नवी दिल्ली : आगामी नववर्षाच्या सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण भारताचा दौरा करणार आहेत. दि. २ आणि ३ जानेवारी २०२४ रोजी तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळला पंतप्रधान मोदी भेट देणार असून या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी होणार आहे.
दरम्यान, तामिळनाडूमध्ये १९,८५० कोटी, लक्षद्वीप बेटांच्या दौऱ्यात ११५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या काही विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच, काही प्रकल्पांची पायभरणीदेखील करण्यात येईल. तर तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.
त्याचबरोबर, लक्षद्वीप बेटांवरील प्रस्तावित प्रकल्पांद्वारे दूरसंचार, पिण्याचे पाणी, सौरऊर्जा आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित विकास प्रकल्पांचा फायदा होणार असून स्वातंत्र्यानंतर प्रथमच समुद्राखालून जाणाऱ्या ऑप्टिक फायबर केबलद्वारे लक्षद्वीप जोडले जाणार आहे.