सामाजिक बांधिलकी जपत ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या दोन्ही गटांमध्ये समतोल साधण्यासाठी आरंभिलेल्या ‘कबाड से जुगाड’ या लोकहितैषी उपक्रमांतर्गत झटणार्या मनोज बंड यांच्याविषयी...
'कोरोना’ महामारीने संपूर्ण जग हादरले होते. अन्नान्नदशा अशी विदारक स्थिती. विदर्भाच्या कानाकोपर्यातही हजारो गरीब, वंचित मदतीच्या प्रतीक्षेत होते. अशाच गरजूंना मदतीचा हात देणारा देवदूत म्हणजे नागपूरचे मनोज बंड. ’कोरोना’च्या भीतीने समाज भयग्रस्त झालेला असताना, या देवदूताने सामाजिक बांधिलकी जपत, रस्त्यावर उतरुन गरिबांना अन्न, वस्त्र, औषधे, रेशन किट असे जीवनावश्यक साहित्य पुरवले. या मोलाच्या कार्यात त्यांना साथ मिळाली ती म्हणजे ’अमरस्वरूप फाऊंडेशन’ आणि ’पुलक मंच परिवारा’ची.
नागपूरमध्ये एका जैन परिवारात जन्मलेल्या मनोज बंड यांनी इयत्ता पाचवीत असल्यापासूनच काम करण्यास सुरुवात केली. याच काळात त्यांच्या आध्यात्मिक गुरू रजनीताई सोईस्कर यांनी त्यांना धार्मिक शिक्षण तर दिलेच; शिवाय त्यांच्यातील सभाधीटपणा वाढीस लागावा म्हणून मार्गदर्शनही केले. यातून मनोज यांच्यातील आत्मविश्वास, संवाद कौशल्य आदी गुण वृद्धिंगत झाले व ते समाजाच्या आणकीन जवळ आले. पुढे बारावीत असताना त्यांनी ’परिश्रम सांस्कृतिक युवा मंच’ ही पहिली संस्था सुरू केली आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा श्रीगणेशा झाला. याच काळात त्यांना ’पुलक मंच परिवार’ या संस्थेकडूनही ‘उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता’ म्हणून सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. मनोज सध्या ’पुलक मंच परिवार’ या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असून ते अनेकविध सामाजिक जबाबदार्या पार पाडत आहेत.
वास्तविक मालमत्तेच्या व्यवहारांचे काम पाहणार्या मनोज यांनी आई-वडिलांच्या प्रेरणेतून समाजसेवेचा ध्यास घेतला. यातूनच त्यांनी ’कोरोना’काळात सलग ११० दिवस गरजूंना अन्नधान्य पुरवले. पण, या दरम्यान गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा करताना त्यांच्या लक्षात आले की, अन्नाव्यतिरिक्तही लोकांना कितीतरी वस्तूंची गरज असते. हीच गरज लक्षात घेत, मनोज यांनी २०२० मध्ये ’कबाड से जुगाड’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला. या संकल्पनेअंतर्गत लोकांच्या घरी असलेल्या अनावश्यक वस्तू गोळा करून, त्या गरजूंपर्यंत पोहोचविल्या जात. ’अमर स्वरूप फाऊंडेशन’चे अध्यक्ष मनीष मेहता, भूवीश मेहता आणि मनोज बंड या तिघांनी मिळून हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला.
या उपक्रमात त्यांना ’पुलक मंच परिवार’ या संस्थेचेदेखील सहकार्य लाभले. ’कबाड से जुगाड’अंतर्गत आज जवळपास तीन हजार लोकांचे त्यांना सहकार्य लाभते. या उपक्रमाद्वारे लोक त्यांच्याकडील टाकाऊ वस्तू गोळा करून मनोज बंड यांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचवितात. कपडे, रद्दी, बाटल्या, भांडी, संगणक, दूरदर्शन, गृहोपयोगी वस्तू यांसारखे विविध प्रकारचे साहित्य ते गरजूंपर्यंत पोहोचवत असतात. ज्या लोकांकडे अशा कितीतरी अतिरिक्त वस्तू धूळखात पडल्या आहेत, त्यांच्याकडे मनोज आपली गाडी घेऊन जातात आणि या वस्तू गोळा करतात. नागपूर येथील नंदनवन भागात त्यांचे ऑफिस असून पारडीमध्ये एक कार्यशाळा आहे. याठिकाणी हे सगळं साहित्य गोळा केले जाते.
एवढंच नाही तर गोळा केलेल्या साहित्यामधील कपड्यांपैकी वापरण्यायोग्य नसलेल्या कपड्यांना स्वच्छ करून त्यापासून ते कापडी पिशव्या शिवून घेतात. या पिशव्यांचे बाजारात निःशुल्क वाटप केले जाते. शिवाय प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरण्यासाठी जनजागृतीही केली जाते. याद्वारे जवळपास दहा ते १२ महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याचे मनोज सांगतात. तसेच ’कबाड से जुगाड’ ही टीम दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस बांधवांसोबत दिवाळी साजरी करते आणि तेथील काही गरजूंना नवीन कपडे, भांडी, खेळणी आणि दिवाळीच्या फराळाचे वाटपदेखील केले जाते.
मनोज बंड यांच्या ’कबाड से जुगाड’ या उपक्रमाची आजवर अनेक माध्यमांनी दखल घेतली आहे. याशिवाय दूरदर्शनने यावर एक माहितीपटदेखील तयार केला आहे. अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर’ या विद्यापीठामध्ये त्यांच्या या उपक्रमाला पुरस्कार देऊन गौरविण्यातही आले.
याशिवाय मनोज बंड यांनी २०१३ मध्ये ’वात्सल्यधारा आधार बँक’ नावाची वैद्यकीय साहित्यांची एक अनोखी बँक सुरू केली. या बँकेच्या माध्यमातून आजही गरजू लोकांना व्हीलचेअर, वॉकर, पलंग यांसारखे साहित्य निःशुल्क स्वरुपात उपलब्ध करून दिले जाते. हे साहित्य लोक वापरतात आणि वापरून झाल्यानंतर परतदेखील करतात. वर्षानुवर्षे ही बँक सुरू असून, हजारो लोकांनी या बँकेचा लाभ घेतला आहे. ’कोरोना’काळात या बँकेत ऑक्सिजन सिलिंडरदेखील उपलब्ध करून दिले.
मनोज बंड यांना भविष्यातही अनेक लोकहितैषी प्रकल्प राबवायचे आहेत. यात कसायांकडे जाणार्या गोमातेचे संरक्षण करण्यासाठी ’गोशाळा प्रोजेक्ट’ सुरू करण्याची त्यांची मनस्वी इच्छा आहे. याशिवाय रस्त्यावरील, भिकार्यांसाठी एक चालता-फिरता दवाखाना तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. यातून दर रविवारी रस्त्यावरील भिकारी रुग्णांपर्यंत जाऊन, त्यांना योग्य उपचार ते देणार आहेत. मनोज बंड यांच्या जीवनप्रवासात त्यांच्या पत्नी प्रिया बंड यांचीही त्यांना मोलाची साथ लाभली.
मनोज यांच्या या गरजूंना आधार देणार्या कौतुकास्पद उपक्रमासाठी आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना दै. ’मुंबई तरुण भारत’तर्फे हार्दिक शुभेच्छा!
अवंती भोयर