड, मल्टीमोडल कॉरिडॉरचा समावेश आहे. जालना नांदेड एक्स्प्रेसवे, नागपूर गोंदिया एक्स्प्रेसवे, गोंदिया गडचिरोली एक्स्प्रेसवे आणि नागपूर चंद्रपूर एक्स्प्रेसवे असे ६ एक्स्प्रेसवे आता अंतिम टप्प्यात आले आहेत. त्यानंतर काही प्राधान्य दिले गेलेले एक्स्प्रेसवे आहेत त्यामध्ये कोकण एक्स्प्रेसवे आहे, शक्तीपीठ एक्स्प्रेसवे येतोय, जो नागपूर पासून गोव्यापर्यंत आहे. पुणे- नाशिक औद्योगिक कॉरिडॉर आहे. असं मोठं एक्स्प्रेसवेचं जाळ महाराष्ट्रात निर्माण होणार आहे. कोकण एक्स्प्रेसवे चा डीपीआर तयार आहे, त्याचं सेक्शन थ्री चं नोटिफिकेशन ही तयार आहे. लवकरच हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.