सफदर हाश्मींची एक अनुवादित मराठी कविता आहे. ती काव्य रचना अशी आहे.
पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या.माणसांच्या जगाच्या,
वर्तमानाच्या -भूतकाळाच्या ,एकेका क्षणाच्या !
जिंकल्याच्या-हरल्याच्या,प्रेमाच्या-कटुतेच्या !
ह्या कवितेप्रमाणे आपल्या आयुष्यात अशी अनेक पुस्तक आपण वाचत असतो. ज्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते. म्हणूनच कोणीतरी म्हणटलंय की, पुस्तकांने मस्तक सुधारतं आणि सुधारलेले मस्तक कधीही कोणापुढे नतमस्तक होत नाही. त्यामुळेच आज आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या प्रेरणादायी पाच पुस्तकांबद्दल जाणून घेणार आहोत.सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकारांनी लिहलेल्या आणि विशेष म्हणजे तरुणांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या पुस्तकाबद्दल जाणून घेऊ. त्या पुस्तकाचा नाव आहे, विद्याऱ्थ्यांनो जागृत व्हा! आपल्याला तर माहितीच आहे की, बाबासाहेबांनी अपार वेदना, त्रास सोसून विद्या संपादन केली. काहीवेळा उपाशी राहण्याची त्यांच्यावर वेळ आली. मात्र तरीदेखील त्यांनी विद्या संपादन करणे सोडलं नाही. त्यामुळेच १९३८ साली पुणे येथे पार पडलेल्या अकराव्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनातील आंबेडकरांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित भाग विद्यार्थ्यांनो जागृत व्हा ह्या पुस्तकांत पाहायला मिळेल. त्यात बाबासाहेब म्हणतात की, तरुणांनी फक्त नोकरी करणे ह्या स्वार्थी हेतूपुरते मर्यादित न राहता. आपण ही समाजाचं काही देणं लागतो. ह्या उद्दत हेतूसाठी काम करणे गरजेचे आहे. त्यामुळेच विद्यार्थी जीवन जगणाऱ्या तरुणांसाठी हे पुस्तक आणि ह्यातील बाबासाहेबांचे विचार प्रेरणादायी असे आहेत. तरी हे पुस्तक तरुणांनी , विद्यार्थ्यांनी वाचणे गरजेचे आहे.
त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे पुस्तक म्हणजे माझी आत्मकथा. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाबासाहेब लिहतात की, "मी वर्गीकृत लोकांत जन्मलो. त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावयाचे, याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणीच केलेली आहे. या प्रतिज्ञेपासून दूर करण्यासाठी अनेक आमिषे मला माझ्या आयुष्यात आली व गेली.फक्त स्वतःचेच चांगले करण्याचे मी लहानपणात ठरविले असते तर मला हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते.रंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नतिप्रीत्यर्थ माझे सर्व आयुष्य वाहण्याचे ठरविले आहे आणि हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्त्वाचा अवलंब करीत आलो आहे." या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगितल्या प्रमाणे वंचित घटकांच्या उद्धारासाठी बाबासाहेबांनी केलेले प्रयत्न तसेच त्यात त्यांना सोसाव्या लागणाऱ्या वेदनांचा परिचय आपल्याला माझी आत्मकथा ह्या पुस्कात पाहायला मिळतो.
त्यानंतर जातिव्यवस्थेचे निर्मूलन या बाबासाहेबांच्या पुस्तकात काय आहे तर, जात-पात तोडक मंडळाद्वारे आयोजित त्याच्या वार्षिक अधिवेशनासाठी लाहोर येथे मार्च १९३६मध्ये डॉ. आंबेडकरांना अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आमंत्रित केले गेले होते, परंतु मंडळाच्या सदस्यांनी जेव्हा कार्यक्रमाच्या आधी बाबासाहेबांचे भाषण पाहिले तेव्हा त्यांना ते आपत्तिजनक वाटते. मंडळाच्या सदस्यांनी या भाषणात बदल करण्यासाठी डॉ. आंबेडकरांना विनंती केली, मात्र डॉ. बाबासाहेबांनी भाषणात कोणतेही परिवर्तन करण्यास स्पष्ट नकार दिला. शेवटी या मंडळाच्या वार्षिक अधिवेशनाचा कार्यक्रम रद्द केला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हेच भाषण जसेच्या तसे इ.स. १९३६ मध्ये ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन ' नावाने पुस्तक रूपात प्रकाशित करून टाकले जेणेकरून जास्तीत जास्त लोक याविषयी जाणू शकतील. हा ग्रंथ खूपच गंभीर ग्रंथ आहे. यात डॉ. आंबेडकरांनी जाती-व्यवस्थेच्या आधारावर त्याच्या उन्मूलना संबंधात गंभीर चर्चा केली आहे.
त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं 'दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हे पुस्तक ही फार महत्त्वाचे आहे. 1923 साली लंडनच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' मधून डॉक्टरेट करताना त्यांनी हा प्रंबध सादर केला होता. जो पुढे पुस्तकरुपाने आपल्यासमोर आला.ह्या ग्रंथाचे महत्त्व असे आहे की, यांच ग्रंथाच्या आधारे १ एप्रिल १९३५ रोजी चलन नियंत्रण करणारी, सगळ्या बँकांची शिखर संस्था असलेली भारतीय रिझर्व्ह बँक अस्तित्त्वात आली. यांच ग्रंथामुळे अर्थशास्त्रज्ञ म्हणून आंबेडकरांची वेगळी ओळक अनेकांना झाली.त्यानंतर द बुद्ध अॅण्ड हिज धम्म ह्या पुस्कात बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची विवेचना विशद केली आहे. हे पुस्तक बाबासाहेबांनी का लिहले? तर इ.स. १९५१ मध्ये कलकत्ता महाबोधी सोसायटीच्या जर्नलचे संपादक यांनी बाबासाहेब आंबेडकरांना वैशाख अंकासाठी एक लेख लिहिण्यास सांगितले. त्या लेखात बाबासाहेबांनी बुद्धांचा धर्म हा एकमेव धर्म आहे ज्याचा विज्ञानाने जागृत समाज स्वीकारू करू शकतो , असे भाष्य केले. तसेच नागपूरात बौद्ध धम्माची दिक्षा घेताना बाबासाहेब म्हणाले होते की, " तुम्ही माझ्याबरोबर यावे अशी माझी इच्छा आहे.परंतु मी सांगतो म्हणून धर्मांतर केले पाहिजे , या भावनेला वश होवून काही करू नका. तुमच्या बुद्धीला जर पटेल तर त्याला होकार द्या . माझ्याबरोबर न येण्याचा निश्चय तुम्ही केलात तरी त्याबद्दलही मला काही दुखः होणार नाही." एकंदरित काय तर अभ्यासाअंतीच बौद्ध धर्माचा स्विकार करा, असे बाबासाहेबांना सांगायचे होते.
ज्यांचा उल्लेख द बुद्ध अॅण्ड हिज धम्म या पुस्तकात वाचताना आपल्याला मिळतो. त्यामुळेच ते म्हणायचे की, बौद्ध धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, विज्ञानाने जागृत झालेला समाज तो सहर्ष स्वीकारील. मानवासाठी कल्याणकारी असणाऱ्या या धर्मात उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरुष, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेद नाही. समानता हेच तत्त्व या धम्मात व्यापून आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे या धम्माचं मध्यवर्ती सूत्र आहे. हे तत्त्वज्ञान त्यांनी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथातून विस्तृतपणे मांडलेले आहे. गौतम बुद्धांच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर, समाजातील मौलिक प्रश्नांवर विवेचन करणारा हा एकमेवाद्वितीय ग्रंथ होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा अखेरचा ग्रंथ असून त्यांच्या सर्व ग्रंथांत या ग्रंथाला सर्वाधिक महत्त्व आहे.एकंदरित या पाच पुस्तकामुळे धर्म, मानववंशशास्त्र, सामाजिक शास्त्रं, राज्यशास्त्र, अशा एक ना अनेक विषयांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास आपल्याला दिसून येतो, तरी ही बाबासाहेबांची पाच पुस्तके नक्की वाचा.