काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे अपयश सालाबादप्रमाणे यंदाही पुनश्च अधोरेखित झाले. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांना ‘मामाजी’ असे प्रेमाने संबोधतात. त्यामुळे मध्य प्रदेशात भाजपने १६३ जागांवर मिळविलेला विक्रमी विजय हा ‘मामो मॅजिक’ म्हणजेच ‘मामाजी’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याचा विजय असल्याचे दिसून येते.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात भाजपविरोधी वातावरण आहे, असे काँग्रेसकडून भासविण्यास प्रारंभ झाला होता. त्यासाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेस कथितरित्या मिळालेला मोठा प्रतिसाद आणि शिवराजसिंह चौहान सरकारविरोधात असलेली ‘अॅण्टी-इन्कम्बन्सी’ ही दोन कारणे देण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्षात निकालाच्या दिवशी काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे अपयश सालाबादप्रमाणे यंदाही पुनश्च अधोरेखित झाले.
मध्य प्रदेशात भाजपने शिवराजसिंह चौहान यांची लोकप्रियता असतानाही, सामूहिक नेतृत्वाद्वारे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. भाजपचा हा निर्णय म्हणजे शिवराजसिंह यांचे पंख छाटण्याचा प्रकार असल्याचेही विश्लेषण अनेकांनी केले. मात्र, या निर्णयामुळे भाजपने विविध भागांतील मतदारांना ‘आपलाही नेता मुख्यमंत्री होऊ शकतो’ असा स्पष्ट संदेश दिला. हा संकेत समजताच, मतदारांमध्ये एक प्रकारचा उत्साह संचारला. त्याप्रमाणे शिवराजसिंह यांचे नाव थेट पुढे न केल्यामुळे सत्ताविरोधी मानसिकतेसारख्या गोष्टी मागे राहिल्या आणि भाजपने दणदणीत विजयाकडे वाटचाल केली. भाजपची ही रणनीती ना काँग्रेसला समजली ना कथित निवडणूक तज्ज्ञांना!
भाजपने सामूहिक नेतृत्वासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा सातत्याने पुढे केला. पंतप्रधान मोदी त्यांच्या सर्व सभांमध्ये ’मोदी गॅरेंटी’ हा मुद्दा अतिशय आत्मविश्वासाने मांडला होता. यासोबतच या काळात ’पीएम किसान निधी’ची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली, त्यामुळे ’मोदींच्या गॅरेंटी’ची चर्चा जोर धरू लागली आणि मध्य प्रदेशात भाजपने मोठ्या विजयाकडे वाटचाल केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या नेतृत्वाच्या मतदारांवरील प्रभावाची नेमकेपणाने जाणीव आहे. त्यामुळे भाजपने अतिशय खुबीने मध्य प्रदेशात त्याचा वापर केला.
शिवराजसिंह चौहान यांच्या लोककल्याणकारी योजनांनीदेखील निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. “मध्य प्रदेश हे माझे कुटुंब आहे आणि महिला माझ्या बहिणी आहेत,” असे मानणारे आणि तसे वागणारे शिवराजसिंह चौहान. याच क्रमाने भाजपने ‘लाडली बहना योजना’ त्यांनी सुरू केली आणि त्याअंतर्गत १.३१ कोटी महिलांना सुरुवातीला एक हजार रुपये आणि नंतर १ हजार, २५० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. टप्प्याटप्प्याने प्रत्येकी ५०० रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन देऊनही, रक्कम तीन हजार रुपये करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भाजपचा हा निर्णय मध्य प्रदेशात ’मास्टरस्ट्रोक’ ठरला, यात कोणताही शंका नाही.
भाजपच्या रणनीतीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दादेखील अतिशय प्रभावी ठरला. द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्म नष्ट करण्याच्या वक्तव्यावरून भाजपने आक्रमकपणे काँग्रेसला लक्ष्य केले. भाजपच्या बड्या नेत्यांनी हा मुद्दा सातत्याने मांडला. त्याचवेळी भाजपने निवडणूक प्रचारात राम मंदिराचे होर्डिंग्ज लावल्याच्या काँग्रेसच्या तक्रारीला हिंदूविरोधी ठरवले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीची जबाबदारी घेतली आणि उत्कृष्ट निवडणूक व्यवस्थापन केले. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हे मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी होते. त्यांनी अनेक बैठका घेऊन नाराज आणि असंतुष्ट कार्यकर्त्यांना एकत्र केले आणि निवडणूक प्रचारात आपली पूर्ण ताकद पणाला लावली. मध्य प्रदेशात भाजपने तीन महिने आधीच निवडणूक प्रचार सुरू केला होता. निवडणुकीच्या संयोजनाची जबाबदारी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे होती. यानंतर पक्षाने त्यांना दिमानी विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारीही दिली.
त्यानंतरही नरेंद्रसिंह तोमर पडद्याआडून निवडणुकीची संपूर्ण रणनीती राबवित होते. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील मध्य प्रदेश निवडणुकीचे सहप्रभारी होते. निवडणुकीसाठी ते सतत मध्य प्रदेशात तळ ठोकून होते. स्थानिक पातळीवरून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे पक्षाची रणनीती आखण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. या सर्वांसोबत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीदेखील आपल्या सर्व क्षमता पणाला लावल्या होत्या. निवडणुकीच्या काळात चौहान यांना अडचणीत टाकण्याचे अनेक प्रयत्न काँग्रेसकडून केले गेले. मात्र, आपल्या पक्षाला अडचणीत टाकणारे एकही विधान त्यांच्याकडून आले नाही. चौहान यांनी दरदिवशी जवळपास १५ सभा घेऊन, प्रचाराचा झंझावात निर्माण केला आणि त्याचेच फळ त्यांना निवडणूक निकालातून मिळालेले दिसते.
त्याचवेळी काँग्रेसचे कमलनाथ यांची रणनीती वेगळ्या परिप्रेक्ष्यात होती. भाजपचा पराभव करून, मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी कमलनाथ निवडणूक लढवत असल्याचे त्यांच्या व्यक्तिकेंद्रित प्रचाराकडे पाहून वाटत होते. काँग्रेस नेत्यांमधील रस्सीखेच स्पष्ट दिसत होती. कमलनाथ यांच्या मुलाने छिंदवाडामध्ये काँग्रेसने औपचारिक घोषणा करण्यापूर्वीच उमेदवारांची घोषणा केली होती, असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला. कमलनाथ हे पूर्णपणे ‘कॉर्पोरेट’ पद्धतीने निवडणूक प्रचार करत होते. त्यांच्या हटवादी वृत्तीमुळे त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या माहितीकडे सपशेल दुर्लक्ष केले. दिग्विजय सिंह यांच्याशिवाय ते इतर कोणालाही फारसे महत्त्व देत नव्हते. संपूर्ण निवडणूक प्रचार त्यांनी स्वतःवर केंद्रित केला होता. परिणामी, आपला स्वतःचा मतदारसंघ वगळता त्यांना राज्यात अन्य ठिकाणी प्रचाराचा जोर निर्माण करताच आला नाही. त्याचवेळी ’इंडिया’ आघाडीतील घटकपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचाही कमलनाथ यांनी जाहीर अपमान केला. परिणामी, सपने काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी राज्यात निवडणूक लढविली. त्यामुळे एकूणच कमलनाथकेंद्री प्रचारही काँग्रेसच्या पराभवाचे एक प्रमुख कारण ठरले आणि मध्य प्रदेशात ‘कमळ’ उमलले!