नौदलातील पदांना भारतीय परंपरेनुसार नावं देणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
04-Dec-2023
Total Views | 259
सिंधुदुर्ग : नौदलातील पदांना भारतीय परंपरेनुसार नावं देणार तर नौदलाच्या गणवेशावर शिवमुद्रा असणार, अशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. भारतीय नौदल दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावेळी मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आजचा ऐतिहासिक दिवस शिवरायांची आठवण करून देतो. शिवरायांच्या दुरदृष्टीमुळे नौदल शक्तिशाली आहे. शिवरायांच्या धोरणामुळे नौदलाची वाटचाल पुढे सुरू आहे. समुद्रावर ज्याच वर्चस्व तो शक्तिशाली असं महाराज म्हणायचे. आपल्या समुद्र तटीय क्षेत्रातील लोकांचा विकास थांबलेला होता. २०१४नंतर भारतात मत्स्य उत्पादन वाढलेले आहे. मच्छिमारांना किसान कार्डचा लाभ मिळालेला आहे. समुद्र किनाऱ्यावर नवे उद्योग आणि व्यवसाय वृध्दी होईल यासाठी आपले सरकार प्रयत्न करत आहेत." असं मोदी म्हणाले.
Salute to our Navy personnel for their steadfast dedication and indomitable spirit in safeguarding the Motherland. https://t.co/8d7vwcqOAf
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "सशस्त्र दलांमध्ये आमच्या महिलांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आज भारत प्रभावी लक्ष्य निश्चित करत आहे. आपल्या देशाला विजयाचा गौरवशाली इतिहास आहे. जग भारताकडे ‘जागतिक मित्र’ म्हणून पाहत आहे. आपल्या वारशाचा अभिमान बाळगून मला आणखी एक घोषणा करताना अभिमान वाटत आहे. भारतीय नौदल आता भारतीय परंपरेनुसार आपल्या पदांची नावे देणार आहे. सशस्त्र दलात महिलांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत." अशी घोषणा मोदींनी केली.
तिसरी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू!
"आजचा भारत स्वतःसाठी मोठी उद्दिष्टे ठेवत आहे आणि ते साध्य करण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरत आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्याची भारताकडे मोठी क्षमता आहे. ही शक्ती 140 कोटी भारतीयांच्या श्रद्धेची आहे. भारताच्या इतिहासातील हा काळ 5-10 वर्षांचा नाही तर येत्या शतकांचे भविष्य लिहिणार आहे. 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत, भारत जगातील 10 व्या आर्थिक शक्तीपासून 5 व्या स्थानावर पोहोचला आहे. आता तिसरी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
'मेड इन इंडिया'ची चर्चा!
नरेंद्र मोदी म्हणाले की, "आज जगभरात 'मेड इन इंडिया'ची चर्चा होत आहे. तेजस विमान असो वा किसान ड्रोन, UPI प्रणाली असो किंवा चांद्रयान 3, मेड इन इंडिया सर्वत्र आणि प्रत्येक क्षेत्रात प्रसिद्ध आहे. आयएनएस विक्रांत हे 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत'चे प्रतीक आहे. ही क्षमता असलेल्या जगातील मोजक्या देशांपैकी भारत एक आहे.